गजरा

रोज इथेच असतो मी... ह्या चौकात
गजरे घेणाऱ्यांना न्याहाळत

कित्ती प्रकारचे लोक रोज येतात....

कुणी बंद खिडकी थोडीच उघडत गजरा घेतं
कुणी बाईकवरून उडत उडत गजरा घेतं
कुणी फक्त स्वत:साठी गजरा घेतं
तर कुणी तमाम काकवा, मावश्यांसाठी गजरा घेतं

कुणी खास तिच्या लाडिक बटांसाठी गजरा घेतं
तर कुणी केवळ तिच्या हट्टासाठी गजरा घेतं

मलाही वाटते आपण पण न्यावा गजरा घरी
आपणही पाहू की काळ्या नभातल्या चांदण्यांच्या सरी

तसा रोज घेतोच सुगंध आपण गजऱ्याचा भरभरून
पण वाहिलेल्या फुलाचा सुगंध वेगळाच... टाकेल ऊर भरून

क्वचित मी घेउन जातोही घरी कोमेजलेला गजरा
ती काही म्हणत नाही पण बोलतोच की चेहरा

रोजच घडत असं की गजरा न्यायला मिळत नाही
ह्याला चांगलं म्हणावं की वाईट... मला काही कळत नाही

जाऊदे फारसा विचार करू नका... सगळं सोडून द्या
दहाला चार देतो ताई... विचार नका करू... घेऊन जा