मन मोकळं..

मन मोकळं, मोकळं,

अमावास्येचं आभाळ,

चंद्रावाचून उजळ,

एकलंसं..

मन मोकळं, मोकळं,

रिती होणारी ओंजळ,

कृष्णमेघांची पागोळ,

किती भरू?..

मन मोकळं, मोकळं,

जशी झरते बकुळ,

करी सुखाची शिंपण,

धरेवरी..

मन मोकळं, मोकळं,

जशी पुराणी वाकळ,

धागे रेशमी स्नेहाळ,

देती बळ....