कहाणी

दूर दूर च्या क्षितिजावरती
सांज सावळी जाते विरुनी
मनात माझ्या रात्र काळी
दीप स्वप्नांचे उजळित येई ।

नात्यांचे हे बंध रेशमी
सप्तरंगी तो गोफ विणती
जिवनाच्या वाटेवरती
सुख-वेदना सवे चालती ।

नेत्री माझ्या मेघ दाटती
जन्माचे ओझे श्वास पेलती
अनामिक तो सल जागवी
नाते असे माझे स्मरणांशी ।

कधी गुंतुनी मन हे जाई
कधी सारी नाती तुटती
मैत्र जिवांचे  कधी भासती
अनोळखी कधी सारे दिसती ।

रीती-प्रितीच्या - प्रांगणी
भावनांचे - रंग खुलती
रेशमी धागे गुंफत जाती
सुख-दुः खांची ही कहाणी ।