बळी (गेलेला) राजा

काळ्या मातीवरी नांगराचा फाळ
बोडखं आभाळ पाझरेना

बैलाच्या जोडीनं कष्ट दिसभर
अंगी टीचभर कापड ना

एकच न्याहारी खायाची दोघानी
दुःखाची कहाणी बोलवेना

पांढऱ्या कापडा घाबरतो जीव
ओलांडून शीव देह जाईना

इवलेसे कोंब जेव्हा डोकावती
सागराची भरती ये मना

खीशामध्ये कधी नसते दमडी
उपाशी न जाई दारचा पाव्हना

एवढं थोर मन मज द्यावे देवा
भले जरी घ्यावे माझीया धना