हाय झाले तुझे केस वैरी पुन्हा !

हाय झाले तुझे केस वैरी पुन्हा

देह हा बांधला, काहि नसता गुन्हा ॥

सांग का सोडिसी केस हे मोकळे?

हाससी अन मनाशीच, का? नाकळे

जाहली जी सजा, गाल सांगे खुणा

हाय झाले तुझे केस वैरी पुन्हा ॥१॥

प्रीत ओथंबली रोमतोमांतुनी

गोड लज्जा दिसे हालचालींतुनी

भान नाही तुला, धुंद तू आतुनी

हे नव्हे आजचे, खेळ आहे जुना

हाय झाले तुझे केस वैरी पुन्हा ॥२॥

स्पंदनांचा तुझ्या भार देहास हा

वाटते मोह होतोय मोहास हा

सत्य नाही सखे गं, तुझा भास हा

घाट या यौवनाचा असे पाहुणा

हाय झाले तुझे केस वैरी पुन्हा ॥३॥

बांध गे केस तू, मन तसे बावरे

गूढ शत्रू कुणी त्यातुनी वावरे

भोवती पेरतो रेशमी भोवरे

गुंतता एकदा, नाही सुटका कुणा

हाय झाले तुझे केस वैरी पुन्हा ॥४॥

........................................

केस बांधू कसे? हात त्याचा फिरे,

आवरू मन कसे?जे न माझे उरे

देह नाही सखे, भेटती अंतरे

ना सुटे भोवरा, पूर्ण बुडल्याविना

सांग बांधू कसे केस माझे पुन्हा?