वाऱ्यावर वाहे अफवांचे बीज
लोकांसाठी राज लोकशाही
राजे संस्थानिक पुनर्जन्मी मंत्री
भोवती वाजंत्री शोषितांची
सत्तेच्या गोंदास बूड चिकटले
पुढारी धावले खुर्चीसंगे
आज लाथा हाणा उद्या गळी पडा
आजचा गधडा उद्या घोडा
घड्याळ हाताशी भांडभांड भांडे
शेवटास नांदे हातावरी
मैत्रीचा बुरखा सत्तेचा झुरका
लागतो चटका दोघांनाही
नको आशा मनी येवो जावो कोणी
पाणी आम्हा, आणि लोणी त्यांना
असे आहे तरी प्रिय हे स्वातंत्र्य
नको पारतंत्र्य आम्हा कधी
साठीत असून आहे ती तरूण
आवडे म्हणून लोकशाही
हुकुमशाहीचा नको गळा फास
त्यापरीस ब्येस लोकशाही