धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही - ऱ्हुदयी या उधाणतो ।
स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद या तनूवरी विसावतो ।
उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।
झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।
विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
न्हाउनी प्रीतीत मन - मोगरा ही उमलतो ।
बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
बहरते रात राणी,अन चाफा दरवळतो ।