नावात काय आहे ? (भाग १)

"नावात काय आहे? " असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलच आहे. आता काही नतद्र्ष्ट मंडळी हे वाक्य एखाद्या इंग्रजी लेखकाचं आहे, हे म्हणायला कमी करणार नाही. काही तर ठामपणे शेक्सपिअरचे नावही घेतिल. असो. नावात काय आहे, तुकाराम काय अन शेक्सपिअर काय. बाकी आम्हाला शेक्सपिअरशिवाय दुसरा कोणी ठाउक नाही ना  . तसही आजकाल परदेशी (म्हणजे अमेरिका बरं का) लोकांनी काही शोधून काढलं की आमच्या पुर्वजांनी ते आधीच शोधलं होतं, असं म्हणायची टुमच निघाली आहे. तर आमच्या लोकांनी काही शोधलं (जुन्यापुराण्या ग्रंथातून..... नवीन काय कपाळ शोध लावणार? ) तर ते आधीच कुणी परदेशी (म्हणजे... पुन्हा अमेरिकन) लोकांनी आधीच शोधलय, त्यात काय नव्हीन असं दात कोरीत विचारणारे शोढायला नकोच. नावं घ्यायला जागा अपुरी पडेल.

जर नावात काही नाही तर "तुझे नाम गोड... वगैरे" संतांनी म्हटले,  ते का बरं. (कोणी आठवत नाही, आपण आपलं अज्ञान का पाजळावे). तारुण्यात (आणि काहींना उतारवयातही) काही विशिष्ट नावं अधिक गोड वाटू लागतात. मग ती नावं वहीत, पुस्तकात, झालच तर मनात कोरल्या जातात. एखादा फारच भक्त असेल तर दगडावरही कोरतो. (पाहा :- अजिंठा/ वेरुळच्या लेण्या किंवा तत्सम बिल्डींगा). पण काही नावं ही हत्तीच्या पायासारखी मनावर ठसा उमटून जातात.  त्यात गणिताचे मास्तर सर्वात पुढे असावे.

काही नावं फसवी असतात. आता बाळ हे लहान मुलाला शोभणार नाव. पण बाळ आता ८० वर्षाचं झालं असं कसं म्हणता येईल, मग त्याला पुढे "साहेब" लावायची साहेबी पद्धत आली. "साहेब" आवडला नाही तरी हा हिंदुस्थानी "बाळासाहेब" आमच्या हृदयावर राज्य करतो. त्यांना म्हणे गांधी नावाचं वावडं आहे. आता बोला. रोजच्या खर्चाला गांधी लागतात की नाही. मग हे काय गांधी वापरत नाही, केवळ चिल्लर-खुर्दा वापरतात की काय? ह्या बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उद्धटाला (सॉरी त्याचं नाव उद्धव आहे म्हणे... जाउ द्या नावात काय आहे? ) सेनापती बनवलं. त्याचा परीणाम म्हणून "स्वरराज" मधून "स्वर" निसटले अन केवळ "राज" उरलं. आता ते "राज" करणार आहेत असं म्हणतात.

तरूण लोकांना केवळ तरूण नावं नको तर तरुण व्यक्तीही हवा. मग त्याचं नाव राज हवं का उद्धव? वरुण हवं का राहुल, हा कायमचा झगडा आहे. हे मला फार मजेदार वाटतं. मागे "बाळासाहेब" म्हणाले, "राहुल गांधी नको मात्र वरुण गांधी चालेल". कमाल आहे बुआ?  मुळात हे दोघही गांधी आहेत का, हा यक्षप्रश्न आहे. इंदिरा नेहरुंनी फिरोज खान नामक व्यक्तीशी लग्न केलं ते नामांतर (की नामविस्तार? ) केल्यावरच. मग फिरोझ (खान) गांधी मार्फत इंदिराजी गांधी झाल्या. अन पुढे राहुल अन वरून "गांधी" झाले. खर तर काँग्रेसमधून गांधी वजा केलं तर मोठ्ठं शुन्य उरतं हे प्रत्येक काँग्रेसवासी जाणतो, म्हणून ते आधी सोनियाचे दिस पाहू लागले होते तर आता राहुलच्या मागे लागतात.

बरं केवळ "राज"कारण म्हणून लोकं नाव बदलतात असं नाही. नाहीतर काय,  अहो नाहीतर युसुफमियॉ कशाला दिलिपकुमार झाले असते. "शिवाजी" सारखं भारदस्त नाव मागे असतांना गायकवाडला "रजनीकांत" असं नाव का घ्यावं लागलं असतं. लोकांना कधी स्वतःच्या नावाची ऍलर्जी होते, तर काही लोकांना स्वतःचं नाव सर्वात चांगलं वाटतं. अमिताभ बच्चन हे लांबलचक नाव घेउन आलेल्या लंबू अभिनेता शेवटी सफल झालाच, पण प्रत्येक बच्चन होईलच असही नाही.

काही नावं उगाच बदनाम झाली. हर्शद मेहता,  सुखराम,  शिबू वगैरे पण बदनाम झाली तरी लोकांनी ही नावं आपल्या मुलांसाठी ठेवणं बंद केलं नाही. हा.... एक नाव मात्र आवर्जून घ्यावं लागेल. ते नाव बदनाम असलं तरी व्यक्ती तितकीच चांगली आहे. ती म्हणजे प्राण शिकंद.

प्राणसाहेबांनी स्वतःच नाव इतकं गाजवलं की कोणी त्यानंतर स्वत:च्या मुलाचं नाव "प्राण" नाही ठेवलं. अपवाद २ आहेत असं ऐकलय,  त्यातला एक प्राण कोकणातल्या एका प्राणच्या फॅनचा मुलगा आहे....दुसरा माहीती नाही.

असो. "तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम" असं संत गोरोबांनी (चुभुद्याघ्या, बाकी नावत काय आहे? ) म्हटलं होतं ते विठ्ठलासाठी... आज कोण हे गाणं कोणासाठी म्हणतोय?  

(क्रमशः)