...........................
या पोरकेपणी...
...........................ही भोवती निशा...
माझी कुठे दिशा...?
वेड्यापिशापिशा... होतात वेदना!उरले न सोबती...
कोणी न भोवती...
ही वाट कोणती... आहे अनोळखी?
या पोरकेपणी...
अंधारल्या क्षणी...
मज एक चांदणी... दावा कुणीतरी!सांगू तरी कसे...?
झाले कसे असे...?
शोधू कुठे ठसे... वाटेवरी नव्या ?
बाहेर-आतही...
माझ्या जगातही...
मी येत-जातही... नाही अता कुठे!दुनियेत वा घरी...
ओठांत; अंतरी...
सारे अधांतरी... बोलू कुणासवे?सोसायच्या व्यथा...
आहे जुनी प्रथा
शब्दांविना कथा.... सांगायची कशी?डोळे कधीतरी...
भरतात हे जरी...
ही आसवे खरी... देतात साथ ना?मी आवरू किती...?
मी सावरू किती...?
मी वावरू किती.... हासून सारखा?थांबून राहतो...
चुपचाप साहतो...
सारेच पाहतो... ड़ोळे मिटून मी!भिक्षा कुणी दिली...?
शिक्षा कुणी दिली...?
दीक्षा कुणी दिली... सोसायची मला?अज्ञातवास हा...
का रोज त्रास हा...?
थांबे न श्वास हा... अद्यापही कसा?- प्रदीप कुलकर्णी
.....................................
रचनाकाल ः १४ जानेवारी १९९९
.....................................