मौशुमी

लाइट गेले, त्यामुळे पंखा बंद झाला आणि पंखा बंद करायचं अन मला जाग यायचं स्विच एकच असल्यासारखं मी खाडकन झोपेतनं जागा झालो. खोलीत चांगलाच उजेड दिसला. हात लांब करून मोबाईलवर किती वाजले ते पाहिलं. ०९:०० अस दिसताच शिSSSSट अस जोरात ओरडून पांघरूण बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात भिरकावून दिलं. झोपेतनं नुकतंच उठल्यावर बहुतेक वेळा आवाज जड असतो. तो इफेक्ट जायच्या आत बॉसला फोन लावला. बरं वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला थोडासा उशीरा येईन अस त्याला सांगितलं. लाइट गेल्यामुळे गिझरचा काही उपयोग नाही. त्यामुळे गार पाण्याने पटकन अंघोळ उरकली. बरं वाटत नाहीये अशी थाप मारली खरी पण ह्या गार पाण्यानं खरचचं आजारी पडायचो असा विचार करत घराबाहेर पडलो.

ऑफिसमध्ये पोहचेस्तोवर १२ वाजून गेले होते. डेस्कजवळ आल्यावर पाहिलं तर माझ्या जागेवर एक मुलगी बसली होती. अरे मी चुकून दुसऱ्याच फ्लोअरला आलो की काय असा विचार करत होतो तेवढ्यात बॉसनं मागून येऊन पाठीवर थाप मारली. काय हिरो बरं वाटतंय का आता? मी आवाज शक्य तितका खोल नेत म्हणालो हां.. ठीक आहे आता. ओके.. मौसमी अशी त्याने माझ्या जागेवर बसलेल्या मुलीकडे बघून हाक मारली. येस सर अस म्हणत ती पटकन उभी राहिली. ती सर म्हणाल्यावर मी लगेच ओळखलं की ही नक्कीच फ्रेशर आहे. ये अनिश है और अनिश ये मौसमी.... आजसे ये हमारे टीम मे काम करेगी. मग बॉसने तिला काय काय माहिती द्यायची आहे, तिला काय काय येतं ह्याची कॅसेट वाजवायला सुरुवात केली. ओके, आय नो, गॉट इट, आय विल टेक केअर ऑफ इट अशी समारोपाची वाक्यं टाकून सुद्धा काही उपयोग झाला नाही. शेवटी ए आणि बी अशा दोन्ही साइडची कॅसेट वाजवून मगच त्याने आमचा पिच्छा सोडला.

मग मी वळून तिच्याकडे नीट पाहिलं. एकदम टपोरे डोळे होते तिचे. मी तिला बस म्हणालो आणि पलीकडची एक रिकामी खुर्ची ओढून स्वत:साठी घेतली. मला पटकन तिचं नावच आठवेना. स्वत:चा खूप राग आला. सॉरी आय फरगॉट युअर नेम... मी खजिल होत म्हणालो. ओह.. नो प्रॉब्लेम, मायसेल्फ मौशुमी... अस म्हणत तिनी हात पुढं केला. ते "मौशुमी" ती इतकं छान म्हणाली की बास......... मग हा बॉस मौसमी काय म्हणतो तिला. ते अगदी "मोसमी वारे"तलं मोसमी वाटतं. बरं झालं मी हिला नाव विचारलं; नाही तर मी पण येडछाप सारखं तिला मौसमी म्हणालो असतो. है शाब्बास असं मनाशी म्हणत मी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आणि आपला बॉस हा एकदम भुक्कड आहे ह्याची परत एकदा खात्री पटली. "मायसेल्फ अनिश" शक्य तेवढ्या स्टाइलने म्हणण्याचा प्रयत्न केला.

फार काळ इंग्लिशमध्ये बोलावं लागलं की मला गुदमरल्यासारखं होतं. "आपको शिफ्ट मे आना पडता है क्या? " असं विचारून तिनीच माझी सुटका केली. "अरे नही नही.... आज थोडा बीमार था, इसलिये लेट आया. " तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला. एक्सक्युज मी म्हणत तिनी फोन घेतला. "हां आई पोहोचले मी ऑफिसमध्ये वेळेवर. हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आला. आई मी जरा कामात आहे. लंच-ब्रेक मध्ये करीन फोन. ओके? चल बाय.. " अस म्हणत तिनी फोन ठेवला. च्या मारी... ही तर मराठी आहे की. छातीवरून एकदम इंग्लिशचं दहा आणि हिंदीचं पाच किलोचं वजन उतरल्यासारखं वाटलं. ती माझ्याकडे बघून हसली. संभाषणाची गाडी परत हिंदी/इंग्लिशकडे जाण्याआधी मी पटकन विचारलं "कुठे राहता तुम्ही? "
"औंधला! "
"अच्छा!!! मग ऑफिसला कशा येता? वायुने? " (आमच्या ऑफिसच्या बसचं नाव वायू आहे)
"नाही पीएमटीने. सोमवारपासून येणारे वायुने. "
"ओह... आय सी". मग मी तिला प्रोजेक्टची थोडी-फार माहिती दिली. कामाचं स्वरूप समजावलं. तिला काय काय शिकावं लागेल ते पण सांगितलं. हे सगळं ती तिच्या काळ्याभोर, टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत लक्षपूर्वक ऐकत होती. त्यामुळे मला दडपण आल्यासारखं होत होतं. दहा-पंधरा लोकांसमोर प्रेझेंटेशन देताना येतं तसं टेन्शन यायला लागलं होतं मला. कधी एकदा हे ज्ञानदानाचं कार्य संपवून संभाषणाची गाडी परत इंफॉर्मल टॉकवर नेतो असं झालं होतं. तेवढ्यात बॉसनं तिला बोलावलं. मग टीममधल्या इतरांशी ओळखी, राहिलेलं डॉक्युमेंट सबमिशन, इंडक्शन ह्यातच तिचा उरलेला दिवस गेला. जाताना मला आवर्जून बाय करून गेली. मी ऑफिसमध्ये बारा वाजता उगवल्यामुळे नेहमीसारखं सात वाजता निघणं काही बरोबर दिसलं नसतं.

आम्हाला दोघांना एकाच मॉडयुलवर काम करायचं असल्यानं तिला माझ्या शेजारचाच पीसी मिळाला. थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं की मौशुमी खूप बडबडी आहे. एकदम छान ट्यूनिंग जमलं आमचं मग. एकदा असंच बोलता बोलता तिला म्हणालो "पहिल्यांदा तुझ्या नावावरून मला वाटलं की तू बंगालीच आहेस. पण तुला तुझ्या आईशी बोलताना ऐकलं तेव्हा कळालं की तू मराठी आहेस ते. " त्यावर माझ्याकडे रोखून पाहत ती म्हणाली "अरे मी अर्धवट आहे. "
"म्हंजे? "
"म्हणजे मी अर्धी बेंगॉली आणि अर्धी मराठी आहे. माझे पपा बेंगॉली तर ममी मराठी आहे. लव मॅरेजे त्यांचं.. मग झाले की नाही मी अर्धवट. " डोळे मिचकावत ती म्हणाली.
"तुझ्या ह्या असल्या लॉजिकनं मला तर पूर्णच वेडा म्हणावं लागेल. " ह्यावर ती एकदम खळखळून हसली. "यू आर टू मच ऍनी!!! " ऍनी........ वा काय मस्त शॉर्टफॉर्म केलाय माझ्या नावाचा. नाहीतर माझे आई-बाबा. बाबा अन्या म्हणतात (एकदम चमन वाटतं ते) तर आई त्याच्यापेक्षा भारी नावानं हाक मारते - "अनू" म्हणून. किती वेळा सांगितलं आईला की ते मुलीचं नाव वाटतं. पण त्यावर तिचं एकच ठरलेलं उत्तर "तुम्हा मुलांना नाही कळणार आईचं प्रेम कधी". आता काही तरी संबंध आहे का त्याचा प्रेमाशी? पण आईला कोण समजावणार?

एक दिवस माझं बॉसशी कडाक्याचं भांडण झालं. माझा एकदम मूडच गेला मग. मी उदासपणे कॅन्टिनमध्ये बसून चहा पीत होतो. तेवढ्यात मौशुमी आली. माझा उतरलेला चेहरा पाहून म्हणाली "काय रे तुझा असा रामदीन का झालाय? "
"रामदीन? म्हंजे? "
"अरे कोणी असा दीनवाणा किंवा बापुडा चेहरा करून बसलं की आम्ही त्याला रामदीन किंवा दीनदयाळ म्हणतो. " मला मनापासून हसू आलं.
"बरं काय झालं ते पटकन सांग बघू. " मग मी तिला काय झालं ते सगळं सांगितलं.
"एवढंच ना? मग त्यात इतकं उदास व्हायला काय झालं? झालं गेलं विसरून जा आता. पहिले तुझा मोबाइल स्विच ऑफ कर. गोविंदाचा एक धमाल पिक्चर आलाय. तो पाहायला जाऊ. उद्याचं उद्या पाहू. मला काहीही कारणं नकोयेत तुझी. " मग आम्ही तो पिक्चर पाहिला. एकदम दिलखुलास हसत होती ती प्रत्येक जोकला. माझा पण मूड एकदम फ्रेश झाला. पिक्चर संपल्यावर म्हणाली "चल आता मी तुला कलकत्त्याला नेऊन आणते. "
"म्हंजे? "
"चल रे तू फक्त. प्रश्नच फार असतात तुझे. "
ती मग मला चतुःशृंगी पासल्या 'राधिका' नावाच्या बंगाली मिठाईच्या दुकानात घेऊन गेली. मी रसगुल्ले खाल्ले होते आधी पण तिनी मला 'खीरकदम' आणि 'संदेश' खाऊ घातले. खीरकदम तर जाम आवडलं आपल्याला. एकदम टकाटक मूड झाला मग माझा. शेवटी जाताना मी तिला थॅंक्स म्हणालो. त्यावर म्हणाली "अरे थॅंक्स नको म्हणूस. आता माझा जर कधी मूड गेला तर तुला पण माझ्यासाठी असंच काहीतरी करावं लागेल. "

पण तिनी तशी संधी कधी दिलीच नाही मला. कायम उत्साही आणि आनंदी असायची ती. एके दिवशी ऑफिसमध्ये यायला मला परत एकदा उशीर झाला. पाहतो तर काय मौशुमी बॉसला खूप बोलत होती. तू वेळेत काम पूर्णं करत नाहीस. जबाबदारी घेत नाहीस असं काहीतरी बोलला तिला तो. त्यावरून हे जोरदार भांडण चालू होतं. बॉस मात्र आता काहीच बोलत नव्हता तिला. मला एकदम आश्चर्य वाटलं. आम्हाला कायम धारेवर धरणारा हा माणूस तिचं मात्र शांतपणे ऐकून घेत होता. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला आलाच नाही. संध्याकाळी समजलं की त्याचा चार वर्षांचा मुलगा अचानक गेला म्हणून. लगेच आम्ही त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो आणि हॉलच्या कोपऱ्यात मान खाली घालून चुपचाप बसलो. हळूच एकदा मान वर करून पाहिलं - रडून रडून बॉसच्या बायकोचे डोळे सुजले होते. बॉस तर एकदम उध्वस्त झाल्यासारखा दिसत होता. तेवढ्यात मौशुमी उठली आणि सगळी सूत्रं तिनी हातात घेतली. जे कोण लोक भेटायला येत होते त्यांच्याशी जुजबी बोलणं, कोणाला काय हवं नको ते बघणं, लॅंडलाइनवर आलेले फोन घेणं हे सगळं ती न सांगता हॅंडल करत होती. निघताना तिनी बॉसला सांगितलं की तुम्ही एवढ्यात येऊ नका ऑफिसला. आम्ही सर्व हॅंडल करू. नंतरचे जवळजवळ दहा बारा दिवस ती सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत ऑफिसमध्ये थांबायची. सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून बॉसची बऱ्यापैकी कामं/जबाबदाऱ्या सांभाळल्या तिनं. तिच्या स्वभावातली ही दोन्ही टोक पाहून मी अवाक झालो.

चांगल्या माणसांच्या सहवासाला अल्पायुषी असण्याचा शाप असावा बहुदा. काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी कलकत्त्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. तिलाही त्यांच्यासोबत जाणं भाग होतं. ऑफिसमध्ये सेंड-ऑफच्या वेळी तिचा सगळ्यात चांगला मित्र म्हणून मला दोन शब्द बोलायला सांगितलं बॉसनं. "मौशुमी थॅंक्स फॉर एव्हरीथिंग" एवढंच बोलू शकलो मी. निघताना सगळ्यांचा निरोप घेऊन शेवटी ती माझ्या इथे आली. माझा चेहरा पाहून म्हणाली "आता परत तुला रामदीन म्हणायला नको लावूस हां... ". तिला जाताना पाहून नकळत डोळ्यांतून पाणी आलं. तिनी जर मला अस रडताना पाहिलं असतं तर कोणतं नाव दिलं असतं ह्याचा विचार करून मला एकदम हसू आलं.