कुणाची गं तू?

अंगावर फाटक्या तुटक्या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती। एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती.
मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले। "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे. तिला नरकयातना भोगायला लावणाऱ्यांना संडास साफ करायला लावलं पाहिजे, नरकातही त्यांना जागा दिली जाऊ नये, ' असं भाषणच त्यांनी संतप्त अवस्थेत ठोकलं. "जाहला न इतुका अवमान कधी, जाळली का यासाठीच आयुष्यें आम्ही' अशा स्वरूपाची कविता बापटांनी तत्काळ रचून गाऊन दाखवली. एसेम नेहमीप्रमाणे धीरगंभीर होते. परप्रांतीयांनी केलेलं आक्रमण, आपल्याच माणसांनी दलालांच्या हाती सोपवून शहराची केलेली माती, वाढतं प्रदूषण, गजबजाट, अस्वच्छता, गुन्हेगारी याबद्दलच मुंबईला गाऱ्हाणं मांडायचं असावं, अशी या सर्व नेत्यांना खात्री होती. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ' ही घोषणा आपण का दिली आणि त्यातल्या "च'ला किती महत्त्व होतं, याची आठवण अत्र्यांनी पुन्हा एकदा करून दिली. हे करताना यशवंतराव चव्हाणांकडे जाणीवपूर्वक कटाक्ष टाकला. यशवंतराव आपल्या पेटीतून महाराष्ट्राचा मंगल कलश काढून त्याला पॉलिश करण्यात गुंगले होते. त्यांनी अत्र्यांकडे विशेष लक्ष दिलं नाही.
मुंबईचं खरं गाऱ्हाणं ऐकून घ्यायलाच कुणी तयार नव्हतं। खुद्द महाराष्ट्रात जी स्थिती भोगत आहोत, तीच संयुक्त महाराष्ट्राच्या अध्वर्यूंच्या दारी आल्यावरही अनुभवायला मिळावी, याचं तिला विलक्षण वैषम्य वाटलं. ती रडवेली झालेली पाहून सगळ्या नेत्यांना दया आली. आपण समजतो तसं नाही. मुंबईचं दुःख वेगळंच आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपापल्या भूमिका आणि मतभेद बाजूला ठेवून मुंबईला बोलण्याची संधी दिली.
"संयुक्त महाराष्ट्राच्या पदरात माझं कन्यादान करणाऱ्या माझ्या आदरणीय पित्यांनो, मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. पण आता सध्याच्या राज्यकर्त्यांनी जो तमाशा मांडलाय, तो तुम्हाला कळला, तर तुमच्याच कामगिरीची तुम्हाला कीव येईल... '' मुंबई मुसमुसत म्हणाली
''काय झालं, काय झालं? '' सगळे चिंताक्रांत झाले
''खुद्द माझ्या पित्याच्या चारित्र्याविषयीच संशय घेतला जात आहे. ''
''कोण आहे तो हरामखोर? '' अत्रे गरजले.
''सांगते, सांगते.... आधी एका पोलिस अधिकाऱ्यानं माझ्या वडिलांविषयी संशय घेतला। मी कुणाच्याच 'बापा'ची नाही, असे ते म्हणाले। आतापर्यंतचे राज्यकर्ते मला कायमच सावत्रपणाची वागणूक देत आले। त्यात या अधिकाऱ्यानं मी अनौरस असल्याचंच सांगून मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही... '' मुंबई स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
एसेमनाही गलबलून आलं.
''माझ्यावर कायमच प्रेम करणारे एक आजोबा मला धीर देतील, असं वाटलं होतं. पण त्यांच्याशी भांडण असलेल्या त्यांच्या पुतण्यानं मला आधार दिला. "रस्त्यावर उतरा, म्हणजे मुंबई कुणाच्या बापाची आहे हे कळेल, ' असं त्या अधिकाऱ्याला सुनावलं. नंतर आमच्या या आजोबांचा दसरा मेळावा झाला. ते आता थकल्यामुळं त्यांच्या मुलानंच "मुंबई आमच्या "बापा'ची' असं जाहीर करून टाकलं. ''
''हे बरं झालं। कुणीतरी न्याय दिला ना? '' बापटांनी सुस्कारा सोडला. ''
''ते झालं हो, पण आता मलाच प्रश्न पडलाय ना, मी नक्की कुणाची ते! '' मुंबईच्या या प्रश्नावर सगळेच निरुत्तर झाले.
---------