खरा नाहीच मी...

उसळती शब्द कारंजी जरा मी दाबता खटका
जसा आभास बुद्धीचा तसा आवेशही लटका

प्रसिद्धीच्या खुळ्या लोभात केली अक्षरे कैदी
'विनाजामीन' ओळी मागती माझ्याकडे सुटका

पुराण्या कल्पना मांडायच्या नावीन्यतापुर्वक
कितीदा हार खातो मी, कितीदा लागतो मटका

कुणाची ओळ स्वर्गातून चाहुलते मनामध्ये
मला झोपेतही येतो नव्या वृत्तामधे झटका

हजारो शेर झाले, एक संस्मरणीयसा नाही
जिथे आयुष्य घालवले तिथेही राहिलो भटका

सुरू होतात ओळी मीलनाच्या आर्त रंगाने
विनयभंगापरी अंती निरर्थकतेतला फटका

खरा नाहीच मी, पाणी मला नेत्रांतले सांगे
'तुझे असणे नसे जरुरी, तुझे जाणे नसे चटका'