पूर्वी म्हणे

पुर्वी बाळंतपणात मुले बरेचवेळा मरायचीच
सोयीच नव्हत्या
हल्ली ऑपरेशन झाले की झाले

पुर्वी डोनेशनही नव्हते
मुलगा कितवीत आहे हे बापाला काय माहीत?
हल्ली पायरीपायरीला पैसे फेकले की झाले
पंधरा वर्षे आरामात

पुर्वी अंतरेही कमी होती
लोक चालतच जायचे
आता काय, जाऊन वाहन निवडले की झाले

पुर्वी रेडिओ, टी. व्ही, फ्रीज, टेप
काही नव्हते

पुर्वी नवाला निजानिज
आता साडेदहाला बाहेर पडतात

पुर्वी मुले पाठीवरून आईचा फिरवून घ्यायची
आता लाज वाटते
सटकतात पटकन

तुझेच बघ की

तुझी आई बाळंतपणात अवघडलेली
डॉक्टर म्हणले ऑपरेशन केले नाही तर
जरा भीतीच आहे
ऑपरेशनने जन्म झाला
शाळेला डोनेशन
अठरा वर्षाचा झालास... एम एटी आली
टेप आला, क्यासेटी वाजल्या
टी. व्ही येऊन जुना झाला

फक्त एकच फरक आहे

नवाला नको निजू
साडे दहाला बाहेर जा
एकला ये

पण

आमच्याजवळ राहा रे