एका फुग्याची गोष्ट

आर्थिक गरम हवेचा फुगा, खरा तर काळ्या काळ्या चेटकिणीचा झगा.......

अनेक लोक करतात जादू आणि पसरवतात गरम हवा, उडवतात फुगे आकाशात, आणि "हवा का तुम्हाला" विचारतात

जे जे भाळतात (नुसत्याच) गरम हवेला, ते काही न समजताच म्हणतात, "मला (पण), हवा, फुगा हवा"

फुगा उंच उंच चढतो आकाशात, जातो नजरेपार, तरी त्याची चमक दमक सगळ्याना दिसत राहते,

डोळे दिपतात, काही दिसेनासे झाले तरी फुगा मिळवण्याची (आंधळी) हाव  तशीच राहते

फुगा भरला भरला भरला (फक्त गरम हवेने)

कळेना कळेना कळेना, आणखी किती फुगेल हे बेणे?

फुगा गेला उंच उंच उंच, त्यात हवा भरणारे झाले (आणखीनच) टंच

फुगा गेला गेला गेला हवेत, सरळ चेटकिणीच्या कवेत

काळी काळी चेटकीण, (अजून) कुणी नाही पाहिली,

(धुंद झालेल्या डोळ्यान्मुळे), कालची टंच लोकानी दिलेली पार्टी फा.... र...च चांगली,.. हिक!

चेटकीण आली धावून, फुगा गेला (पार) फुटून,

जे जे हवा भरणाऱ्यांच्या मागे (फसले आणि) धावले, खिसा त्यांचा गेला फाटून

चेटकिणीची लांब लांब नखे, आता बाहेर दिसू लागली,

सापडले त्यांची घरे धुवून, त्याना ओरबाडून, नंगे करून, चेटकीण गायब झाली

फुगा गेला फुटून, ..... पण.....

हवा भरणारे ना हरले, हटले वा शरमले अजून  

(चालः ही कविता समजून घेण्याची आहे, पण रूढीनुसार कवीने "चाल" कुठली या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असते, म्हणूनच फक्त....    पुढील सुचवलेल्या चालीतून, जी आवडेल ती उचलावी......  : अ) अडखळत अडखळत    ब) तिरपी तिरपी क) आधी बरळतानाची आणि नंतर रडकी..... मात्र ही कविता "गेय" असल्याच्या समजुतीने कोणी ही कविता कुठल्याही चालीत म्हणता म्हणता, या कवितेत उल्लेखित "हवा भरणाऱ्या" लोकांच्या तावडीत सापडला तर होणाऱ्या परिणामास कवी जबाबदार नाही.)