शेवटी वाटांची मर्जी आहे

कमनशीबी सावलीची
परोपकारी झावळीची
तारवटलेल्या बाहूलीची
कशीही दिशाभूल करतील
शेवटी वाटांची मर्जी आहे ॥

गुमनाम मुसाफिरांना
बदनाम गावशहरांना
सुनसान स्मशानवाटांना
बेगुमान नेऊन सोडतील
शेवटी वाटांची मर्जी आहे ॥

विस्कटलेल्या स्वप्नांना
बेछूट हृदय स्पंदनांना
अनियंत्रीत पावलांना
दुर्गम घळईत सोडतील
शेवटी वाटांची मर्जी आहे ॥

काट्यांतून धडपडताना
आघातातून सावरताना
भावनावेग आवरताना
कुठे कशाही पाट फोडतील
शेवटी वाटांची मर्जी आहे ॥

जन्माची साथ विस्कटून
उभयतांचे मार्ग अलगून
अनोळखी कोणी भेटवून
हळूवार स्नेहबंध जुळवून
कुठे कुणाला घेऊन जातील
शेवटी वाटांची मर्जी आहे ॥ --- भूपेश (२००८-०३)