डे

काळानुसार बदलती संदर्भ वयाचे
तरुणाईचे घडे, नव्या संकल्पनांचे
कधी 'अभिनव' तर बऱ्याच 'आयात'
आजोबांचे शुज, नातवाच्या पायात
'नाती अन भावना', आहे कुठे वेळ?
प्रत्येकासाठी राखीव 'डे' चा खेळ
एकच दिवस 'फादर' 'मदर' डे
पुढे वर्षभर मात्र, त्यांचे 'वाव' डे
जीवाभावाच्या मैत्रीचे उखडले मुळ
नाकोनाकी साजरे 'मैत्री डे' चे खुळ
मैत्रीचे संकेत, किती सहज बदलले
एका 'डे' च्या पायावर, उभे मैत्रीचे इमले
नव्या जमान्याची, ही नवीच रित
त्याला आपलं म्हणा, जो बांधेल फित
अंतरीची तळमळ, केव्हाच भंगलेली
स्केचपेनने मैत्री, हाता पाया रंगलेली
प्रेम, माया, त्याग वगैरे दुर्लभ दर्शन
बघा बाह्यांगावर, सुरेख रांगोळी प्रदर्शन
'कसा' पेक्षा 'किती', आहे यालाच भाव
रेघोट्या, रिबीनींना, अंगी उगा वाव
मित्रांची संख्या, येई सहज सांगता
मैत्रीचा अंदाज, पण येईल का बांधता?
गिफ्ट, ग्रिटींग्सने सजलेले आहे चित्र
गुपित सांगण्याजोगा कोणी आहे का मित्र?
येईल संकटी धावून, अशी हवी साथ
की जमविले फक्त, रंगीबेरंगीच हात
मैत्रीचे 'मार्केट', मांडती बिजनेसचे दर्दी
झगमगत्या दुकानी, मित्रा, ग्राहकांची गर्दी
कौतुकाने ही आता बरेच SMS थापले
दुरावलेल्या मित्रांना EMAIL फॉरवर्डले