विजय कोणाचा ?

   
 " हे पाहिलत का साहेब? "पेपरातल्या एका  बातमीवर बोट ठेवीत मानाजीरावानी विचारले.
  " हो पाहिलय तर-- केव्हाच पाहिल! असल्या गोष्टी आमच्या नजरेतून कशा सुटतील? ती बातमी येण्यापूर्वीच आम्हाला
त्याचा अंदाज आलाही होता. ही सत्प्रवृत्त मंडळी असतील सत्प्रवृत्त आम्हाला त्यांच्याविषयी काही म्हणायच नाही पण  आमयाविरुद्ध सत्प्रवृत्त आघाडीचा उमेदवार त्याचा अर्थ आम्ही दुष्प्रवृत्त असा घ्यायचा का? ’
" पण त्यांचा प्रयत्न तरी तसाच नाही का? ’
"ती बातमी कोणच्या टायपात छापली आहे पाहा म्हणजे पेपरवाल्यांच्या  दृष्टीने तिच महत्व किती आहे हे आपोआपच कळतेय. "
" साहेब त्या बातमीविषयी नाही बोलत आम्ही. ती बातमी केव्हांच शिळी झाली मी या मोठ्या टाइपातल्या बातमीच बोलतोय. "
"मानाजीराव, आणखी एक सत्प्रवृत्त खड्ड्यात पडायला निघालाय तीच बातमी म्हणताय ना? त्या सुमंत साबळे विषयीच बोलताय ना तुम्ही? वाढू दे आणखी वाढू दे सत्प्रवृत्तांची संख्या, निदान त्यामुळे सत्प्रवृत्त लोकांची इतकी संख्या आमच्या मतदारसंघात आहे हे  ऐकून  आम्हाला आनंदच झालाय आणि सगळेच उभे राहिले की आपल काम आपोआपच झाल नाही का?. "
"साहेब आता एकच सत्प्रवृत्त तुमच्याविरुद्ध उभा राहतो आहे बाकीच्यांनी त्याच्यासाठी माघार घेतलीय माहीत आहे का
ही नवी  डेव्हलपमेंट? "
"काय सांगताय काय? "
"हो अगदी खरे तेच सांगतोय, त्याचमुळे तुम्हाला ती बातमी नीट वाचा अस म्हणत होतो. हा एकास एक मुकाबला आपल्याला महागात पडणार आहे साहेब"
"उगीचच काळजी करताय तुम्ही मानाजीराव, तुम्हाला माहीत आहे ना आम्ही किती वर्ष राजकारणात काढलीत आणि
मला त्या साबळेची भीती दाखवताय? "
" साहेब मी उगीचच बोलत नाही . त्या साबळे विषयी फार बोलले जातेय हल्ली तो म्हणे खात नाही, पीत नाही की झोपत नाही फक्त काम काम काम. तीनच वर्ष झालीत त्याला आपल्या मतदारसंघात येऊन आणि आता बघाव त्याच्या तोंडी त्याचच नाव "
"खात नाही पीत नाही मग कशाला होतोय हा खासदार? "
"साहेब थट्टा नाही आणि उगीच चेष्टेवारी घेऊ नका मी काय म्हणतो ते"
"काय सांगताय मानाजीराव खात नाही पीत नाही झोपत नाही मग माणूसच आहे ना हा? ’
"अगदी खर आहे साहेब, मला तोच पेच पडलाय. त्याला कधी मित्रांच्या किंवा नातेवाइकांच्या बरोबर कुठे काही खाताना,
पिताना कोणीही पाहिल नाही आणि तो झोपतो तरी केव्हा कुणास ठाउक? माणसासारखा दिसतोय म्हणूनच माणूस म्हणायचा"
" हा आला तरी कोठून? सगळी माहिती गोळा करायला हवी आपल्याला प्रतिस्पर्धी कितीही दुबळा असला तरी
कोठलाही  स्थितीत त्याला कमी लेखण्याची चूक करायची नसते आम्हाला",
" उद्याच हजर करतो त्याची सगळी कुंडली साहेब तुमच्यापुढे.
                                                                     +  +   +   +    +     +
" हं मग काय मानाजीराव त्या साबळेची कुंडली मिळाली का? "
" साहेब आपल हेरखात काही उगीचच नाही, सगळी माहिती गोळा केली. तीन वर्षापूर्वीच त्याने या शहरात प्रवेश केला.
त्यापूर्वी कुठल्याशा छोट्या गावातच त्याचे आईबाप होते. थोडीशी शेती आणि छोटस घर होत म्हणे. आई आता
नाही पण वडील सैन्यात होते इंजिनियर पण लढाईत जायबंदी झाल्यावर त्या खेड्यातच बरेच लोकशिक्षणाचे कार्य करीत होते म्हणे. सुमंताच म्हणजे या साबळेच लग्न तो खेड्यावर असतानाच झाल होत पण त्याची बायको बाळंतपणात गेली आणि पोरही जगले नाही. आता बाप लेक दोघे जणच राहतात म्हणे. बापाच्या पायातल वार गेलय त्यामुळे तो चाकाच्या खुर्चीतून हालचाल करत असतो. "
" आणि त्याच्या खाण्यापिण्याच काय? "
" त्याच काय? "
"कमाल आहे मानाजीराव तो काही खात पीत नाही झोपतसुद्धा नाही हे तुम्हीच सांगितले ना मग त्याच्या बाबतीत खरा प्रकार काय आहे हे माहिती करून घ्यायला नको का? "
" अहो पण साहेब त्याच्याशी आपल्याला काय देण घेण आहे? न का खाईना पिईना "
"शाब्बास मानाजीराव ही केवढी महत्वाची गोष्ट आहे ध्यानात येत नाही का तुमच्या? तर मग नीट ऐका मी काय सांगतो ते. ही सत्प्रवृत्त मंडळी साबळेसाठी माघार घेणारी कोण आहेत माहीत आहेत ना? त्यातला एक आय टी तज्ञ
अमेरिकेतून परत आलेला तर दुसरा मोठा उद्योगपती तिसरा तर मुस्लिमांच्या पाठिंब्यावर उभा होता अशा लोकांनी माघार घ्यावी अस काय आहे हो त्या  सुमंतात? काही नाही याचा बारकाईने शोध घ्यायला पाहिजे. दालमे जरूर कुछ काला है " 
" मग साहेब मी एक सांगू का काट्यानच काटा काढायला पाहिजे. म्हणजे आपले दोस्त कदमसाहेब त्यांनाच का बोलावून घेत नाही? ते पण जपानला कसले ते रोबाट की काय असे शिक्षण घेऊन आलेत "
" वा फस्क्लास आयडिया मग उद्या त्यांनाच बोलावून घ्या. मग बघूया सुमंत का खात पीत नाही ते. "
                                                                      +  +   +   +    +
" नमस्कार साहेब, कशी काय गरिबाची आठवण काढली? "
" नमस्कार नमस्कार, तशी आम्हाला तुमची आठवण सारखीच येत असते कदमसाहेब, पण आता तुम्ही पडला कामाचे लोक सारखी सारखी तुमची आठवण आली तरी तुमचा महत्वाच्या वेळ उगीच कशाला वाया घालवायचा म्हणून बोलावत नाही इतकेच, नाहीतर आम्हाला आठवण आली की आम्ही तुमच्याकडे येतच असतो. आज अगदी तुमच्या मदतीशिवाय भागणारच नाही अशी परिस्थितीच आली म्हणून तुमचा मूल्यवान वेळ घेतोय. "
" काय साहेब, गरीबाची थट्टा करताय, बर ते जाऊ द्या बोला काय काम काढलय? "
" मानाजीराव, कदमसाहेबांना सांगितल नाही का? "
" साहेब, आता माझ काम मी केलेय कदमसाहेबांना तुमच्यापुढ आणून उभ केलेय आता तुमचा काय विचार आहे ते तुम्हीच सांगितलेल बर नाही का? "
" बरय आता तुम्ही म्हणताय तर आम्हीच सांगतो. बरका कदमसाहेब, तुम्ही ते जपानला जाऊन काय शिकून आलात? "
" हां ते रोबोटिक्स म्हणजे यांत्रव विज्ञान त्याविषयी म्हणताय का साहेब? "
" काय म्हणता यांत्रव ही काय भानगड? आम्ही काही तरी वेगळच ऐकलय काय मानाजी राव? "
" अहो कदमसाहेब त्ये रोबाट की काय म्हणतात ना? "
" अहो तेच ते रोबाट "
" हंग अश्शी अस जरा आयच्या भाषेत बोला ना "
"ठीक आहे मानाजीराव त्या रोबाटच काय इथ काम काढलय? "
" कदमसाहेब, हे रोबाटच झेंगाट तुमी तयार करता ना? "
" तुम्हाला  पाहिजे तरी काय मानाजीराव ? मला जरा नीट सांगाल का ? "
" साहेब तुम्हीच का सांगत नाही तुम्हाला काय शंका आहे ती "
" हे बघा कदम, हे जे काय रोबाट असत ते अगदी हुबेहूब माणसासारख असत म्हणे हे खर आहे का? "
’ ते तुमच्या कामावर अवलंबून असते. पण हल्ली अगदी हुबेहूब माणसासारखे दिसणारे रोबाट म्हणजे यंत्रमानव निघाले आहेत हे खरे आहे, इतके की वरवर पाहिले तर त्याच्यात आणि माणसात काहीच फरक जाणवत नाही त्यांना मनुष्याकृती यांत्रव म्हणजेच ह्युमनिफॉर्म रोबाट म्हणतात त्यांच्यात पॉझिट्रॉनिक ब्रेन म्हणजे बऱ्याच अंशी माणसाच्या मेंदूसारखा काम करणारा  मेंदू बसवलेला असतो त्यामुळे ते वागतातही अगदी माणसासारखे येऊन जाऊन त्यांया कृती मात्र असिमॉव्ह यांच्या तीन तत्वावर चालतात ती तीन तत्वे --"
" ती तीन तत्व ऱ्हाउ द्या तुमच्यापाशी पण साहेबांना अशी शंका येतेय की हे सुमंताच बेण हाय ना ते माणूस नसून तुमच ते रोबाटच असल पाहिजे. "
" बरोबर मानाजीराव, काय समजला का आमचा प्रॉब्लेम कदमसाहेब. हा सुमंत म्हणे कधी काही खात नाही, काही पीत नाही आणि झोपतही नाही अस कानावर आलेय सारखा आपला कामच करतोय. बर इतक काम करून पुन्हा कुठ आपल नाव  छापून याव, कुठल्या कोनशिलेवर ते कोराव कुठ आपला फोटो छापून यावा असही त्याला वाटत नाही हे सगळ काही माणसाच लक्षण नाही त्यामुळे आम्हाला शंका येतेय हा काही तरी वेगळाच प्रकार आहे. "
" मग मी काय कराव अशी आपली इच्छा आहे? "
" काही नाही हा सुमंत माणूस नसून रोबाट आहे हे सिद्ध करायच "
" तस केल तर त्यात तुमचा काय फायदा होणार साहेब? "
" अहो अस कस आपल्या भारतीय घटनेनुसार निवडणूक लढवायला तो अपात्र ठरेल ना. " 
" पण साहेब, घटनेत रोबाटचा काही उल्लेख नाही, बाबासाहेबांना कुठ माहीत होत असा काही तिढा पुढ माग निवडणुकीत तयार होईल म्हणून "
" एकदा तुम्ही त्याला रोबाट ठरवा तरी, मग आम्ही बघू कसा त्याचा समाचार घ्यायचा ते "
                                                     +++++++++++++++++++++++++++
    कदमांनी सरळ सुमंतचीच गाठ घ्यायचे ठरवले कारण सांगोवांगीवर विसंबून राहून या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होते. सुमंतचा उल्लेख मात्र जो तो करताना दिसत होता. दोनच वर्षापूर्वी सुमंत कोण हे विचारावे लागत होते आणि आता मात्र या मतदारर्संघात त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचे नावच ऐकायला येत नव्हते. पाटीलसाहेबांनी त्याचा धसका घेतला होता तो काही उगीचच नाही हे त्यांना जाणवलेच.
     सुमंतच्या घरी जाण्यापेक्षा त्याच्या कार्यालयातच जावे अस विचार करून त्यानी त्याला फोन लावला. आणि त्याच्याकडून लगेचच त्याना भेटण्याला होकार मिळाला.
" नमस्कार सुमंतजी, " त्याच्या कार्यालयात प्रवेश करत कदम म्हणाले.
"नमस्कार  कदमसाहेब आणि हे जी वगैरे नको बरका नुसत आपल सुमंतच! "
" अस कस आता तुम्ही खासदार होणार तेव्हां तुमचा मान राखायलाच हवा नाही का "
"  कदमसाहेब, अजून कशाचाच पत्ता नाही त्यात तुमच्या साहेबांच्या पुढे आमच्यासारख्याची काय मात? "
" मग हे उभ राहण्याच नाटक कशाला? "
" हे पाहा कदमसाहेब, मागे औरंगाबादच्या साहित्यसम्मेलनात आपले माननीय मुख्यमंत्रीजीच काय म्हणाले होते की राजकारण हे केवळ टगे किंवा निरुद्योगी लोकांच क्षेत्र व्हायला नको. सुशिक्षित अभ्यासू लोकांनी राजकारणात यायला पाहिजे, खर ना? "
" मग त्यासाठी आमच्या पक्षात आम्ही जागा करू की "
" हे बघा कदमसाहेब, तुमच्या साहेबांच्या जागी आम्हाला उभे करायचा विचार बिचार आहे की काय तुमचा? आणि त्यासाठी श्रेष्ठींची परवानगी आहे का? तुमच्या पक्षात श्रेष्ठींच्या परवानगीशिवाय इकडची काडी तिकडे होत नाही म्हणून विचारतो. देशात लोकशाही आहे म्हणतात पण पक्षात मात्र --- बर ते जाऊद्या मुद्याच बोला"
"   मुद्याचच बोला अस म्हणताय ? स्पष्टच सांगायच म्हणजे  आमच्या साहेबांना शंका येतेय की सुमंत हा माणूसच आहे की - "  कदम जरा अडखळले.
"माणूसच आहे की मशीन असच ना बोला की अडखळू नका. "
" असच म्हणाना नाहीतर काही न खाता, पिता किंवा झोपही न घेता काम करणे माणसासारख्या माणसाला कस जमेल? "
"तुमच्या साहेबांचा काहीतरी गैरसमज होतोय कदमसाहेब. आता खाण्याच म्हणाल तर   राजकारणी मंडळी जस जे दिसेल ते खात सुटतात मग त्यात भूखंडाच श्रीखंड असेल किंवा पेट्रोलपंपाची बासुंदी असो आणि पैशाच तर काही विचारूच नका त्याच्या  कितीही पेट्या पचवायला  कुणाची ना नसते. तशा खाण्याचा मला शौक नाही हे खर आहे. पण त्याचा अर्थ मला खायला काही लागतच नाही अस नाही हे पाहा हे सफरचंद तुमच्यासमोरच खातो " म्हणून समोरच्या परडीतल एक सफरचंद उचलून सुमंतने कराकर तुकडे करत एका दमात संपवले.
" जा तुमच्या साहेबांना जाऊन सांगा की आम्हालाही खायला लागत आणि प्यायला शुद्ध पाणीही चालते अगदी मिनरल वॉटरच पाहिजे असही नाही "  टेबलावरचा पेला उचलून तोंडाला लावत सुमंत म्हणाला.
    सुमंतचा निरोप घेऊन कदम पाटीलसाहेबांच्या बंगल्यात प्रवेश करते झाले त्यावेळी सुनयनाही त्यांच्यासमोरच्या खुर्चीवर बसली होती.
" काय कदमसाहेब, काय म्हणतोय आजच्या दौऱ्याचा अहवाल? "
"  अहवाल काही खास नाही, त्या सुमंतन माझ्यासमोरच एक सफरचंद खाऊन आणि ग्लासभर पाणी पिऊन आपला संशय दूर केला. "
" बसा कदम, सुनयनाला तुम्ही ओळखता ना? "
" वा यांची तर आम्हाला नेहमी चांगलीच मदत होते. यांत्रवांचे मानसशास्त्र या चांगलच जाणतात. "
" जरा चुकीची दुरुस्ती करा कदमसाहेब, यांत्रवांना मन नसत त्यामुळे मानसशास्त्र पण नसते. यांत्रव निर्मितीचे जे तीन नियम असिमॉव्हनी घालून दिले आहेत त्या नियमांच्या मर्यादांविषय़ी मी बराच विचार व अभ्यास केला आहे, त्यामुळे त्या नियमांच्या कक्षेत राहून यांत्रव काय करू शकतील यांची पूर्वकल्पना आम्हाला येऊ शकते. "
" मग आता सुमंतने सफरचंद खाऊन दाखवले आमच्यासमोरच तो पाणीही प्याला म्हणजे तो यांत्रव नाही असेच ना? "
" असे काही खात्रीने सांगता येणार नाही. " सुनयनाने उत्तर दिले.
" यांत्रव निर्मितीत इतकी प्रगती झाली आहे की असे खाणे पिणे करण्यात यांत्रवांना अडचण उपस्थित होईलच असे नाही. "
तेवढ्यात मानाजीरावही तेथे उपस्थित झाले आणि साहेबांकडे वळून म्हणाले, " काय साहेब येवढ प्रेशर घेताय त्या नुकत्याच मिसरुड फुटलेल्या पोराच. मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही अगदी जागेवर बसूब राहिलात तरी तुम्हीच निवडून येणार. "
" मानाजीराव ते सगळ विसरा आता. आता नुकतीच मिसरुड  फुटलेलीच पोर मतदान करणार आहेत त्यामुळे आमच्यासारख्या केस पिकलेल्यांनी गाशा गुंडाळण्याची तयारी केलेली बरी. "
" अस म्हणताय आणि तुमच्या पार्टीन तर सगळी केस पिकलेलीच मंडळी उभी केलीत उगच कुठ नावापुरती तरणी मंडळी दिसताहेत पण ती त्या पिकलेल्यांचीच पोर म्हणून त्यांना चान्स घावलाय, पण ते जाऊद्या मतदारसंघात मुस्लीम किती नवबौद्ध किती बामणं किती चौकशी केलीय का? "
" आता त्या स्ट्रॅटेजीचा  उपयोग नाही मानाजीराव कारण त्या सुमंतासाठी माघार घेणाऱ्यात एक मुस्ली्म, एक नवबौद्ध आणि एक मराठा आहे. आता बोला "
" पण तरीही आम्हाला मात्र वाटत की काय वाटेल ते झाल तरी तुमच्यासमोर त्या कालच्या पोरट्याची दाळ शिजणार नाही हे निश्चित. "
" तुम्ही म्हणता ते खर असेलही तरी हे वारं जे सुरू झालय ते आपण आत्तापासूनच परतवून लावल पाहिजे उद्या सगळीकडे जर रोबाटच उभे राहिले तर निवडणुकीत पैशाचा, जातीचा, धर्माचा कश्शाकश्शाचा प्रभाव पडणार नाही. कारण त्या रोबाटला खाय प्यायलाच लागत नाही तर ते पैसा कशाला जमा करणार? "
" मग चांगलच आहे की साहेब? अहो त्यानी पैसा नाही घेतला तर काम कशी होणार? आणि कामच झाली नाहीत तर पुढच्या वेळी त्यांना कोण निवडून देईल? आता हेच बघा की आता जी काम होतात त्यासाठी मंजूर केलेल्या पैशाचा  किती भाग प्रत्यक्ष कामाला वापरला जातो? खुद्द राजीवजींनीच मागे कबूल केल होत  ना की केंद्राने दिलेल्या पैशातला फक्त आठ ते दहा टक्के पैसाच जनतेपर्यंत पोचतो. त्यामुळे ह्या रोबाटनी पैसाच घेतला नाही तर मधल्या नोकरशाहीला पैसा कोठून मिळणार आणि काम कशी पार पडणार? "
" काय शुद्धीवर आहात ना मानाजीराव? नोकरशहा पैसे खातात त्यातले किती टक्के त्यांच्या खिशात जातात आणि किती आपल्या याचे भान आहे ना? हे रोबाट उद्या राज्य करायला लागले तर स्वत: पैसा खाणार नाहीतच पण नोकरशहांनाही वेसण घालणे त्याना सहज शक्य होईल. वरचे लोक काय करतात हे नोकरशहा पहात असतात. लालबहादुर शास्त्रींच्या काळात जनतेने अगदी आपखुषीने सोमवारचा भात खाणे सोडले होते हे विसरलात की काय? "
" मग तुमच काय म्हणण आहे साहेब? " मानाजीरावना एवढा मोठा नैतिकतेचा डोस पचवणे शक्य नसल्याने त्यांनी साहेबांच्या भाषणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. आणि ही संधी साधून सुनयनान संभाषणाचा धागा उचलण्याचा प्रयत्न केला.
" पण साहेब आपण म्हणता तस अगदी सुमंतला रोबाट ठरवणे आम्हाला शक्य झाले तरी त्याचा कसा काय उपयोग होणार?   
आपले लोक रोबाटला विरोध करतील असे वाटते का तुम्हाला? " ती पुढे म्हणाली. "  युरोप अमेरिकेत अशा गोष्टीला विरोध होतोही पण आपले लोक म्हणजे अगदी सहिष्णू त्यांना आपल्यापेक्षा परक्याचच जास्त कौतुक. आपला सगळा इतिहासच बघाना. सगळा " आ गले लग जा " चाच आहे. तीच गोष्ट रोबाटची होईल. माणसापरीस मेंढर बरी अस महा कविराजानी म्हणून ठेवलच आहे त्या ऐवजी मानसापरीस रोबट भली अस म्हणायला आपले लोक कमी करणार नाहीत कधी नाही तो परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा  एका साहेबांनी उचलून धरला पण तेही आता त्यांच्याच वळचणीला जाऊन उभे आहेत. "
" सुनयना तू म्हणतेस ते ठीकच आहे पण आता आपली मीडिया आहे ना आपल्या मदतीला. त्यांच्या जोडीला आपले दोस्त नसले तरी आपल्याला नेहमी मदत करणारे डावे पण आहेतच. माणसाची जागा यांत्रव घेतात म्हटल्यावर बघ कसे चवताळून उठताहेत. तुम्ही फक्त एकदा सिद्ध करून द्या की सुमंत रोबाट आहे म्हणून मग पुढच बघतो आम्ही. " साहेबानी समारोप केला. 
        
                                                                            ++++++++++++++++++++++++

" सुमंत यांत्रवच आहे हे सिद्ध करायला दोन मार्ग आहेत " सुनयना कदमाच्या सुसज्ज वातानुकूलित कार्यालयात बसून बोलत होती.
" बोल बोल मी ऐकतोच आहे. पाटीलसाहेब आता या प्रश्नाची तड लावल्याशिवाय आपला पिच्छा सोडणार नाहीत. "
" आता तुमच्यासमोरच सुमंतने खाण्यापिण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले पण त्यामुळे तो यांत्रव नाही हे सिद्ध होऊ शकत नाही.   एक मार्ग आहे पण तो अशक्य कोटीतला म्हणजे शारीरिक तपासणीचा त्यासाठी एक तर त्यांची क्षकिरणानी तपासणी करावी लागेल किंवा मग त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीराची अंतर्गत तपासणी करायची. या दोन्ही गोष्टींना ते तयार होणार नाहीत आणि अशा प्रकारची मागणी करणारेच कायद्याच्या कचाट्यात सापडतील. सुमंत त्यानाच बेअदबीच्या गुन्ह्याखाली न्यायालयापुढे खेचतील आणि त्यांची निवडणूक राहील बाजूला आणखी भलत्याच खेंगट्यात पाटीलसाहेब अडकतील. "
" आता मानसशास्त्रीय पद्धतीने हे करायचे म्हणजे सुमंतच्या वर्तणुकीची पाहणी करायची. असिमोव्हनी घालून दिलेले तीन नियम तो पाळतो का हे पहायचे आणि त्यापैकी एकाद्याचा भंग त्याच्या हातून झाला तर तो रोबाट नाही हे उघडच आहे. दुर्दैवाने या तिन्ही नियमांचे पालन त्याने केले तरी तो यांत्रवच आहे असे मात्र खात्रीने सांगता येणार नाही, खरी गोची आहे ती तेथेच"
" काय? काय म्हणतेस तू? काही कळत नाही. नियमांचे पालन केले तरी तो यांत्रव ठरत नाही? "
" हो असेच! नियम मोडले तर मात्र निश्चितपणे मानव पण नियम मोडले नाहीत तर मात्र मानवही असू शकतो किंवा यांत्रवही. "
" शाब्बास म्हणजे इतकी डोकेफोड करून निष्कर्ष काय काढलास? "
" हे पाहा सर, पहिल्या नियमानुसार यांत्रव मनुष्यप्राण्याला इजा करू शकत नाही किंवा त्याच्या कृती न करण्याने मनुष्यप्राण्याला इजा पोचणार नाही याची दक्षता घेतो. म्हणजे तो माणसावर हल्ला करणार नाही पण त्याचबरोबर एकाद्या दुसऱ्या माणसाने त्याच्या धन्यावर हल्ला केला तर मात्र त्या माणसाला तसे करण्यापासून रोखण्यासाठी तो त्याला पकडून ठेवेल पण तेसुद्धा त्या माणसाला इजा होणार नाही याची काळजी घेऊनच. दुसऱ्या नियमानुसार त्याला माणसाने केलेल्या कोणत्याही आज्ञेचे पालन करणे आवश्यकच आहे मात्र तसे करताना पहिल्या नियमाचे उल्लंघन व्हायला नको. म्हणजे समजा मी यांत्रवाला माझ्या पोटात सुरी खुपस असे सांगितले तर त्यात पहिल्या नियमाचे उल्लंघन होत असल्याने तो हा माझा हुकूम पाळणार नाही. आणि तिसऱ्या नियमानुसार यांत्रवाने स्वत:चेही संरक्षण केलेच पाहिजे फक्त ते करताना पहिल्या आणि दुसऱ्या नियमाचे उल्लंघन मात्र होता कामा नये. उदाहरणार्थ मी यांत्रवाला तिसऱ्या मजल्याबरून उडी मारायला सांगितले तर तो तसे करणार नाही कारण त्याला स्वत:चे संरक्षण करणे भाग आहे आणि  त्याने उडी न मारल्यामुळे मला कुठलाच धोका संभवत नाही. पण आता या विवेचनावरून हेही लक्षात येईल की असे वर्तन करणाऱ्यावर यांत्रव असे शिक्कामोर्तब करता येणार नाही कारण  कुठल्याही सभ्य माणसाचे अगदी तुमचेसुद्धा वर्तन असेच असेल म्हणजे अस बघा तुम्हीही उगीच एकाद्याला इजा पोचवणार नाही, अगदी तुमच्यावर हल्ला करणाऱ्यालाही. म्हणजे तुम्हीही असिमॉव्हचे पहिले दोन नियम पाळताच. आणी स्वसंरक्षण ही तर आप्ली उपजत प्रवृत्तीच असते म्हणजे तिसराही नियम आपण पाळतो. म्हणजे तिन्ही नियम पाळतो/ते म्हणून एकादी व्यक्ती रोबाटच असेल असे काही सिद्ध होत नाही."
 " पाटीलसाहेबांनी एकूण भलत्याच कोड्यात टाकले आहे आपल्याला. " कदमसाहेब वैतागून उद्गारले.
                                                          ++++++++++++++++++++
 " काय हो पितळे मी काय ऐकले ते खरे आहे का? "
"  काय ऐकलेत जोशीबुवा तुम्ही सांगा तरी खरे, मग करू या शहानिशा खरे की खोटे याची "
" अहो म्हणजे हे मी म्हणत नाही बरका पाटलांच्या पक्षातल्या लोकांचीच काही तरी कुजबुज चाललेली होती त्यादिवशी की आपले सुमंतसाहेब म्हणे माणूसच नाहीत. "
" अरे काय वेड लागले की काय जोशा तुला, सुमंत माणूस नाहीत तर मग काय गाय आहे की बैल? कठीण आहे बुवा तुला कसल्या शंका येतील काही सांगता येत नाही. अरे बर झाल माझ्याकडेच बोललास नाहीतर भकून जायचास कुठेतरी. "
" पितळ्या उगीच नकोस आपली अक्कल पाजळूस  हा मुलाणी येतोय ना सुमंतकडे दुधाचा रतीब आहे त्याचा! विचार त्यालाच "
" अहो मुलाणी भाईसाहेब, हे जोशी काय म्हणतात बघा "
" बोला जोशीसाहेब काय म्हणता? "
" काही नाही आम्हाला कुठुनतरी असे कळलेय की ते सुमंत आहेत ना --"
" हां जी उनका क्या? "
" काही नाही असे म्हणतात की ते माणूस नाहीत, "
" अगदी बराबर बोललात साहेब ते माणूस नाहीतच "
" बघा पितळे आले की नाही सत्य बाहेर "
" अहो जोशी मी काय बोललो नीट सगलं ऐकून तर घ्या. सच्ची सुमंतसाहेब माणूस नाहीत अरे ते देवमाणूस आहेत आहात कुठ, अल्ला भला करे उनका. अरे तो देवमाणूस होता म्हणून हा अब्दुल दिसतोय तुम्हाला इथ रस्त्यावर नाही तर केव्हांच वाट लागली असती आमच्या सगळ्या फॅमिलीची. जाऊंद्या त्यांच्याकडे जायला पाहिजे लवकर मला, त्यानी नाही म्हटले तरी आमच्या गल्लीतल्या पोरांना मी त्यांचा प्रचार करायला घेऊन जाणार आहे. अच्छा निघतो मी"
" आता झाली का खात्री जोशीभाऊ? "
" माझ समाधान अस नाही होणार मी प्रत्यक्ष पाटलांच्या बंगल्यावरच जाऊन विचारणार आहे "
" अरे काय येडा की खुळा, तिथ कोण विचारणार आहे तुला. आणि अशा गोष्टी काय कुणी सांगत असत? बर जा आणि घे करून खात्री आणि मग मला पण सांग "
                                                                         ++++++++++++++
" नमस्कार सोटेसाहेब, काय पाटीलसाहेब कुठ दिसत नाहीत. "
" शाब्बास पितळेसाहेब, साहेबांना आता इथ बसायला वेळ कुठला मिळायला आता त्यांच्या सभा जिकडेतिकडे चालणार, परत कधी पक्षश्रेष्ठींच्या बरोबर दौरे करावे लागणार काही विचारू नका बघा"
" तरी पण एक  एक विचारू का? "
" विचारा की आम्ही कशाला बसलोय इथे "
"  बरोबर, सद्ध्या तरी दिसताय तुम्ही आम्हाला तेव्हा विचारून घेतो. "
" अस काय म्हणता राव, तुमच कुठल काम केल नाही साहेबांनी सांगा बर "
" खर आहे तुम्ही म्हणता ते, त्यांच्या कृपेवर तर चाललाय आमचा कारखाना बर ते जाऊ दे, आम्हाला काय कळलेय ते खर आहे का की ते सुमंत तुमच्या साहेबांविरुद्ध उभे राहिलेत ना ते म्हणे माणूसच नाहीत. "
" आत्ता मात्र कमाल झाली तुमच्याही कानापर्यंत आले का हे? "
" अहो अशा गोष्टी कुठ लपून राहतात, पण आम्हाला उत्सुकता आहे ती याची की ते माणूस नाहीत मग काय घोडा आहेत की गाढव ? दिसतात तर अगदी माणसासारखे, पण आता मुलाणी म्हणत होता"
" मुलाणी म्हणजे तोच ना दूध घालतो त्यांच्याकड? "
" हो हो बरोबर तो तर म्हणत होता की ते तर देवमाणूस आहेत म्हणे. "
" बरोबर तो असच म्हणणार चार पैसे दिले की माणस मिंधी होतात आणि मग असच काहीतरी बडबडतात. आता आम्ही पण  आमच्या साहेबांना देवमाणूस म्हणणाऱ्या शंभर माणसांची पलटण तुमच्यापुढे आणून उभी करतो. "
" सोटेसाहेब, मला काय त्याचा अनुभव नाही का? साहेबांच्या कृपाप्रसादावर तर आमचा  डोलारा संभाळतोय, बर ते जाऊद्या मग त्या सुमंतविषयी काय म्हणताय? "
" आता हे तुम्हीच विचारल म्हणून सांगतो, उगीच याचा बभ्रा नको बरका. आम्हाला अस कळलेय की हे सुमंत म्हणजे एक रोबाट आहेत. रोबाट म्हणजे काय माहीत आहे ना? "
" अहो आता रोबाट फारच कॉमन झालेत हल्ली अगदी आमच्या कारखान्यात सुद्धा काही रोबाट आहेत "
" काय सांगताय? "
" मग काय उगीचच कशाला सांगू? अहो रोबाट ही यंत्रेच असतात आता अगदी नवीन रोबाट निघाले आहेत ना ते दिसतातही अगदी माणसासारखे आणि वागतातही तसेच. पण सुमंतकडे पाहिल्यावर काही वाटत नाही ते रोबाट असतील अस. आणि मी म्हणतो हा रोबाट काय बरोबरी करणार आपल्या साहेबांची "
" आमच पण तेच म्हणण आहे की रोबाटनी निमूटपणे माणसान सांगितलेल काम कराव उगीच माणसाशी बरोबरी करायला जाऊ नये. "
" खर आहे जर अस झाल तर मग रोबाटच राज्य करायला लागतील माणसांवर हे काही बरोबर नाही. म्हणजे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत काढली आणि त्यातून इतक्या शर्थीने स्वातंत्र्य मिळवले ते काय पुन्हा रोबाटच्या गुलामगिरीत पडायला? ते काही नाही साहेबांनी याच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे म्हणाव"
" तुम्ही अस म्हणाल याची खात्रीच होती आम्हाला, तुमच्यासारखेच समविचारी लोक एकत्र येऊन रोबाटविरोधी आघाडीच करायला हवी. नाहीतर पुन्हा एकदा  पारतंत्र्यात पडू आपण "
" पण सुमंत हे रोबाटच आहेत याचा खात्रीलायक पुरावा आहे का आपल्यापाशी नाहीतर उगीचच साप म्हणून भुई बडवत बसू आपण "
" सध्या इतर व्यापाबरोबर हा पण उद्योग लावून घेतलाय साहेबांनी. त्या सुमंतच रहस्य बाहेर आणल्याशिवाय चैन पडणार नाही त्यांना पण तोपर्यंत तुम्ही रोबाटविरोधी आघाडी मात्र बनवण्याच्या माग लागा. "
" त्याची काळजी नको आता त्याच तयारीला लागतो बघा. "
                                                  ++++++++++++++++++++++++++++++
 "साहेब हा माणूस आपल्या बंगल्याभोवती घुटमळत होता, " एका मळकट कपडे घातलेल्या माणसाची गचांडी धरून त्याला ओढत आणीत पाटलांचे व्यक्तिगत सचिव सोटे त्याला पाटलांच्यासमोर ढकलत म्हणाले, त्या माणसाचे केस अस्ताव्यस्त वाढलेले होते. त्याचा चेहरा ओढलेला, डोळे लाल झालेले आणि खालचा ओठ मध्ये फाटलेला दिसत होता.
"कोण रे तू आणि इथे काय करतो आहेस सोटे तुम्हाला कुठे दिसला हा "
"त्याच काय झाल पाटीलसाहेब, मी आपल्या कार्यालयात आपल्या मतदारसंघात कसा प्रचार करायचा याची ट्रॅजेडी आपल्या पोरांना समजावून सांगत होतो"
" अहो सोटे ट्रॅजेडी नव्हे स्ट्रॅटेजी आल का लक्षात?   इंग्लिश शब्द जरा नीट वापरायला शिका नाहीतर खरच आमचीच ट्रॅजेडी करून टाकाल., "
" बर काय सांगत होतो हं तर त्यावेळी आपल्या सिक्युरिटीतील एका पोलिसाने याला पकडून आणले आणि माझ्या ताब्यात दिले."
" काय रे पोरा मार खायचा आहे का? "
" माफ करा साहेब पण आपल्या निवडणूक मोहिमेत आपल्याला थोडीफार मदत करावी या उद्देशाने येथे मी आलो पण आपल्यापर्यंत कसे पोचावे काही समजत नव्हते त्यामुळे सिक्युरिटीच्या लोकांना वेगळाच संशय आला, "
" बर मग तू काय मदत करणार आहेस आम्हाला? "
"  साहेब अस सगळ्यांसमक्ष नाही सांगता येणार "
" बर आहे सोटे---"
" पण साहेब तुमच्या सिक्युरिटीचे काय? आम्ही येथे आहोत म्हणून सिक्युरिटीचे लोक बाहेर उभे आहेत पण आम्ही येथून गेलो आणि---"
" आल लक्षात सोटेसाहेब, माझी झडती घ्यायला सांगा पुन्हा एकदा फारतर कारण आत शिरताना घेतलीच आहे. "
" सोटे हा म्हणतोय ते बरोबर आहे तुम्ही जाऊ शकता आम्ही दोघेच बोलतो"
                                                          +++++++++++++++++++++
"दैनिक जनमत ना? "
" हो कोण बोलतय? "
" मी सर्वोत्तमराव---"
" नमस्कार नमस्कार पाटीलसाहेब, बोला काय हुकूम आहे? "
 " नमस्कार दराडे एक मोठी बातमी आहे एकदम भंडाफोड म्हणा ना "
" सांगा सांगा साहेब "
" अहो दरार्डे आमच्या विरुद्ध उभा आहे तो कोण आहे माहीत आहे का? "
" हो तर. ते तर सुमंत साबळे ना? "
" अहो ते साबळे कोण आहेत माहीत आहे का? लोकांना वाटतेय तो देवमाणूस आहे म्हणून पण अहो तो माणूसच नाही. आहात कुठ? "
" काय सांगताय काय साहेब? माणूसच नाही मग काय खरच देव आहे की काय? ही मात्र खरच भंडाफोड न्यूज आहे खरी. उगीचच नाही भगवंतानी म्हणून ठेवलय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर ---"
" अहो ग्लानी धर्माला नाही आली पण तुम्हाला मात्र येईल बातमी नीट ऐकाल तर. अंदरकी बात अशी आहे की हा साबळे चक्क यंत्रमानव आहे म्हणजे रोबाट. उगीच सांगत नाही. येऊद्या बातमी उद्याच्या जनमतमध्ये. वाहिन्यावरही येईलच "
" पण साहेब एवढी मोठी बातमी द्यायची म्हणजे काहीतरी ठोस पुरावा हवा तशीच कशी छापायची आम्ही फारतर तुमचा हवाला देऊन छापतो"
" छे छे माझ नाव येऊ देऊ नका. आज नुसती मोघम बातमी छापा. उद्याच सर्व वाहिन्यांच्या वार्ताहरांना बोलावून या प्रकरणाचे  त्यांच्यासमोरच दूधका दूध आणि पानीका पानी  आम्ही करू याची खात्री बाळगा. "
"मग ठीक आहे आपण म्हणता तसेच होईल, बरे आहे मग ठेऊ फोन? "
" ठेवा, धन्यवाद, उद्या कशी बातमी येतेय बघू या"
"त्याची काळजी करू नका साहेब बराय ठेवतो फोन"
                                                                    ++++++++++++++++++ 
" दैनिक जनमत ना? "
" हो मी जनमतचा संपादकच बोलतोय कोण बोलतेय "
" नमस्कार मी सुमंत साबळे बोलतोय "
" नमस्कार नमस्कार सुमंतसाहेब बोला काय सेवा करू? "
"  संपादकसाहेब, धन्यवाद आपल्या सेवेच्या आश्वासनाबद्दल! आपल्या दैनिकात आलेल्या एका बातमीविषयी बोलायचेय. त्या बातमीत माझ्याविषयी काही मजकूर आला आहे. "
" सुमंतसाहेब आता या रणधुमाळीत सगळ्या पक्षांच्या उमेदवारांविषयी मजकूर येणारच आणि तुमचा तर अगदी  गौरवपूर्ण उल्लेख आहे त्या बातमीत की तुम्ही म्हणजे  माणूस नव्हे तर देवमाणूसच आहात  म्हणून "
" हो पण त्यातील एक वाक्य जरा अतिगौरवपूर्ण वाटले त्यात तुम्ही म्हटले आहे. "
" सुमंत यांनी लोकसेवेचा इतका ध्यास घेतलाय की त्यापुढे त्यांना खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध नसते. काही जणांच्या मते तर या प्रकारचे गुण अमानवीच असावेत. म्हणजे सुमंत हे या ग्रहावरचे नसावेतच किंवा ते एकादे यंत्रमानवच असावेत " हेच वाक्य म्हणताय ना सुमंतसाहेब? "
" अगदी बरोबर दराडेजी वाक्य अगदी पाठच केलेल दिसतेय "
" नाही हो साहेब पेपर पुढ्यातच ठेवून बसलोय आणि त्यातूनच वाक्य वाचले बाकी काही नाही "
" पण काहींच्या मते म्हणजे कोणाच्या हे उघड नाही केल तुम्ही दराडेसाहेब"
" त्या व्यक्तीने त्यांचे नाव सध्या उघड करू नये अशी विनंती केलेली आहे. "
" मग आम्हाला तुमच्या वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. "
" सुमंतसाहेब, बऱ्याच वाहिन्याही आपल्या दिनक्रमाच्या चित्रफिती दाखवून केवळ यांत्रवच हे करू शलेल अशी मल्लिनाथी पण करणार आहेत. आणि आम्ही काही तुम्हाला यांत्रव म्हटले नाही म्हणतही नाही. आणि ज्या व्यक्तीने हा अंदाज व्यक्त केला आहे तीच त्याविषयी पुरावाही देणार आहे अगदी दोनच दिवसात. "  
                                                                             +++++++++++++++++
    पाटलांनी बार तर जोरात उडवायचे ठरवले होते त्यांनी सरळ सुमंतला आव्हाबच दिले होते की त्याने त्यादिवशी सकाळी क्रांतिचौकात येऊन आपण यांत्रव नाही हे सिद्ध करावे. अर्थात या अगोदर जोशींच्या यांत्रव विरोधी समितीनेही हवा तापवली होतीच. क्रांतिचौकात भला मोठा फलक लावून ठेवला होता. आणि त्यावर लिहून ठेवले होते,
" आता आपल्यावर यंत्रमानव राज्य करणार. आपण यंत्रमानवांचे गुलाम होणार की आपण आपले राज्य चालवणार याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे. सुमंतजी आपण यांत्रव आहात की मानव? सिद्ध करून द्या की आपण मानवच आहात. "
   सर्व वाहिन्यांवर तर एकच बातमी पुन्हापुन्हा सुमंतच्या दिनक्रमाची चित्रफीत दाखवून " हा देव की देवमाणूस  की यांत्रव? " या शीर्षकाची पुनरावृत्ती चालू होती.
    तेवढ्यात जोरदार ढोल ताशे यांचा आवाज ऐकू आला आणि पाठोपाठ " सर्वोत्तमरावांचा विजय असो " असा जयजयकार ऐकू आला आणि पाठोपाठ सजवलेल्या उघड्या गाडीतून पाटलांचे चौकात आगमन झाले. गाडी चौकात थांबली आणि सर्व जयजयकार हाताने थांबवीत पाटील म्हणाले,
  " मित्रहो, आमचे प्रतिस्पर्धी सुमंत यांच्याविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यांना कामापुढे खाण्याची वा पाणीही पिण्याची शुद्ध नसते आणि रात्र रात्र झोपही न घेता ते सारखे कामच करत असतात असे आमच्या कानावर आले आहे. पण त्यांच्याविषयी आम्हाला एक बारीक शंका आहे ती म्हणजे ते माणूसच आहेत की नाही याची. कारण तज्ञांच्या मते असे गुणधर्म फक्त यंत्रमानवातच असू शकतात. आमच्याकडे आमचे सन्माननीय मित्र जोशी त्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन आले आहेत. त्याला ते यांत्रव विरोधी समिती असे म्हणतात. त्यांच्या मते आपल्यावर यांत्रवांनी राज्य करणे त्यांना मान्य नाही. 
  " आणि आम्हालाही ते मान्य नाही. " प्रसिद्ध कामगारपुढारी भाई लालाजी कंटक एकदम तेथे उपस्थित होत बोलू लागले. " मानवाची जागा यांत्रवांनी घेणे आम्ही कधीच मान्य करणार नाही. "
   तेवढ्यात अगदी शांतपणे सायकलवरून सुमंतानी तेथे प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे प्रचारकही सायकलवरूनच मोठ्या संख्येने तेथे उपस्थित झाले.
  " नमस्कार " आपली सायकल थांबवून चौकात उभे राहत तेथील गर्दीला उद्देशून सुमंत म्हणाले.
" इतक्या सगळ्या लोकांनी संशय व्यक्त केला तेव्हां त्याचे निराकरण झालेच पाहिजे असे आम्हालाही वाटते. सांगा कोणते दिव्य आम्ही केले तर तुम्हाला मान्य होईल की आम्ही मानवच आहोत, आम्ही ते करायला तयार आहोत. आमचे मित्र सर्वोत्तमजी यांनीच आम्हाला सुचवावे. "
    पण सुमंतांचे हे वाक्य पूर्ण होतानाच एक अस्ताव्यस्त कपडे घातलेला दाढी वाढलेली माणूस पुढे आला. त्याचा खालचा ओठ फाटलेला होता. पाटलानी त्याला लगेच ओळखले आणि एक डोळा झाकून खूण केली आणि तो माणूस एकदम सुमंतच्या पुढ्यात जाऊन आपली छाती पुढे काढून  उव्हा राहिला.
" यांना काहीतरी विचारायचे आहे असे दिसते. "त्याच्याकडे पाहत सुमंत म्हणाले, "बोला काय विचारायचे आहे ते निःsहंक विचारा " पण झिंगल्यासारखा आविर्भाव करत तो पुढे वाकला आणि म्हणू लागला.
 " ए मार मला मार मला "   सुमंत एकदम हा माणूस पुढे आल्यामुळे गोंधळून गेले.
" अरे पण तू माझ काय बिघडवल आहेस ?मी तुला कशाबद्दल मारू? " भानावर येत ते म्हणाले.
" चूप साल्या, माझ ऐकतोस की नाही मार मला येथे मारतोस की नाही? " आपली मान पुढे करत डोक्यावर बोट ठेवत तो म्हणाला.
"अरे पण का मी तुला मारू? तू माझ काय वाकड केले आहेस? " पुन्हा सुमंतने पूर्वीच्याच शांत स्वरात विचारले.
" मार म्हणतो ना, तू यंत्रमानवच आहेस म्हणूनच मानवाला म्हणजे मला मारत नाहीस खरे ना? मार मला आणि कर सिद्ध की तू यांत्रव नाहीस नाहीतर सर्वोत्तमराव म्हणतात तेच खरे आहे की तू यांत्रवच आहेस "
पण त्या गबाळ्या माणसाचे ते वाक्य पुरे होते न होते तोच अस्तन्या सावरत आपल्या मुठीने सुमंतने असा काही जोरदार ठोसा त्या माणसाच्या डोक्यावर लगावला की त्या धक्क्याने  भेलकांड्या खात तो कुठल्याकोठे पार लांब जाऊन पडला.
 " लोकहो पाहिलेत ना आता तरी खात्री पटली ना की सुमंत यांत्रव नाहीत, माणूसच आहेत म्हणून? काय पाटीलसाहेब, जोशीजी पाहिले ना? " अचानक गर्दीतून तेथे उपस्थित होत सुनयना उद्गारली. आणि सायकलच्या घोळक्यातून एकच ध्वनी उमटला, "सुमंतसाहेबांचा विजय असो"
"पाटील आणि त्यांचे पाठिराखे यांनी केव्हांच तेथून पळ काढला होता.
                                                              +++++++++++++++++
 " पण सुनयना मला हे समजत नाही " कदमसाहेब सुनयनाबरोबर कार्यालयात बसून बोलत होते.
 " काय समजत नाही? " हसत हसत सुनयनाने विचारले.
 " तूच सांगितल्याप्रमाणे यांत्रव मानवावर हल्ला करूच शकत नाही ना मग सुमंतने त्या गबाळ्या ओठतुटक्यावर कसा काय हल्ला केला? त्याला चांगलीच इजा झाली असणार मग तुझ्या त्या असिमोव्हनी घालून दिलेल्या नियमांचे काय झाले? यांत्रव माणसाला इजा करूच शकत नाही असा तुझा सिद्धांत सांगतो ना? "
" होय कदमसाहेब, नियम खरा आहे आणि सुमंतने त्याचे उल्लंघनही केले नाही "
" कसे काय बुवा? "
" अहो कदमसाहेब सुमंतने ज्याला ठोसा मारून इजा केली तोही यांत्रवच होता आणि हे सुमंतला माहीत होते म्हणूनच त्याला ठोसा मारून इजा करायला सुमंतला काही अडचण भासली नाही. " सुनयनाने हसत हसत उत्तर दिले.
" काही समजले नाही बुवा काय भानगड आहे ती "
" कदमसाहेब, सुमंतचे पिताजी एक नामवंत रोबाटतज्ञ आहेत. त्यांना युद्धात अपंगत्व आल्यावर त्यांनी  आपल्या ज्ञानाचा उपयोग करून जो हुबेहूब मानवाकृती यांत्रव तयार केला तोच हा सुमंत. सुमंत म्हणजे त्यांचा मानसपुत्रच म्हणाना. पाटीलसाहेब निवडणुकीच्या रणधुमाळीत सुमंताचे संकट लोकांचा दबाव आणून दूर करणार असे दिसल्यावर त्यांनी आणखी एक यांत्रव तयार केला आणि त्यानेच पाटलांकडे जाऊन आपण सुमंतचे रहस्य उघड करतो हे त्यांना पटवून दिले. त्यादिवशी चौकात घडलेला सगळा बनाव सुमंतच्या पिताजींच्या प्रेरणेने घडला होता  पण पाटलांना मात्र तो आपणच घडवत असून त्यात सुमंतला हार खावी लागणार अशी खात्री वाटत होती. प्रत्यक्षात झाले बरोबर उलटे आणि आता पाटील तोंड बाहेर काढायला तयार नाहीत., पण तुम्हाला काय वाटते कदमसाहेब झाला तो प्रकार योग्यच झाला की नाही.
" अर्थातच, शेवटी विजय सत्प्रवृत्तीचाच व्हावा अशीच आपल्यासारख्या सामान्य माणसाची इच्छा असते होय की नाही सुनयना?"

मूळ कल्पना आयझॅक असिमोव्ह यांच्या "Evidence" या कथेतून घेतली आहे मात्र हे त्या कथेचे भाषांतर नाही.