भीषण वाहणारी नदी
प्रवाह पाहूनच काटा यावा.. सर्रकन...
त्यावरती..
लांबलचक पूल
पूल कसला?
हात धरायला एक दोर अन पाय ठेवायला एक
डोंबाऱ्यासारखे...
डोंबाऱ्याला वरचा दोर नसतो... त्याचे पैसे मिळतात
खाली नदी नसते, झेलणारे हात असू शकतात
किंवा सात आठ फुटांवरच जमीन असते
मजा म्हणून कुणीतरी आपल्याला पुलावर आणते
ते स्वतः पुलावरच असतात
मग आपण पुढे कधीतरी मजा म्हणून कुणालातरी पुलावर आणतो
सगळेच लटपटत पुलावर
हात सुटला? नदीत...
पाय सुटला? हाताला रग लागली की नदीत
पूल पार केलास? तिथे काय आहे काही माहीत नाही
पण काहीतरी भीतीदायक मात्र आहे
लढलास? पोच त्या भीतीपाशी
हारलास? पड..
कंटाळलास? पड...
पायाखालचा दोर म्हणजे आपल्याला आधार देणारे
हातातील दोर म्हणजे सुखाचे भागीदार.. पाय सुटला तर धरणार नाहीत...
आपल्याला पुलावर आणणारे... तिथेच कुठेतरी पुलावर किंवा नदीत पडलेले किंवा पोचलेले
आपण ज्यांना आणले ते ... असेच मागून मागून, किंवा पडलेले
त्यांना पुलावर चालवायचे काम आपले
त्यांना चालणे जमेपर्यंत ... किंवा
आपण थकेपर्यंत...
अगदीच थकलेल्यांना मागचे ढकलून देतात किंवा पुलापलीकडे फेकतात
कारण त्यांचा उगाचच अडथळा होतो
त्यातही
या पुलावर बाजार असतो
धीर, आश्वासने, प्रेम, शाबासकी, जयजयकार,
या गोष्टी विकतात इथे... विकणारे पण चालतच असतात हे मात्र खरे वाटणार नाही तुला
तुझ्या बरोबर? तुझ्या बरोबर कसे कुणी असेल?
एवढ्याश्या दोरावर एकावेळी एकाचाच पाय मावणार नाही का?
नुसते वाटतात.. की अगदी बरोबर आहेत असे...
दुसरा पूल?
दुसरा पूल नसतो बाळा...
परत जायचे?
या पुलावर परत नाही फिरता येत...
अगदी स्वतःचा... खासगी असा पूल ...
खरच हवाय का तुला?
तसा पूल बांधायचा असेल तर
कवितेवर प्रेम कर
ती देते एक..
अगदी आपला असा पूल
त्यावर फक्त आपणच
पाय ठेवायला भरपूर जागा
हात धरायची गरजच नाही
पुढेही जाता येते... मागेही जाता येते
नदीकडे आरामात बघता येते
कधीच नदीत पडावे लागत नाही
पुलाच्या शेवटी काय याची भीती वाटत नाही
लोकांना हेवा वाटतो मग आपला
प्रत्येकाला नाही काही कवितेवर प्रेम करता येत?
कविता प्रत्येकाचे प्रेम नाही घेत
ती म्हणजे काय देव आहे?
फक्त एकच प्रॉब्लेम आहे बघ...
एकदा... तिने दिलेल्या पुलावर गेलास...
की परत या पुलावर नाही येता येत...
मग तिकडचाच तू...