झुळुकीने विस्कटले केस अता गालावर
आशा या पापण्यांतली आली भानावर
पदराचे अत्तरही मंद होत रुसलेले
अधरांचे ओलावे शुष्क होत पुसलेले
गालांची लज्जा वर लोचनांत लालावे
वस्त्राचा आसुसला बंध अता सैलावे
देहाची दरवळ बस कल्पनेत रमलेली
हृदयाची आग तुझ्या विरहाने शमलेली
गेली ही वेळ तशी बात पुरी गेली ना
काय प्रिया रुसवा हा, रात पुरी गेली ना
रात रात सारी असतोस कुठे गेलेला
भरतीची लाट फिरे काठ बघत रुसलेला
तोरण या कांतीचे निसटुन निस्तेज पडे
एक उसासा देउन दुर्मुखली शेज पडे
इतका कसला आला राणीचा राग तुला
आमंत्रण देते ही प्रज्वलीत आग तुला
कुठल्याही कामावर लक्ष अता लागेना
तळमळते एकाकी, झोप अता जागेना
नवलाईची माझी कात पुरी गेली ना
काय प्रिया रुसवा हा, रात पुरी गेली ना
चुकले असले तर मी माफी मागेन प्रिया
ये घरटी अपुल्या या, सुखवत सुखवेन प्रिया
भुवयांची महिरप ही सज्ज स्वागतासाठी
एकदा तरी ये ना, मी जगू कशासाठी
आता तस्वीर तुझी हाती घेते आहे
दोन फुले अश्रुंची फक्त अर्पिते आहे
कसला येतोस अता, कायमचा रुसलेला
आकाशीचा तारा अढळपदी बसलेला
आशा-आशांची बारात पुरी गेली ना
काय प्रिया रुसवा हा, रात पुरी गेली ना
रात पुरी...