डायरी... १

रद्दीच्या एका रद्दड दुकानात,
सहज एकदा चाळता चाळता..
एका वहीवर तुझं नावं वाचलं
अन नकळत कुतुहूल चाळवलं

डायरी वाचू नये कुणाची
पण मी सारं काही वाचलं…
एका उपाशी अधाश्यासारखं..
अनिमिष नेत्रांनी टिपलं

पहील्या पानावर दोन फुलपाखरं..
एक डाव्या कोपऱ्यात तळाशी,
तर दुसरं फुलपाखरू
उजव्या कोपऱ्यात अगदी वर …

हो!! आठवलं!!
नुकतीच प्रेमात पडलेलीस तू तेव्हा..
थुईथुई नाचणारं तुझं ते मनं..
गालावरचा लाल रक्तिमा..
सारं सारं काही स्वच्छं आठवलं!!

मी पानं पलटत होतो.. डायरीची
अन गतकाळातल्या स्मृतींचीही…
एके ठिकाणी अचानक थबकलो…

तुझ्या लग्नानंतरचा पाचवा दिवस…
ते अखंड पान चकचकीत कोरं…
त्यावर फक्त एक गोड स्माईली..
प्रसन्न, तृप्त अन अतीसमाधानी…

नंतरच्या पानातही तू अशीच
स्वच्छंदी बागडताना दिसलीस..
कधी आरश्यासमोर लाजताना
तर कधी सभेत आत्मविश्वासाने
निर्धास्त वावरताना दिसलीस …

पुढे सरकता सरकता
नजरेस पडलं ते
एका गोंडस तान्ह्याचं चित्र…
तिसरा महीना चालू असावा तुला..
पोरी मुलांचा हट्ट धरतात
तू मात्र स्वतःच्या हाताने
एका छकूलीचं चित्र रेखाटलं होतंस..

तुझी लेखणी अन तुझी पेन्सील
बोलत राहीली पुढचे कित्येक दिवस..
साधारण आणि दिड एक महीनाभर…

मग का कुणास ठावूक…
शब्दांची गर्दी हळूहळू
विरळ होताना दिसली
अन पेन्सीलही न घिसताच
म्हातारी होताना दिसली…

मग काहीच दिसलं नाही…
दिसलं ते फक्त दुधारी पत्रं
एक सफल गर्भजलधारणेचं
अन दुसरं लिंगपरीक्षणाचं…. -
तुझ्या पॅथॉलॉजीच्या डॉक्टरांचं…

>>>>>भूपेश ( २००८-०७ )<

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय।
जो दिल खोजा आपना, मुझ-सा बुरा न कोय।।