श्रीटिळकास्तव - स्वा. सावरकर यांची कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १७व्या वर्षी रचलेली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरील कविता.

श्रीटिळकास्तव

लाजविलेंस निजयशें धवलें त्वां सत्य हिमनगा तिलका ।
संतत जनपदसेवार्पित तूं तुज कवी न गान गातिल कां ? ॥१॥

अनलसजनकार्यातें आर्यातें रक्षी शंभू टिळकांते ।
शुक्लेंदुयशें लज्जित तेथें होतील ना कुटिल कां तें ॥२॥

स्वार्थास्तव ना केलें दुष्कृतिमंडन कदापि तिलकाने ।
यत्कीर्तिश्रवणामृत दुर्लभ सज्जन सदा पितिल कानें ॥३॥

जनसेवेस्तव झटतां झट कारीं नेती बाळ टिळकाला ।
दुःसह छल सोसावा लागे या आर्यभालतिलकाला ॥४॥

परी धीर धरी केसरी सरी पार्था ना शरासनची टाकी ।
कीं केसरी सरीं जें पात्रत्व न तें "सरास नचि" टाकी ॥५॥

दृढ स्नेह असें जो जो राष्ट्रहितोद्युक्त त्यांशी तिलकांचा ।
राष्ट्रविघातक अरिच्या होती केसरिपुढें शिथिल कांचा ॥६॥

प्रेमा ठेविती साधू इहलोकी देवता नभीं तिलकीं ।
यमदूत स्पर्शाया राष्ट्रहितेच्छू सतां न भीतिल कीं ! ॥७॥

देवा तुझ्या हवालीं केला हा कीर्ति-नीतिचा ठेवा ।
व्हा वाली स्तेनभयापासुनि या रक्षुनी सुखें ठेवा ॥८॥

गातों आर्यातें श्रीमयुरेशस्फूर्तिनें विनायक तो ।
नायक तो जगताचा तिलकस्तवनास मुदित आयकतो ॥९॥

- वि. दा. सावरकर