भावना बोलकी, शब्द झाले मुके
जाणिवांच्या पुढे दाटलेसे धुके !
स्पर्श-आल्हाद हे,जीव जीवा कळे
धुंद एकांत हा,विश्व हे आगळे !
या म्हणा भोग वा, ही समाधी स्थिती !
वा अधःपातही वा म्हणा उन्नती !
वेस ओलांडली- देह संपे जिथे
शुद्ध आनंद हा फक्त नांदे तिथे
वाजती श्वासही पावरी होउनी
ऐक्य हे उमटवी मुक्त 'हंस'ध्वनी !