साऱ्या दुनियेची म्हणून
रीत पाळावी लागते
मनी दाटला कल्लोळ
सय माहेराची येते.
आले तुझ्यासवे सख्या
वेगळ्या मातीच्या अंगणी
जिला ठाऊक नाहीत
माझ्या माहेरच्या सरी.
तुझे घऱटे नवीन
ऊब नाही रे अजुनी
माहेरच्या भिंतीतली
धग अजून सोयरी.
तुझ्या हाताचा विळखा
सोडवत नाही
तरी अदृष्टाचे भय
सुख पालवत नाही.
एका शब्दाचे कौतुक
तुला कळावे कसे रे
माझ्या माहेराचे झोके
तुझ्या गावाला पारखे.
तुझ्या स्पर्शाचे चांदणे
उमलते मनी
परी दुष्ट अवसेच्या दिवशी
आता अंगाईस आई नाही.
स्वप्न बघते सावध
नाही तुझ्यावर राग
लांब आहे रे माहेरची
माझी सवयीची रात.
मी जाणते रे बाळा
माझ्यात शोधिसी आई
परी विनवते एक
इथे मलाही बाप नाही.