ह्यासोबत
6056 – 6056 – 6056 – 6056. सुमारे अनंत वेळा हा नंबर डायल करुनही पुन्हा पुन्हा आपला तोच "बीप-बीप" आवाज ऐकून मॅंडी वैतागून गेला होता. असं अजून किती वेळा होतंय याची वाट बघत, आपल्या मागे येऊन, सुमित केव्हाच उभा राहिला आहे याचं भानसुद्धा त्याला नव्हतं. शेवटी धीर संपला आणि हसणंही आवरता येईना, तेव्हा मॅंडीच्या डाव्या दंडावर थाप मारून सुमित म्हणाला,
"चिल मॅंडी चिल, काय करतो आहेस तू? "
"अरे यार, साला गेला तासभर मी हेल्प डेस्कचा नंबर फिरवतो आहे. माहिती नाही काय भानगड आहे. लागतच नाहीये. "
"कसा लागेल? तू नंबर नेमका कुठे फिरवतो आहेस, पाहिलंस का? "
ओह... शीट. आत्ता कुठे मॅंडी भानावर आला. डेस्कवरच्या फोनचा रिसिव्हर कानाला लावून मॅंडी चक्क त्याच्या कंप्युटरच्या की-बोर्डवरचे आकडे फोन नंबर म्हणून डायल करत होता. असं कितीही वेळ करत राहिलं, तरी जगातला कोणताच फोन कधीच लागणार नव्हता. सुमितने मॅंडीचा फोन घेतला आणि 6056 फिरवून त्याच्या हातात दिला. त्याच्या मेलबॉक्समध्ये झालेल्या एका "मेजर झोल" ची तक्रार हेल्प डेस्कवर नोंदवून मॅंडीने फोन ठेवला आणि तो तडक कॉफी पिण्यासाठी म्हणून उठला.
वाफाळलेल्या कॉफीचे दोन घोट आणि एक सिगारेट हे संयुगच कदाचित आता आपल्याला भानावर आणेल असं वाटून त्याने पॅंट्रीचा रस्ता पकडला. "सी. सी. डी. " मधून खास विकत घेतलेला, त्याच्या आवडीचा कॉफीचा कप त्याने डेस्कवरून उचलला. नक्कीच आज काहीतरी गंडतंय. आजपासून का, गेले काही दिवस काहीच धड होत नाहीये. सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर मंदार गोडसे यांचं डोकं काही ठिकाणावर नाही. विचाराच्या कोणत्याशा तंद्रेमध्येच तो पॅंट्रीकडे गेला असावा. कारण पॅंट्रीमध्ये पोचल्या पोचल्या त्याने हातातला रिकामा कप, तसाच गरम करण्यासाठी ओव्हनमध्ये टाकून दिला. 30 सेकंदाची वेळ ठरवून दिली आणि तो तसाच कॉफी गरम होण्याची वाट बघत बसला. "बीप-बीप" आवाजानंतर त्याने कप ओव्हनमधून बाहेर काढला आणि कॉफी पिण्यासाठी ओठाला लावल्यावर त्याच्या लक्षात आलं, कप मध्ये कॉफी नव्हतीच. शेवटी पुन्हा एकदा वैतागून कॉफीची कल्पना तशीच सोडून तो जागेवर येण्यासाठी निघाला.
दोन "S1P1" दर्जाचे डिफेक्टस गेले तीन दिवस त्याच्या जादूई स्पर्शाची वाट बघत होते.
S1P1- S म्हणजे "सिव्हियरिटी" अर्थात "चिताजनक स्थिती" आणि P म्हणजे "प्रायोरिटी" अर्थात "तातडीची गरज". 1 ते 5 ची मोजपट्टी घेतली, तर त्या मोजपट्टीवर या S आणि P मध्ये सर्वधिक महत्वाचे असणारे कोणतेतरी दोन डिफेक्टस त्याच्या नावावर नोंदलेले होते. अजून दोनच दिवसांचा वेळ उरला होता आणि हे कोडं उलगडण्याचा कोणताही मार्ग अजून त्याला दिसलेला नव्हता. गेल्या दोन वर्षांत मिळून सुमारे 20 संगणक अभियंत्यानी अनेक वेळा या कोड ला हात लावला असेल. त्यांच्यातल्या कोणीतरी केव्हातरी करून ठेवलेली चूक निस्तरायची जबाबदारी आज मंदारवर आली होती. ही चूक त्याला नुसती निस्तरायची नव्हती, तर हजारो ओळींच्या या कोडबेस मध्ये चूक नेमकी कुठे झाली आहे हे शोधून काढून मग ती दुरुस्त करायची होती. हा विचार चालू असतानाच, मॅंडीने कोड मध्ये पुन्हा एकदा बुडून जायचं ठरवलं. अंगातल्या जॅकेटचं हुड त्याने डोक्यावर ओढलं, त्यावर कॅप घातली, आणि त्याच्यावर हेडफोन्स लोटून दिले. असं केलं, की जबरदस्त एकतानतेने काम होतं, असा त्याचा ठाम समज होता. कानावर ढाण ढाण आदळणारं मेटल या प्रकारचं पाश्चात्य संगीत आणि समोरच्या पडद्यावर सरकत जाणारा कोड... आज गणित सोडवूनच उठायचं असा मॅंडीचा निश्चय.. असा साधारण तासभर गेला आसावा.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++
अचानक कोणत्यातरी धक्क्याने मॅंडीला या विचारांच्या तंद्रीतून बाहेर काढलं. त्याच्या मोबाईलच्या व्हायब्रेटरने त्याला जागं केलं होतं. फोनवरचा नंबर दिसत नव्हता कारण फोन बहुधा आंतरराष्ट्रीय होता.
"नमस्कार सर, मी मंदार गोडसेंशी बोलू शकते का? "
"बोलतोय", असं म्हणता म्हणताच हा फोन कट करण्याची तयारी मंदारने मनातल्या मनात सुरू केली होती. आजच्या दिवसात क्रेडिट कार्ड विक्रीसाठी त्याला आलेला हा दुसरा फोन होता. फक्त आश्चर्य हे होतं, की ही मुलगी चक्क मराठीमध्ये बोलत होती.
"सर, आमच्या कंपनीने आपली एका ऑफरसाठी निवड केली आहे. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर मी ही ऑफर सांगू का? "
अरे यार... सारखं सारखं कोणालातरी क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन देत जाऊ नका रे... असं मनातल्या मनात म्हणून, "सॉरी मला क्रेडिट कार्ड नको आहे", असं फोनवर सांगून मॅंडीनं फोन कट केला. परत ही कटकट नको म्हणून फोन बंद करून ठेवण्याची तयारी करत असतानांच पुन्हा एकदा तोच फोन आला. आता मात्र त्याचं डोकं सटकलं.
फोन घेऊन त्या मुलीचं बोलणं ऐकण्यापूर्वी, त्यानेच बोलायला सुरूवात केली,
"मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे, मला क्रेडिट कार्ड नको आहे. आता पुन्हा तुम्ही मला फोन केलात, तर..... "
मॅंडीच्या या रागाचा आपल्या आवाजावर जराही परिणाम होऊ न देता, फोनच्या दुसऱ्या बाजुची मुलगी तितक्याच मधाळ आणि गोड आवाजात म्हणाली,
"हा फोन क्रेडिट कार्डसाठी नाहीये सर. आपला राग मी समजू शकते. पण आपण थोडाच वेळ मला दिलात, तर माझ्या मते मी आपल्याला उपयोगी अशाच एका ऑफरबद्दल आपल्याशी बोलू इच्छिते. सांगू का? "
ह्या वेळी मॅंडीचा स्वर थोडा बदलला आणि का कोण जाणे पण त्या मुलीचं बोलणं ऐकावं असं त्याला वाटलं.
मॅंडीने काही न सांगताच, त्याचा होकार गृहीत धरून, त्या मुलीने बोलायला सुरूवात केली.
"धन्यवाद सर. माझं नाव प्रीती. मी अमेरिकेतल्या डब्ल्यू एंड एल कंपनीमधून बोलते आहे. आमच्याबद्दल तुम्ही कदाचित फारसं ऐकलं नसेल. कारण आम्ही आमच्या या इंडस्ट्रीमधली खूपच नवीन आणि खरं म्हणजे सध्या तरी एकमेव कंपनी आहोत. अमेरिकन कंपन्यांसाठी भारतात संगणक क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक हे आमचे प्रमुख ग्राहक. आमच्या डेटाबेस मध्ये असलेल्या माहितीनुसार आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आता गेली सात वर्ष काम करताय. या क्षेत्राची भारतामध्ये किती झपाट्याने प्रगती झाली, हे तुम्हाला सांगायला नकोच. अमेरिकेमध्ये मुख्य कार्यालयं असणाऱ्या मोठ मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनी भारतामध्ये आपली संशोधन आणि विकास अर्थात रिसर्च एंड डेव्हलपमेंट कार्यालयं उघडली. त्याचबरोबर, बी. पी. ओ अर्थात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग आणि आता तर, एल. पी. ओ. अर्थात लीगल प्रोसेस आऊटसोर्सिंग साऱख्या संगणाकावर आधारित क्षेत्रातसुद्धा, भारतामधले निरनिराळे व्यावसायिक भाग घेऊ लागले आहेत. भारतातले वैद्यकीय व्यावसायिक, भारतातले वकील, भारतातले वास्तुरचनाकार... अशा सर्वांसाठीच अमेरिकन ग्राहकांसाठी काम करण्याची एक उत्तम संधी आता निर्माण झालीय..... आपण ऐकताय ना सर? " खात्री करून घेण्यासाठी प्रीतीने विचारलं.
"हो.. हो.. अर्थात. मी नीट ऐकतो आहे. "
खरं तर, ही सगळी कथा ही पोरगी आपल्याला नेमकी का सांगते आहे याचा विचार जरी मॅंडी करत होता, तरीही तो तिचं बोलणं अतिशय लक्षपूर्वक ऐकत होता. ही आपल्याला एखादी जॉब ऑफर देते आहे की काय असा एक विचार त्याच्या मनात चमकून गेला. पण तिचं बोलणं पूर्ण ऐकण्यापूर्वी काहीच निष्कर्ष न काढणं बरं, असं ठरवून त्यानं पुन्हा फोनकडे कान दिला.
"धन्यवाद. तर भारतामध्ये, अमेरिकासाठी काम करणारे हे व्यावसायिक अतिशय कष्टाचं काम करतात. अमेरिकन वेळेमध्ये काम करतात. त्यामुळे अक्षरशः रात्रीचा दिवस करून काम करतात. या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधीमुळे त्यांच्या घरात सुबत्ता आलेली असल्याने, शरीराच्या आणि मनाच्या थकव्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून काम करतात. प्रसंगी, या कामाच्या नादात आणि कामाच्या दडपणामुळे त्यांचं कौटुंबिक आयुष्यसुद्धा पणाला लागतं. या सगळ्याचा ताण त्यांच्यावर सतत असतो. काम आणि वैयक्तित आयुष्य – वर्क आणि लाईफ - यांचा समतोल साधता साधता त्यांची ओढाताण होते. आणि आता याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवरही होऊ लागला आहे. त्यांची कार्यक्षमता हळू हळू कमी होऊ लागली आहे. अमेरिकेला भारतातल्या या सर्व हुशार व्यावसायिकांची गरज आहे आणि म्हणूनच त्यांचा "वर्क-लाईफ बॅलन्स" सांभाळण्याचं काम आता अमेरिकेने स्वतःकडे घेण्याचं ठरवलं आहे. "
"वर्क – लाईफ- बॅलन्स"... अच्छा "डब्ल्यू एंड एल कंपनी" इथून आलं आहे तर. मॅंडीचा बल्ब पेटला. प्रीती बोलत होती, तो शब्द न शब्द खरा असल्यामुळे त्याला तिच्या बोलण्यात आणि त्याच्या ऐकण्यातही व्यत्यय नको होता. पण अमेरिकेने हे काम स्वतःकडे घेतलंय म्हणजे नेमकं काय केलंय आणि त्याला या कंपनीकडून मिळत असलेली ऑफर नेमकी काय आहे या बद्दलचं त्याचं कुतुहल आता शीगेला पोचलं होतं.
"मला नेमकं लक्षात नाही आलं, " मॅंडीने न राहवून विचारलं.
"मी सांगते सर. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असे अनेक प्रश्न असतील, ज्यांच्यामुळे तुमचं काम नीट होण्यामध्ये अडथळे येत असतील. उहारणार्थ, मुलाचा प्रवेश नेमका कोणत्या शाळेमध्ये घ्यायचा, आपण नवीन घर घेतलेलं आहे आणि आता आपण बायको बरोबर त्या घरी राहायला जाणार आहोत, हे आपल्या आई-बाबांना कसं सांगायचं, यावर्षी गुंतवणू नेमकी कुठे करायची, इथपासून ते घरी जाताना आज कोणती भाजी घेऊन जायची, इथपर्यंतचे लाखो विचार दिवसभर तुमच्या मनात येत असतील. हे सगळे विचार एकीकडे मनात चालू असताना, तुम्ही कामामध्ये संपूर्ण लक्ष देऊ शकतच नसणार. त्यामुळे तुम्हालाच त्रास होत असणार. तर तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी, तुम्ही तुमचे काही "विचार" आमच्याकडे "विचार करण्यासाठी" "आऊटसोर्स" करू शकता.
मॅंडीचं डोकं आता चालेनासं झालं होतं. माझे विचार मी आऊटसोर्स करायचे? काहीतरी विचित्र बोलते आहे ही मुलगी. खरं म्हणजे कित्येक प्रश्नांवर आपल्याला सारासार वगैरे विचार करायलाच लागू नये आणि कोणीतरी दुसऱ्यानेच आपल्यासाठी काही निर्णय घ्यावेत अशी गुप्त इच्छा त्याच्या मनात अलकिडे कित्येक वेळा येऊन गेली होती. पण असं करायला खरंच कोणी तयार होईल हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.