... आदिम ध्यास...

... आदिम ध्यास...

================================

अजस्र अवाढव्य श्वापदांपासून.. लपूनछपून..
स्वत:ला वाचवत.. फिरत होतो,
अगदी तेव्हापासून! मी शोधत होतो...
एक सुसह्य विश्व...

जीवघेण्या पंज्यांतून..
मृत्यूच्या कराल सुळक्यांतून..
थरकाप उडवणाऱ्या गर्जनांपासून.. दूर..
दुबळ्या उंदरासारखं जगत..!

त्याच सुरक्षिततेच्या ध्यासापोटी..
दुर्बल उंदराच मांजर झालं..
मांजराचा झाला वाघ...
पंज्यात बळ, जबड्यात सुळे असलेला...
सक्षम.. सशक्त..!

आणि त्या बरोबरच जन्माला आला..
गर्जनेतला ललकार... सार्वभौमत्वाची आग..!
स्वार झाली... गर्जणाऱ्या दर्यावर..
पिसाळलेली आयाळ काबूत घेत..
गोठवणारी.. तापवणारी वाळवंटे मागे सोडत..
उगवत्या सूर्याच्या दिशेने!!

लढवैय्ये बदलले.. लढत ती.. तशीच..
असुरक्षिततेची.. सुरक्षिततेसाठीची...
ध्येयं बदलली.. ध्यास तो.. तस्साच...
संपन्नतेचा!!!.....

दर्याच वार प्यायलेला कोलंबस;
आजही भटकतोच आहे..
स्वतःहून अंगावर चढवलेल्या..
नख्या सुळ्यांचा भार पेलत...
अवकाशांच्या पसाऱ्यात...
आपला असा ठसा उमटवण्यासाठी..!!!
दूरस्थ गर्जनांच्या कल्पनेनं..
बिचकत.. थरारत!!!

उरीपोटी तोच आदिम ध्यास बाळगून...
शोधतोच आहे... एक सुसह्य संपन्न विश्व!!!

================================
स्वाती फडणीस.................................... २५-०८-२००८