पहाटेच्या रानवार्या,
किती उधम करिशी,
त्यापरीस धर वाट,
माझ्या लेकीच्या घराची..
अंगणात पारिजात,
फुललासे पानानिशी,
देते सुगंध जरासा,
तिच्या घरला नेण्यासि..
नेई जपून, जपून,
ठेव तिच्या खिडकीशी,
बघ हळूच, हळूच,
लेक माझी आहे कशी..
जा रे हळू तिच्यापाशी,
तिला सांग माझे गूज,
दे रे सुगंध मायेचा,
हातांनी, मोरपिशी..
म्हण तिला सुखी ऐस,
कर सुखी गं सार्यांसि,
आणि माझ्या गं सयेने,
नको होऊ कासाविशी..
तिच्या एका स्मरणाने,
मनीं लकेर हास्याची,
वाणी मधुर तियेची,
रुणझुणे कानांपाशी..
तिच्या मनाच्या कुपीत,
लयलूट सुगंधाची,
तिच्या कीर्तीचा सुगंध,
आण मला उत्तरासि..