मारले ना मी कुणाला, मार ना खाल्ला कुणाचा!
मारले ना मारुनीही, आपले ते खूप होते !
आम्ही असे केलेच नाही, सांगणारे खूप होते ॥१॥
कारणे सांगून मी, ना भांडलो कधिही कुणाशी,
कारणावाचून जे जे भांडले, ते खूप होते !
आम्ही असे केलेच नाही, सांगणारे खूप होते ॥२॥
मी कधी ना चिंतिले वाईट त्यांचे एकदाही
चिंतिले वाईट ज्यांनी, चांगले ते खूप होते
आम्ही असे केलेच नाही, सांगणारे खूप होते ॥३॥
गीत माझे गात होतो, मुक्त ताना घेत मीही
गाळली कडवीच सारी, गोडवे ते खूप होते
आम्ही असे केलेच नाही, सांगणारे खूप होते ॥४॥
बंधने पाळीत गेलो, घातलेली स्पंदनांची
श्वास माझे कोंडणारे प्राणवायू खूप होते
आम्ही असे केलेच नाही, सांगणारे खूप होते ॥५॥
आज त्या अंधारलेल्या आठवांचे काय सांगू?
सूर्य-चंद्रा झाकणारे राहु-केतू खूप होते
आम्ही असे केलेच नाही, सांगणारे खूप होते ॥६॥
पेटलेला मीच होतो जाळण्या अंधार सारा
त्या मशाली घेत माझ्या चालणारे खूप होते
आम्ही असे केलेच नाही, सांगणारे खूप होते ॥७॥