वाघनखं (भाग १)

"आई गं SS !! हा दुधवालासुद्धा ना! किती जोरानं बडवतोय दार", मी डोळे किलकिले करत दुधाचं भांडं घ्यायला उठणार, एवढ्यात कुणीतरी दार उघडल्याचा आवाज झाला आणि 'हुश्श' करीत मी पुन्हा गादीवर मान टाकली.

" अरे कुठे गेल होतास?" ," ठरल्याप्रमाणं आज तिसरा आणि शेवटचा दिवस. उद्यापासून आपली पुन्हा भेट नाही. आज उठल्याबरोबर  कपाट उघडायचं, दोन कपडे गोळा करायचे आणि तडक गाव गाठायचं".

"आणि हो, एक महत्त्वाचं विसरलोच. वसंतरावांच्या पेटीतली वाघनखं गळ्यात बांधायची आणि मगच घराबाहेर पडायचं, एवढं पक्कं ध्यानात ठेव."

"तुला सांगितल्याप्रमाणं दादु गुरव तिथं हिंदळ्यात तुझी केंव्हापासुन वाट बघतोय. त्याच्याकडून किल्ल्या घ्यायच्या आणि मागल्या अंगणात जायचं. इकडची गोष्ट तिकडं होणार नाही याची सावधगिरी बाळग. घरातल्या धुळीत तुझी पावलंही उमटता नयेत. पडवीच्या खोलीतून स्वयंपाकघराकडे जायला वाट आहे. डाव्या अंगाला घराची मागची बाजू येईल. मागल्या अंगणात तुला तीन दगड दिसतील. मोठमोठाले!"
"पण एकाही दगडाला हात लावायचा नाही! तु हात लावलास कि सगळं होत्याचं नव्हतं होणार, हे विसरु नकोस. ते तीन दगड म्हंजे तुझी लक्ष्मणरेषाच! दुनिया गिळायची ताकद आहे त्या दगडांत! तेव्हा जरा जपून."

"दगडाच्या मागच्या बाजुनं, विहिरीकडं, पश्चिमेला आमराई आहे. तिथं तुझ्या दंडावर आहे तशी खूण एका फ़णसाच्या खोडावर दिसेल. मग तुला जे मी कालच्या रात्री-म्हंजे आपल्या दुसऱ्या भेटीत-सांगितलं, ते कर. काम होताच किल्ल्या त्या पुढल्या दारात टाकून असशील तसा माघारी फ़िर. नजर समोर असु दे. कितीही ओळखीचे आणि कसलेही चित्रविचित्र हसण्या-रडण्याचे आवाज आले तरी मागं पाहु नको. काम फ़ार जोखमीचं आहे. आणि लक्षात ठेव, याची कुणाला कानोकान खबर लागता कामा नये. तसं झालंच, तर अपुरीच राहील, तुझी इच्छा ...आणि माझीही!" "चल, मी आता निघतो. आता पुन्हा आपली भेट नाही. तसे होणे इष्टही नाही - ".

"हो, पण - ", मी पुढं काही बोलायच्या आतच बळवंतराव नाहीसे झाले होते.

                                                    ***

बळवंतराव. एक प्रभावी व्यक्तिमत्व. म्हणजे मी त्याना फ़ेस-टु-फ़ेस असा कधी भेटलो नाहीये, म्हणजे जागेपणी तरी!

माझा आणि ह्या बळवंतरावांचा परिचय वसंतरावाच्या पेटीत झाला. म्हणजे झालं काय, तर, आम्ही आमच्या पुण्याच्या नव्या घरी शिफ़्ट झालो आणि काही बॅगांसोबत एक जुनी पेटीही आमच्या  जुन्या घरातून या नव्या घरात स्थलांतरीत झाली. जुन्या घरात माळ्यावर पडून असलेल्या त्या पेटीकडं माझं पूर्वी कधीच लक्ष गेलं नव्हतं. लक्ष काय, अशी एखादी पेटी आपल्याकडं आहे, याची मला कल्पनाही नव्हती.

गेल्या आठवड्यात आई ऑफ़िसला गेली असताना मी ती पेटी उघडली. आणि आजोबांच्या म्हणजे वसंतरावांच्या बऱ्याच वस्तु माझ्या नजरेस पडल्या. पगडी, उंची धोतर, काठी, जुनं कंबरेला लावतात तसलं घड्याळ आणि याबरोबरच वाघनखांची एक जोडीही दिसली. एका सोनेरी चौकटीत विराजमान झालेली वाघनखांची ती जोडी अतिशय विलोभनीय दिसत होती. सुंदर, अतिसुंदर! तत्क्षणी मी त्या वाघनखांच्या प्रेमात पडलो होतो.       

                                                     ***                                      

"बराच उशीर झाला, आईला यायला", शेजारच्या गोडबोले काकू मला घरात येताना पाहून म्हणाल्या.
"हो, ना." पण माझं त्यांच्या बोलण्याकडं विशेष लक्ष नव्हतं. कधी एकदा ती पेटी उघडतोय, असं झालं होतं. मी आतल्या खोलीत पळालो. आणि फ़ोनची रिंग खणखणली.

"वसंता, नीट लक्ष देऊन ऐक"- पलिकडून आईचा आवाज. "मला तीन दिवस कामानिमित्त मुंबईला जावं लागणार आहे. ऑफ़िसमधून दुपारी घरी आले होते मी काही गोष्टी घ्यायला. तू घरी नव्हतास! कुठे असशील याची अंधुक कल्पना आहे, मला. नस्त्या उठाठेवी करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष घाल. आल्यावर बोलेन तुझ्याशी सविस्तर. बारावीचं वर्ष आहे, याचं थोडंतरी भान ठेव. वरण-भात लावून ठेवलाय. गरम करुन जेवून घे" आई मला पदोपदी जपत असे.

मी "हं" म्हटलं, आणि फ़ोन ठेवला. ही गोडबोले काकू आडवी गेली ना, की, कुणा ना कुणाच्या शिव्या खाव्या लागतातच. आणि वरण-भात तरी कुणाला खायचाय? काकूंवर राग काढत फ़्रेश झालो, बाईक काढली आणि युनिव्हर्सिटी रोडवर चालता झालो. बाईक एका पावभाजीच्या गाडीशेजारी उभी करून ऑर्डर सोडली, "एक पेशल पावभाजी, मस्त मस्का मारके!"

घरी परतायला साडेअकरा वाजून गेले. कोचवर रेलून टिव्ही बघत बसलो. समोरच्या तसबिरीकडं नजर गेली. आई, बाबा आणि दादा-माझा मोठा भाऊ- अनंता. आणि डोक्यात तोच जुना विचार घोळु लागला. काय झालं असावं, असे एकदम कसे नाहीसे झाले असतील, बरं? त्यांचा कोणी शत्रू असणं, तर निव्वळ अशक्य.

आजोबांच्या निधनानंतर प्रेम आणि आदरापोटी वडिलांनी - श्रीयुत दिनकर वसंतराव परांजपे यानी - माझं नावही 'वसंता' ठेवलं होतं. आणि माझ्या जन्मानंतर काही दिवसातच बाबा बेपत्ता झाले होते. दादा त्यावेळी चार-एक वर्षांचा असेल. आणि आता तीन-चार वर्षांपुर्वी दादाही घरातून गायब झाला होता. आईनं एकटीनं आम्हा दोघां भावंडांना वाढवलं होतं. कधी कधी एकटेपणी तिला रडताना  पाहून माझेही अश्रु दाटून येत.

बाबांचा आणि दादाचा फोटो पाहून डोळ्यांत पाणी आलं पण मी स्वतःला कसंबसं सावरलं. "नाही, मला काहितरी करायलाच हवं. माझ्या दादाचा, माझ्या वडलांचा मला शोध घ्यायलाच हवा. इन फॅक्ट, ते माझे कर्तव्यच आहे!", माझं मन त्यांच्या विचारांनी झपाटून गेलं.

त्याच भरात मी आजोबांची पेटी पुन्हा उघडली. "अहाहा, किती मस्त आहेत ही वाघनखं.", मी हात पुढं सरसावला आणि घाईघाईनं वाघनखं काढु लागलो. त्या घाईत वाघनखांखाली असलेला एक कृष्णधवल फ़ोटो ओढला जाऊन फ़ाटला. फ़ोटोमध्ये तिघंजण होते. आजोबा आणि दोन व्यक्ती. फ़ोटोमागे तीन नावं लिहिली होती - डावीकडुन,'वसंतराव', 'बळवंतराव' पण नेमक्या तिसऱ्या नावावर शाई सांडली होती. आणि आता माझ्या घाईमुळे त्या तिसऱ्या व्यक्तीचा पुसटसा चेहराही फ़ाटला गेला.

"असतील कोणीतरी आजोबांचे मित्र", असं म्हणत पेटी बंद केली, आणि वाघनखं न्याहाळत निद्रादेवीला आळवु लागलो. डोळा लागला पण मनात कुठेतरी बळवंतरावांची प्रतिमा साठून राहिली.

 "वसंता, ऊठ. अरे, मी बळवंतराव. आज आपल्या भेटीचा पहिलाच दिवस. तुझ्या आजोबांचा मी जानी दोस्त. आजोबांना काही तू पाहु शकला नाहीस, पण त्याची फ़ार इच्छा होती रे, तुला पाहायची. त्याआधीच निर्वतला बिचारा. तुझा हा बळवंत आजोबा तुला मदत करेल त्याची अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण करायला. उद्या, पुन्हा भेटू", मी गोंधळलेल्या अवस्थेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हात आपटला, टेबलावरची फ़ुलदाणी खाली पडली आणि मी खडबडून जागा झालो. सकाळचे सहा-साडेसहा झाले असावेत. म्हणजे हे पहाटेचं स्वप्न होतं? पहाटेची स्वप्नं खरी होतात, असं कुणीतरी म्हटल्याचं आठवलं आणि भारलेल्या अवस्थेत पडून राहिलो.

"काय असेल माझ्या आजोबांची अपूर्ण राहिलेली इच्छा? ती पूर्ण करायला हे बळवंतराव मला का मदत करतायत बरं? हे बळवंतराव मला माझ्या बाबांचा आणि दादाचा शोध घ्यायला मदत करतील?" असे शेकडो प्रश्न डोक्यात घेऊन दिवसभरातील कॉलेज, अभ्यास इ. कामं उरकली.

आज दुसऱ्या दिवशीची रात्र. वाघनखं उशाशी ठेवून बळवंत आजोबांचा विचार डोक्यात घोळवत मी पडून राहिलो. तेच शेकडो प्रश्न. पण उत्तर काही सापडत नव्हतं.

"ऊठ, वसंता! ते बघ, फ़णसाचं झाड. झाडाच्या मागल्या बाजुला ढोली आहे. सहसा किडामुंग्यांनी भरलेली ती ढोली पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात कशी अगदी स्वच्छ दिसतीय. त्या ढोलीत हात घाल. तुला अगदी तुझ्याजवळ आहे तश्शीच एक वाघनखांची जोडी सापडेल. रक्तानं माखलेली! घाबरु नकोस. ती वाघनखंच तुला आपल्या उद्दिष्टापर्यंत नेतील. पण पौर्णिमेचीच रात्र, फ़क्त! लक्षात असु दे." ते जे सांगतील तसंच होईल, इतकी कमांड होती बळवंतरावांच्या आवाजात.

                                                   ***

गेल्या तिन्ही रात्री आणि ती तिन्ही स्वप्नं एकापाठोपाठ डोळ्यांपुढं तरळली. माझ्या हातून काहितरी नक्की घडायचं बाकी आहे आणि तेही लवकरंच. बळवंतरावांवर अविश्वास दाखवणं, आता माझ्यापरीनं तरी शक्य नव्हतं.

संध्याकाळी फ़ोन वाजला. "वश्या, उद्या कोजागिरी आहे. काय प्लॅन काय, बोल?"- स्वप्नील. माझा बालमित्र.
"कोजागिरी? ...पौर्णिमा?" - मी.
"हो, रे, बाबा. उद्याच आहे" स्वप्नील.
"उद्या मला जरा कठीण वाटतंय रे, मला थोडं काम आहे" मी जाणून बुजून स्वप्नीलला टाळलं आणि मनात उद्याच हिंदळ्याला जायचं नक्की केलं.

                                                  ***
दिवस उजाडला. बळवंतराव आज उशिराच स्वप्नात आले होते. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ही त्यांची तिसरी आणि शेवटची भेट होती. रात्रभर डोळ्याला डोळा न लागल्यानं माझे डोळे चांगलेच सुजले होते.

झटपट न्याहरी उरकली. आईला फोनवर प्रोजेक्टसाठी बाहेरगावी जावं लागणार असल्याचं कारण सांगितलं, आणि तडक स्वारगेट गाठलं. पुणे-देवगड एस् टी दिसली. मी चढलो आणि लगेचच बस सुरु झाली. जणु काही ती माझ्यासाठीच थांबली होती!

देवगड येईस्तोवर संध्याकाळचे सहा वाजले. कंडक्टरला पुढे हिंदळ्याला कसं जायचं, विचारलं. त्यावर, हिंदळ्याला जाणारी शेवटची बस सुटली असेल, एव्हाना, पण बघा कुठे जीप किंवा आणि काही मिळतंय का", असं उत्तर मिळालं.

हिंदळं साधारण पाच एक मैल असावं. काय करावं, असा विचार करत बाहेर पडलो, आणि बाहेर "फ़क्त एक शीट..फ़क्त एक शीट", अशी ओरड कानावर पडली.
"हिंदळ्याला सोडणार का?" मी विचारलं.
त्यावर, "तुम्का फ़ाट्यास्तोवर सोडंल, तिथुन एकाध मैल चालित जावं लागंल", असं पॉझिटिव्ह उत्तर मिळालं.

खड्ड्या-खाचखळग्यांतून फ़ाट्यापर्यंत यायला दीड तासांहूनही जास्त वेळ लागला. "तो चढ चढून उतरलात की तुम्ही हिंदळ्यात दाखल!" - ड्रायव्हरनं गाडी थांबवत मला सांगितलं. दहा रुपये ड्रायव्हरच्या हातात टेकवून मी एकटाच उतरलो. एवढे प्रवासी होते जीपमध्ये; पण हिंदळ्याला कोणीच नाही उतरलं. मला ते थोडंसं विचित्र वाटलं.

जीप पुढे निघून गेली. समोर रस्ता अगदी निर्जन होता. चिटपाखरूही नव्हतं. भीती वाटत नव्हती, पण टेन्शन येऊ लागलं होतं. एकट्यानं इकडं येऊन चूक तर केली नाही ना, अशी मनात शंका आली.

खांद्यावरची सॅक नीट केली आणि पुढे चालू लागलो. समोर चढा रस्ता; रस्ता कसला? पायवाटच! रातकिड्यांची किर्रकिर्र अणि आजुबाजुला असलेली नारळाची उंचच उंच झाडं वातावरणातील भयाणता वाढवत होती. त्यातल्याच एका झाडाकडं माझं लक्ष गेलं.

डोक्यावर मळकं पागोटं गुंडाळलेला तो म्हातारा त्याच्या हातातल्या दगडांशी चाळे करत होता. फ़ाटका गंजी आणि कळकट्ट असं लुंगीवजा कपटा कमरेभोवती नेसलेला तो म्हातारा मध्येच आकाशाकडं बघून कुणाशीतरी बोलत असल्याचा हावभाव करत होता. नक्कीच वेडा असावा. त्याचाकडं अधेमधे पहात मी पुढं वाट चालु लागलो.

एकदम काहीशी सरसर झाली आणि मोठमोठ्यानं हसण्याचा आवाज आला. मी मागं वळून पाहिलं. तो वेडा म्हातारा आता झाड्याच्या बुंध्यापर्यंत वर चढला होता. आणि हातवारे करत मोठ्यानं खिदळत माझ्याचकडं पाहत होता. नाही म्हटलं तरी, मी थोडा टरकलो. पावलांचा वेग वाढवला.

"ए, ए प्वारा, थांब! मला बघु दे!", त्या म्हाताऱ्याचा चढा आवाज मागून आला. त्यानं झाडावरनं माझ्या दिशेनं उडी घेतली. मी आता पावलं झपझप उचलू लागलो. अरे, हे काय? तो वेडा तर माझ्या अगदी जवळ पोचलाच होता. काय बघायचंय तरी काय त्याला? मला काहीच कळत नव्हतं. मी धावण्यासाठी पाय पुढे टाकला आणि तत्पूर्विच त्यानं माझा गळा पकडला...

(क्रमशः)