प्रश्न?

आता वाचावं की लिहावं की झोपावं की मेल चेक करावे की चॅटिंग करावं की किचन साफं करावं की लॊंड्रिचे कपडे आवरावे? वाचायचं तरी काय? कथा की कादंबरी की साधना की वाचायची राहिलेली वर्तमानपत्रं की अभ्यासाचं काही? आवराआवरीच्या कामाचा एवढा कंटाळा का येतो? आणि संध्याकाळीच ऒफिसमधून निघताना मेल चेक करून झाल्यानंतर मधल्या वेळात आपल्याला कोण मेल करणार आहे? आणि चॅटिंगला सगळी दररोज भेटणारी मित्रमंडळी, वेगळं काय चॅट करणार? पण झोपलो तर मग लिहिणार कधी? आणि लिहायचं तरी काय? एवढी निरनिराळी पुस्तकं वाचून आणि चित्रविचित्र पिक्चर्स बघूनसुद्धा लिहायला काहीच का सुचत नाही? आयुष्यात काही वेगळं घडत नाही म्हणून का? पण मग वेगळं म्हणजे काय? सदासर्वदा असंतुष्ट कस्टमरची नवीन मागणी म्हणजे वेगळं का? प्रोजेक्टमधला नवीन बग म्हणजे वेगळं का? वेगळा प्रोजेक्ट म्हणजे वेगळं का? वेगळी कंपनी म्हणजे वेगळं का? ऒफिसमध्ये दिसणाऱ्या नवीन पोरी म्हणजे वेगळं का? वेगळ्या विषयाचं अथवा कथेचं पुस्तक, नाटक किंवा चित्रपट म्हणजे वेगळं का? रोज रस्त्यावर वाढणारं ट्रॅफिक म्हणजे वेगळं का? का वेगळेपणाची संवेदनाच बोथट झाली आहे? बधिर झाली आहे? पण मग वेगळं म्हणजे तरी काय? जे तुम्ही आधी कधी अनुभवलं नाही ते  म्हणजे नवीन अनुभव म्हणजे वेगळं का? पण मग नवीन अनुभव म्हणजे काय? जे तुमच्या पंचेंद्रियांना आधी कधी जाणवलंच नाही ते म्हणजे नवीन का? की त्या इंद्रियांच्या माध्यमातून तुमचा मेंदू ठरवतो ते म्हणजे नवीन? पण मग मेंदू याबाबतीत अतिशहाणपणा करत नसेल कशावरून? ओव्हरकॊंफिडंटली वागत नसेल कशावरून? पण मग लिहायची वगैरे प्रतिभाषक्ती आभाळातून पडते का? खुपजण म्हणतात तशी ती देवाचा प्रसाद असते का? आणि मग तो प्रसाद आपल्यालाच मिळाला आहे हे कसं समजणारं? काहीजण आपण लिहू किंवा बनवू ते छापतील किंवा विकतील म्हणून? की काहीजण त्याला चांगलं म्हणतील म्हणून? पण मग आज वाईट ठरवलेलं उद्या चांगलं वाटायला लागलं तर? म्हणजे चांगलं वाईट असं काही नसतंच तर मग कुणाला देवाचा प्रसाद मिळालाय आणि किती मिळालाय ते कसं ठरवणार? पण मग अशा बऱ्याच प्रतिभावंतांनीच देवाचं अस्तित्वच का नाकारावं?

मला एवढे प्रश्न का पडतात? हा काय प्रश्न झाला? आता माणसाला बुद्धी आहे म्हणूनच तर प्रश्न पडतात की नाही? पण मग मलाच का एवढे प्रश्न पडतात? मला जास्त बुद्धी आहे म्हणून? माझ्या शैक्षणिक पात्रतेकडं आणि नोकरी व पगाराकडं बघून कुणी असं म्हणेल का? पण मग माझ्यापेक्षा हुशार लोकांनापण किंवा इतर बाकीच्यांना प्रश्न का नाहीत पडत? मलाच का पडतात? मी असा एकटा आहे म्हणून? पण मग ऒफिसमध्ये, बाहेर एवढ्या लोकांमध्ये मी असतो मग मी एकटा कसा? ऒफिसनंतरसुद्धा फोनवर, नेटवर लोकांच्या संपर्कात असतोच मग मी एकटा कसा? फक्त लग्न झालं नाही म्हणून एकटा? कुणाबरोबर राहत नाही म्हणून एकटा? तसं नसेल तर मग एकटेपणा म्हणजे काय? तो का येतो? मुळात तो असतोच का येतो? आणि तो असतो किंवा येतो तो कशामुळे? आणि तुम्ही स्वतःला कशाततरी गुंतवून घेतल्यावर तो कमी होतो का? मी खूप विचार करतो म्हणून येतो का एकटेपणा? पण मग बुद्धी आहे म्हटल्यावर विचार येणारच की नाही? का मी अति विचार करतो? आता बरेचजण म्हणतात देखिल मी अति विचार करतो म्हणून, पण मग अति म्हणजे किती? योग्य विचार म्हणजे किती विचार? कसे मोजणार हे विचार? आणि असं आयक्यू किंवा इक्यू सारखं मोजमाप असतं का विचारांचं? मोजणं शक्य झालं तरी जर आयक्युसारखं विचारांचं प्रमाण कमीजास्त करता येणारं नसेल तर काय? मग या विचारांचं आणि पर्यायानं प्रश्नांचं काय करायचं? मुळात त्यांचं काही करता येणार आहे का?

आता हे सगळं लिहून टाकलं तर कुणी वाचेल का?

(प्रेरणाः मिलिंद बोकील यांची "एकम")