पैंजण

भीती वाटू लागलेय आजकाल..,
माझ्याच पायातल्या पैंजणांची!
सदोदित पाठलाग करणाऱ्या..,
त्यांच्या त्या किणकिणाटाची.
खूप हौसेने घातलं होतं आईनं...,
तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी!
वय वाढलं...., समज आली.....,
पण पैंजणांचा मोह सुटला नाही!
बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं...,
तारुण्यात आल्यावर त्यांचं...
स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं!
त्यांच्या मधुर किणकिणाटानं...
मान वळवून बघणारी धुंद तरुणाई...,
आणि मोहरून जाणारं माझं वेडं मन!
पैंजण अजूनही आहे...
पण आता मन मोहरत नाही...,
आता थबकत नाहीत नजरादेखील......
राहून राहून वळते माझीच नजर....,
पायातल्या उदास पैंजणांकडे...,
परिस्थितीने त्यांच्यावर...
उधळलेल्या उन्मत्त, बेगुमान नोटांकडे...!

विशाल.