घर! कुणाचं!

हा लेख माझ्या आईने काही वर्षांपूर्वी सोलापूरच्या स्थानिक दैनिकासाठी लिहिला होता. तो येथे प्रसिद्ध करीत आहे. हाच लेख दुवा क्र. १ या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे.

=========

      "होम, स्वीट होम" ही कविता मी अगदी समरस होऊन शिकवीत होते. सारा वर्गसुद्धा तितक्याच तन्मयतेने ऐकत होता, अन तास संपल्याची घंटा झाली. सारेचजण कल्पनेतून जागे झाले. मी बाहेर पडले. आज प्रकृती बरी नसल्याने पुढचे तास न घेताच मी घरी जायचं ठरवलं व निघालेही.

      निघाले खरी पण कवितेतील घराबद्दलच्या कवीच्या कल्पना मात्र माझ्या मनातून जात नव्हत्या. घर! सृष्टीतील प्रत्येक जीवाचं आपल्या जीवा इतकंच प्रेम असतं ते स्थान! सर्वांना हवाहवासा वाटतो तो निवारा! अगदी जीवापासून  शिवापर्यंत निगडित असलेल्या घराबद्दल आपलं मन जर विचार न करील तरच नवल!

पाउले घराच्या ओढीनं स्पर्धा करीत होती तर मन कवितेच्या संदर्भाने अभिप्रेत असलेल्या घराच्या रम्य अशा कल्पनेची आणि मी प्रत्यक्ष अनुभव असलेल्या माझ्या घराची तुलना करीत होते. डोळ्यासमोर आतापर्यंतचा तेरा-चौदा वर्षाचा गतकाल सरकत होता.

  पाच - सहा माणसांचं आमचं कुटुंब! आम्ही दोघे म्हणजे, मी व शेखर, आमची दोन मुलं. सासू - सासरे आणि दीर. पैकी मी व शेखर घरातले कमावते. खरं तर प्रत्येक बाबतीत मी शेखरच्या बरोबरीने कष्ट करीत होते पण का कोण जाणे या घरात माझी मलाच कुठेतरी उणीव भासायची, कमीपणा जाणवायचा. समाधान वाटत नव्हतं. घरातील इतर सर्व कामं सांभाळून नोकरी करायची शिवाय नवऱ्याची मर्जी सांभाळायची. एवढं सारं करून देखील मनाला असं वाटायचं की घरात वर्चस्व मात्र शेखरचंच! ते म्हणतील तिच पूर्वदिशा. यामुळेच  हे रितेपण जाणवत होते की काय कोण जाणे. मग मनात वादळ उठे की का? कशासाठी एवढा आटापिटा? कोणासाठी एवढी झीज? ह्या लोकांसाठी की घरासाठी? घर? कोणाचं? याचं की माझं?

 मध्यंतरी दिराचं लग्न झालं. मर -मर कष्ट केले नावं आणि कौतुक मात्र शेखरचंच! लग्नानंतर हे नवीन जोडपं त्यांच्या नोकरीच्या गावी गेलं अन पुढं काही दिवसातच सासूबाईंनी अंथरूण धरलं. संपूर्ण दिवस सगळी कामं उरकेपर्यंत अगदी नाके नऊ यायचं. पण इलाज नव्हता. पुढे महिन्याभरातच त्या गेल्या. सर्वांना सोडून.

     आता घरची सगळीच जबाबदारी माझ्यावर आली. पुढे दीड - दोन वर्षातच सासरेपण गेले. घर अगदीच रिकामं झालं. आता आम्ही चौघेच. दिनक्रमात बदल नव्हता. पण प्रत्यक्ष व्यावहारिक किंवा कौटुंबिक बाबतीत मात्र माझ्या अस्तित्वाची जाणीव कोणालाच नसे. त्यामुळेच मनात खोलवर कुठेतरी वेदना सली. असं का व्हावं? कुठे कमी पडते मी? माझ्याच घरात परकेपणाची भावना का रुजावी? व अशा विचारांनी मनाला अस्वस्थ का करावं हेच कळत नव्हतं. पुरूषप्रधान असलेल्या या संस्कृतीत सर्वच मध्यमवर्गीय स्त्रियांची माझ्यासारखीच अशी मानसिक घालमेल होत असावी का? आणि असेलच तर आजच्या कवितेतील रम्य कल्पना व अनुभव यांचा वास्तविक मेळ नसावाच का?

विचारांच्या ओघात घर जवळ आलेलं कळलंच नाही. नाजूक प्रकृती व मनाला अस्वस्थ करणाऱ्या विचारांनी डोकं ठणकत होतं. दुसरे दिवशी अंगात ताप पण भरला. घरगुती औषधाने अंगात ताप तसाच मुरलेला असावा. उतरायची चिन्हे दिसेनात. मग साऱ्या तपासण्या केल्या. निदान येईपर्यंत तापाची सुरुवात होऊन चार दिवस झाले होते. कमालीचा अशक्तपणा आला होता. शेखरच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काय झाले कोण जाणे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने मला लगेच दवाखान्यात ऍडमिट केलं. आता सगळी जबाबदारी शेखरवर येऊन पडली. त्यांची खूप तारांबळ होऊ लागली. घरचं, मुलांचं, दवाखान्यात माझ्याकडे येऊन बसणं, सगळं सगळं त्यांनाच पाहावे लागे. सुरुवातीला पंधरा दिवसांची रजाच घेतली होती. मला पूर्ण विश्रांतीच होती. शेखर माझी फार काळजी घेत. सगळं वेळेवर व स्वतः करीत, जागरण, दगदग व काळजीने त्यांचा चेहरा ओढल्यासारखा झाला होता. रोज रात्री दवाखान्यात झोपावं लागे त्यामुळे झोपही नीट होत नसे. एरव्ही जागरणाने चिडणारे शेखर आता मात्र शांत होते. आजारपणात त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू मला नव्याने पाहावयास मिळत होते.

हळू हळू माझी प्रकृती सुधारू लागली. कालचाच प्रसंग. मी त्यांना म्हटलं, "अहो, किती थकलात? थोडीशी विश्रांती घ्या. आता मी बरी आहे. माझी काळजी नका करू. " तसे ते हसत म्हणाले, 'अगं मी तर माझीच काळजी घेतोय. हे बघ, स्त्री म्हणजे घराचा आधार! संसारातला पुरुषाइतकाच महत्त्वाचा घटक! जमिनीत खोलवर रुजलेलं घट्टं मूळ! अगं झाडाचं मूळ सशक्त असलं म्हणजेच ते बाहेरच्या वादळवाऱ्याशी हिमतीनं झुंज देत राहतं. तेव्हा तू लवकर बरी हो बरं. आपल्या घराचा पायाच नाही का तू? तो पाया अदृश्य असला तरी संसाराची इमारत त्यावरच उभी नाही का? आणि आतापर्यंत या आपल्या घरासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव का नाही मला? त्यासमोर माझे हे कष्ट काहीच नाहीत. तेव्हा आता कसलाही विचार न करता तू स्वस्थ झोप पाहू. घरी जाण्याची परवानगी लवकरच मिळेल. '

काल शेखरने झोपायला सांगितले खरं पण माझी झोप मात्र पार उडून गेली. त्यांच्या आचरणातील सुप्त ओलावा मला स्पष्टपणे जाणवू लागला. कदाचित पुरूषप्रधान संस्कृतीतल्या 'पुरुषी' स्वभावामुळेच त्यांनी कधी आपल्या भावना व्यक्त केल्या नसाव्यात का?  

खरंच! या दिशेने मी कधी विचारच केला नाही. गुरफटलेल्या संसारात मला जमेल तितकं केलं, जमत नव्हतं तिथे तडजोड केली खरी, पण तडजोडीच्या सामंजस्याच्या जोडीला शेखरचा मूक प्रतिसाद होता म्हणूनच संसाराची इमारत उभी राहू शकली ना? माझ्या संकुचित स्वभावामुळेच मी माझ्या अस्तित्वाबाबतची चुकीची कल्पना करीत असल्याची मला जाणीव झाली. माझ्या मनातले विकल्प पार धुऊन निघाले. मन हलकं हलकं झालं अन कधी झोप लागली कळलं देखील नाही. पुढे दोन दिवसातच घरी आले. पाहते तो...

दारावर हिरव्यागार पानांचं तोरण बांधलेलं होतं. दोन्ही मुलांच्या हातात 'सुस्वागतम' व 'Welcome Home' अशा अक्षरांचा कागद होता. सारेच जण समाधानाने व आनंदाने हसत होते. माझं ऊर भरून आला. डोळे भरून वाहू लागले. शेखरच्या आधाराने मी घरात प्रवेश केला. सगळ्या घरावरून नजर फिरवली तर घरातील प्रत्येक वस्तू माझ्याकडे प्रेमाने, आपुलकीने पाहते असाच भास झाला. छे, इतके दिवस उगाच 'त्यांचं - माझं' असा खुळा विचार मी करायची. शेखरच माझे म्हणजे त्यांचं ते माझंच नव्हतं काय? द्वैतातून अद्वैत असं काहीसं म्हणतात ते याहून काय निराळं असावं?

बस्स! आता असले संकुचित विचारच बंद. आता लवकर बरं व्हायचं. पुन्हा नव्या उभारीनं संसाराला लागायचं. वर्गामधली "Home Sweet Home" ही कविता पूर्ण करायची, पण वेगळ्या अर्थानं! कारण त्या कवितेतील मधाळपणा आता मी माझ्या घरात चाटवला होता त्यामुळे मन म्हणत होतं की अगं वेडे, घर कोणचं? हा प्रश्न मनामध्ये का आणतेस? घर तर दोघांचं!

केवळ विचारांची दिशाच आपल्या जीवनाचा चेहरा-मोहरा पार बदलून टाकतात. यावर विश्वास ठेवून त्यास प्रतिसाद दिला तर विश्वातील सर्वांचीच घरे सुखी होऊ शकतील नाही का?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========