आठवांच्या सरींमध्ये
चिंब व्हावेसे वाटते
आजकाल मन माझे
फक्त झुलत राहते
शब्द एखादा नेमका
काही आठवून देतो
रंग उगीच फुलांचा
गोड सफरीस नेतो
एखादीच लकेर मी
पुन्हा पुन्हा आळवते
सात रंगांच्या राशीत
सांज माझी मावळते
एक हसरा चेहरा
डोळ्यांपुढे तरळतो
घंटा फोनची वाजता
जीव सारा पाघळतो
तासतास आता माझे
निमिषात लोपलेले
क्षणोक्षणी सुखावते
स्वप्न उरी जपलेले
स्वप्न होईल हे खरे
जीव सुखाने न्हाईल
अर्ध्या स्वप्नाची या सय
तरी मनी रेंगाळेल
असा सुखाचा झोपाळा
उंच आभाळात जावो
पोळलेले तनमन
पुरे रोमांचून जावो....
-संपदा
(२१.८.०८)