चिंब पाऊस पाऊस
नको दुर उभी राहुस
तुजविण भिजण्याच्या
नको भरीस पाडुस
ऐक मल्हाराची तान
गाते थरथरते पान
लता बिलगे ग तरुला
विसरुनी देहभान
या ऐशा आसमंती नको रुसून राहुस
रंग पोपटी हिरवा
बघ आसमंती नवा
काळ्या मेघांचा विहरतो
माथी डोंगराच्या थवा
या कोसळत्या सरींना नको पाठ उगा दावुस
खांदी वाऱ्याच्या बैसून
येई गारवा झोंबून
धावे गोड अशी शिरशिरी
या ओल्या अंगातून
या उसळत्या लाटांना नको बांध सखे घालुस