चिरंजीवी....
लिखाणाविषयी
ही कथा आहे अश्वथामा ह्या महाभारतातील व्यक्तिरेखेची.. अश्वथामा जिवंत आहे असे बऱ्याच ठिकाणी वाचनात आले.. आणि हजारो वर्षापूर्वीचा हा मानव आता कसा असेल.. आता चिरंजीवतेचा शाप भोगता भोगता काय वाटत असेल त्याच्या आत्म्याला.. हे विचार मनात आले.. नर्मदा परिक्रमा करताना बऱ्याच जणांना अश्वथामा भेटल्याचे उल्लेख वाचले, ऐकले
काहीशी काळी बाजू असलेली ही व्यक्तिरेखा.. गुरुपुत्र.. एक ब्राम्हण कुलोत्पन्न असूनही त्याने असे पाऊल का उचलले असावे? हा प्रश्न कायम मनात येत होता.. आणि कुठेतरी त्या दृष्टीने मी या व्यक्तिरेखेकडे बघू लागले.. आणि मग मांडावे त्याच्या भूमिकेतून त्याचे विचार असे वाटले ते एथे शब्द बद्ध केले.. एका बाजूला लहानपणी असलेले दारिद्र्य... दुसऱ्या बाजूला.. वडील असूनही द्रोणांचा अर्जुनाकडे असलेला ओढा.. कसा घडत गेला असेल अश्वथामा यातून.. आणि ह्याच गोष्टींचा त्याच्या व्यक्तित्वावर परिणाम होत गेला असेल.. महाभारत जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे.. हा प्रयास महाभारत सांगण्याचा नसून त्यातील निवडक संदर्भ जे अश्वथाम्याच्या जडणं घडणीत कारणीभूत ठरले ते मांडण्याचा प्रयास म्हणून आहेत...
एकंदर सगळे एकदम मांडणे आणि वाचणे कंटाळवाणे होईल या हेतूने त्याची तीन प्रकरणात विभागणी केली आहे...
प्रत्येक नाण्याला जश्या दोन बाजू असतात तसे अशश्व्थाम्याच्या व्यक्तिमत्त्वांतील काळ्या बाजू प्रमाणे दुसऱ्या बाजूंवर ही काही प्रकाश पडतो का या साठी केलेला हा प्रयास आहे... कुठे संदर्भ चुकीचे वाटत असतील तर ते नक्की सांगा.. आणि सूचनांचे नेहमी प्रमाणे स्वागत आहेच..
प्रकरण १:
द्वीजगण निघाले आता परतून घरट्याकडे... सगळे चक्र कसे चालू आहे जिथल्या तिथे.. हे सृष्टी चक्र..... सूर्योदय, सूर्यास्त.. अव्याहत चाललेलं हे चक्र... युगानयुगे.. शतकानू शतके... ही हवा.. हे आकाश.. ही नदी.. सागर.. सगळी सृष्टी..... बदलतात फक्त हे जीव.. जीवाचे ही चक्र एका जन्मातून दुसऱ्या जन्मात.. अव्याहत चालणारी साखळी.. चौर्यांशी लक्ष योनी.. प्रत्येक योनीचा वेगळा गुण विशेष... त्या देहाची, त्या जन्माची, त्या योनीची सर्व कर्तव्ये आणि नियम पाळवीच लागतात.. देह संपला तरी आत्मा अविनाशी... प्रत्येक जन्मी, नवीन देह.. देह बदलतो पण आत्मा तोच असतो.. त्या आत्म्यालाही विस्मृती असते.. मागील जन्माच्या खुणा तो ही बाळगत नाही..... फक्त सांप्रत योनीतील देहकर्तव्यच्युत होता कामा नये.. स्वकर्तव्य आणि स्वधर्म यांची आत्मविस्मृती झाली की अशी माझ्या सारखी अवस्था होते..
सगळे जीव जातात जन्म मरणाच्या चक्रातून मी मात्र शतकानुशतके असाच डोक्यावर ही चिंतामण्याची भळभळती जखम आणि चिरंजीवतेचा श्रीकृष्णाने दिलेला शाप घेऊन......... प्रत्येक जन्माचे नियम असतात आणि ते पाळावेच लागतात... मी कोण? याचा विसर पडला.. आत्मभान गेले की काय अवस्था होते त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मी.. मी अश्वथामा.. गुरू द्रोणाचा पुत्र, कौरवांचा सरसेनापती...
श्रेष्ठ ब्राम्हण कुलोत्पन्न असूनही.. क्षात्र धर्माचे पालन केले.. पण झाले काय? ब्राह्मण्य ही गेले आणि क्षत्रियत्वही साध्य नाही झाले.. स्वधर्म बुडाला आणि परधर्म नाही साधला.... आत्मभान ठेवले असते तर अशी वेळ आली असती?... शतकानुशतके मस्तकी ही चिंतामण्याची भळभळती जखम आणि श्रीकृष्णाने दिलेला हा चिरंजीवतेचा शाप...
आपली कर्तव्ये आणि आपली आत्मतत्त्वे याची स्मृती प्रत्येक जन्मी स्मरलीच पाहिजे...... एकदा आत्मभान गेले की माझ्या सारखी भरकटलेली अवस्था होते......
जन्म मृत्यूच्या चक्र संपले की मुक्ती मिळते ही विचारधारा माझ्या बाबतीत फोल ठरली.. जन्म मृत्यूचा फेरा चुकला.. पण हा चिरंजीवतेचा शाप मिळाला.. हो शापच.. माझ्या साठी तरी शापच! युग बदलले तसे पाप पुण्याचे संदर्भ बदलले.. नीतिनियमांच्या चौकटी बदलल्या... द्वापारयुग गेले कलियुग आले.. युगापरत्वे निकष बदलले... कली युगातले अन्याय बघितले की वाटायला लागते माझ्या गुन्ह्याला चिरंजीवतेचा शाप मिळाला.. ह्या आजच्या गुन्ह्यांना काय शिक्षा मिळाल्या असत्या?... काय हा अधर्म सगळीकडे.. अधर्माचे राज्य आहे हे कलियुग म्हणजे!..... एका जन्मीच्या कर्मफलाचे संचित पुढील जन्मी फेडायचे.. पाप पुण्याचा हा सरळ व्यवहार.. माझ्या मात्र आत्मविस्मृतीच्या पापांची शिक्षा मी अशीच चिरंजीव राहून भोगतोय.. याची आता आत्मशोध घेताना ज्ञप्ती होतेय.. अश्वथाम्याने थकून डोके मागे टेकवले.. थकून अगदी.. नेत्र जरी मिटलेले होते तरी रथाच्या चक्रासारखे विचारचक्र अगदी वेगात फिरत होते...............
........................
शतके सरली पण अजूनही असाच या शुलपाणीच्या अरण्यात फिरत राहणार मी... आता तात नाही माता नही दुर्योधनही नाही... आपआपल्या कर्मफला नुसार सगळी मुक्त झाली मी अजूनही असाच.. युगांतापर्यंत असाच... हा शापित अश्वथामा... कृपी आणि द्रोणांचे अपत्य.. जन्मत:च रडण्याऐवजी घोड्यासारखे खिंकाळला म्हणून आकाशवाणी झालेली की मुलाचे नाव अश्वथामा ठेवा.. कपाळावर चिंतामणी असणारा असा अश्वथामा....
अश्वथाम्याच्या नजरेसमोर तो पट उलगडत गेला...
---------------------------------------------------------
" माते दुग्ध म्हणजे काय गं? "
" अश्वथाम्या, दुग्ध म्हणजे गोरंसं. "
"कसा असतो तो गोड? मला दे ना.. "
आता या लहानग्या जिवाला काय देऊ मी मातेसमोर समोर प्रश्न पडला.... जलात पीठ कालवून तो प्रश्न तिथे सोडवला तिने पण... खेदही वाटला तिला.. द्रोण अणी आपण दोघेही मातृसुखापासून वंचित राहिलो आणि ह्या छोट्याश्या बालकाला आपण काही देऊ शकत नाही.. हा विचार नेहमी मातेच्या मनी असायचा.. ती बोलूनही दाखवायची कित्येकदा.......
पुत्राने दुधं मागितले साधे आणि ते ही आपण देऊ शकत नाही.. काय वाटले असेल त्या मातृहृदयाला.. आता विचार करताना जाणवते तिच्या हृदयीची वेदना... जेव्हा अपत्याला आपण अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा देऊ शकत नाही.. दुग्ध म्हणजे काय?.. काय अशी त्याची अप्राप्यता/.. पण ते ही या अजाण जीवाला ठाऊक असू नये आणि त्याची चव काय असते? मला दे ना.. यावर आपणाला देता येऊ नये.. या विचारांनी किती क्लेश झाले असतील तिला..
आणि पीठ कालवलेले ते जल.. दुग्ध म्हणून आपण आनंदाने प्राशन केले त्या वेळी सहस्रं वृशिक चावे घेत आहेत असेच वाटले असेल मातेला..
दारिद्र्य किती भयंकर असू शकते हे अनुभवलेय आपण.. अगदी बाळपणी, अजाणत्या वयात पण इतर सवंगड्यातला आणि आपल्यातला फरक सूक्ष्म पणे का होईना जाणवायचा... सवंगडी बऱ्याचदा आपली हेटाळणी करायचे.. किंवा आपले दारिद्र्य म्हणजे त्यांच्या चेष्टेचा विषय असायचा...... फारसे जाणवायचे नाही किंवा विषादही वाटायचा नाही त्या अबोध वयात आपल्याला पण मातेला निश्चित ते जाणवत असेल.. त्यामुळेच मातेचे आणि तातांचे कायम वाद व्हायचे... मातेचे नेहमी तातांना एकच म्हणणे असायचे.. जगण्यासाठी द्रव्य आवश्यक आहे.. मग ते तुम्ही कसेही आणा... पण द्रव्यसंकोचा पायी आपल्या पुत्राला आपण नाही वंचित ठेवू शकत छोट्या छोट्या गोष्टीपासून... आपण जन्मदाते आहोत त्याचे.. त्याच्या प्रत्येक अपेक्षांचे उत्तरदायित्व आहे आपल्यावर.. आणि आपण स्वकर्तव्य पाळायलाच हवे. परशुरामांकडे पाठवताना ही मातेने तातांना म्हटलेले शब्द अजून ही जसेच्या तसे ऐकू येत होते..
" परशुराम ऋषींनी त्यांचे सगळे याचकांना दान करायचे ठरवले आहे'"
" हो ऐकतोय मी ही तसे"
" मग तुम्ही पण जा.. आणि घेऊन या जे मिळेल ते"
"याचक म्हणून द्रव्यच द्या असे म्हणायचा अधिकार असतो का याचकाला? "
" नाही पण तुम्ही द्रव्य आणा.. मग ते कसे आणायचे ते ठरवा.. याचना करून आणा किंवा कसेही"
तात ऋषीवर परशुरामा कडे जाऊन आले.. तेव्हा तातांनी मोठ्या आनंदाने सांगितले मातेला..
"मला परशुरामांनी त्याची सगळी शत्रे आणि त्या शत्रांचे ज्ञान दिले आणि तू मोठा गुरू होशील असा आशीर्वाद दिला"
.. त्यावर मातेने "त्या शस्त्रांपासून काय द्रव्य लाभ होणार? " असा प्रश्न विचारून तातांचा विरस केला होता.. तीच ही बरोबर होता त्या शत्र अस्त्र ज्ञानाने काय अर्थार्जन करता येणार होते?.. जगण्यासाठी द्रव्याची आत्यंतिक गरज असते.. आणि मातेचे मातृहृदय केवळ माझ्यासाठी या गोष्टीची मागणी करत होते... मातेच्या आठवणीने खरंतर आताही मला भरून आले.....
माझे दुग्ध प्रकरण ऐकून तातांनाही खूप खेद वाटला... त्यांनी काहीश्या निश्चयाने सांगितले उद्या सूर्योदयापूर्वी आपण प्रयाण करतोय.. तयारी करा"
" कुठे जातोय आपण? "
" पांचाल देश.. माझा बालसखा द्रुपद तिथे नरेश झाला आहे. भारद्वाजांच्या म्हणजेच तातांच्या आश्रमात एकत्र विद्या अध्ययन केलंय आम्ही दोघांनी.. धनुर्विद्येचे धडे एकत्र घेतलेय... तो आता पांचालनरेश झालाय "
किती हर्ष झाला होता मातेला पण आणि मला पण..
सूर्योदयापूर्वी प्रयाण करतानाही मोठ्या उल्हासाने पावले झपाझप पडत होती.. मार्गात तात त्यांच्या आणि द्रुपद राजाच्या अनेक गमतीजमती ऐकवत होते.. भारद्वाज मुनी म्हणजे माझे पितामह धनुर्विद्येत पारंगत होते.. त्यांची आणि द्रुपद राजाच्या पिताश्रींची मैत्री होती त्यामुळे द्रुपदांना त्यांनी धनुर्विद्येचे शिक्षण घेण्यासाठी भारद्वाजांकडे पाठवले होते.
गुरू म्हणजे पितामह तसे खूप कडक होते त्यामुळे ह्या दोघांनी लहानपणी लपून छपून खूप काही गमती केल्या होत्या.. अगदी प्रियसखा होते तात द्रुपदांचे.. लहानपणी तर नेहमी म्हणायचे की
"द्रोणा मी मोठं होऊन नृपती झालो ना की माझे अर्धे राज्य तुला देईल.. बघ आपली मैत्री आदर्श मैत्री होईल जगापुढे.. अगदी जीवश्च कंठश्च मैत्री"
मार्गात तात त्यांच्या आणि द्रुपदाच्या मैत्रीच्या कित्येक गोष्टी सांगत होते.... माझे बाल मन आता खरंच तातांना अर्धे राज्य मिळणार म्हणून हुरळून गेले होते.. मातेचीही कौतुक भरली नजर वारंवार तातांकडे जात होती....
माता क्रुद्ध व्हायची कधी तातांवर पण ते ही माझ्या बद्दल आणि त्यांच्या बद्दल वाटणाऱ्या काळजीनेच... तिचे ही बालपण कायम आश्रितासारखेच गेले.. कृप मामा आणि ती दोघेही शंतनुराजा कडे वाढली.. पण लहानपणा पासून माता पित्याचा स्नेह, प्रेम नाही मिळाले त्यांना. कृप मामा पण खूप शस्त्र, शास्त्र पारंगत आहेत. ते हस्तिनापुराला असतात.. तिथे आचार्य आहेत ते.... विचार करता करता बरेच अंतर मागे टाकले.. आता पांचाल देश जवळ यायला लागला असे तातांनी सांगितले.. माझ्या मनात तर आनंदाचे कारंजे थुईथुई नाचत होते.....
द्रुपदाने अर्धे राज्य दिईल असे म्हटले होते ते ऐकून तर मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या... पण तात म्हणाले
"मी त्याच्या कडून काही गोधन घेतो आणि काही द्रव्य... तो नक्की देईल.. "
हे काय तात फक्त गोधन मागणार.. काही गायी आणि थोडेसे द्रव्य.. माझ्या बालमनाला वाईट वाटले.. पण तो नृप आहे तो नाही विसरणार त्याचे वचन. तो नक्की देईल अर्धे राज्य माझे मन मला सांगत होते. माझे बाल मन आता खरंच तातांना अर्धे राज्य मिळणार म्हणून हुरळून गेले होते.. मातेचीही कौतुक भरली नजर वारंवार तातांकडे जात होती....
किती दिवस लावले तातांनी इथे यायला.. संपूर्ण भारत वर्षात पांचाल देश आता बलाढ्य आहे.. तात आधीच आले असते तर त्यांच्या सख्याने आधीच राज्य दिले असते त्यांना.. इतके हलाखीत तर नसते राहावे लागले आम्हाला
पाचांल नगरात प्रवेश केला आम्ही.. तिथे असे समजले की द्रुपद महाराजांचा विवाह काही काळा पूर्वीच पार पडलाय
" द्रुपद महाराजांना असेल ना लक्षात पूर्वीचे? " मातेने शंका काढली
" हो तर अगदी प्राणसखा आहे माझा तो.. आणि क्षत्रिय कधी वचन विसरत नसतात.. तू निश्चिंत राहा" तातांनी मातेला धीर दिला... माता असे वदल्यावर खरेतर मलाही अनिश्चित वाटायला लागले होते पण तातांच्या शब्दांनी धीर आला..
आम्ही राजप्रासादात प्रवेश केला... आणि द्रुपद महाराजां समोर जाऊन उभे राहिलो... महाराजांनी एकवार कटाक्ष टाकला आमच्याकडे पण त्यांच्या मुद्रेवर प्रश्नचिह्न उमटले.. तात थोडे पुढे होऊन म्हणाले
" मला ओळखले नाहीस मित्रा.. मी तुझा प्रिय सखा द्रोण... "
" द्रोण!.. मी ओळखलेच नाही लगेच. "
" बराच काळ लोटला ना.. विद्याभ्यास संपवून.. म्हटलं आपल्या परम मित्राला जाऊन भेटावे... तुला आठवतं ते सगळं?.. मला अगदी अर्धे राज्य द्यायचे असा म्हणायचास तू"
" द्रोणा.. ब्राम्हण आहेस, अतिथी आहेस म्हणून अपमान नाही करत मी तुझा, पण अजूनही बालबुद्धीच आहेस.. अरे किती काळ लोटला.. अबोधपणे अजाणपणे काही बोललो असेल तर ते आता ह्या घडीलाही खरे मानतोस तू.. आपली मैत्री होती तेव्हा कारण तेव्हा आपण दोघेही विद्यार्थी दशेत होतो.. मैत्री नेहमी समान पातळीवरील लोकात होते... आता मी नृप आहे आणि तू एक यत्किश्चित ब्राम्हण.. आणि तरी मला मित्र म्हणावयाचे धाडस करतोस.. खरंच अगदी मूढ आहेस तू. "
द्रुपद मोठ्याने हसला बाकी दरबारीजनही हसायला लागले.. दरबारात गेल्यावर तातांनी बाल मित्र म्हणून संबोधले द्रुपद राजाला, त्याचा खरं तर त्याला अपमान वाटला.. एक यत्किश्चित ब्राम्हण आपल्या सारख्या श्रेष्ठं नृपाला मित्र म्हणवतो... त्याच्या नेत्रात त्याचे ते भाव स्पष्ट दिसत होते..........
माझ्या आणि मातेच्या नेत्रातून अश्रू ओघळायला लागले त्या अपमानास्पद बोलण्याने
" द्रुपद सत्तांध झाला आहेस तू.. सत्तेचा मद चढला आहे तुला... संपती आणि राज्य यापुढे तू मैत्रीचा अपमान केला आहेस.... समान पातळीवरील मैत्री काय.. येईल तो ही दिवस येईल जेव्हा आपली पातळी एक असेल"
तात रागाने अपमानाने थरथर कापत होते.. मी घाबरून तातां कडे बघत होतो... मार्गभर तातांनी ऐकवलेले मैत्रीचे ते गुणगान असे क्षणात चक्काचूर झाले होते.. काय वाटत असेल तातांच्या मनाला.. बायको मुला समोरचा तो भर दरबारात केलेला अपमान.. तो ही प्रिय सखा म्हणवणाऱ्याने... अशी असते सत्ता असा असतो सत्तेचा, संपत्तीचा गर्व.. माझ्याचिमुकल्या मनात थैमान घातले होते विचारांनी.. आज ही तातांचा तो चेहरा आठवला की काळजाला क्षते पडतात.... द्रुपदाच्या गोशालेत इतके गोधन होते त्यातील दोन गायी देणे त्याला काही अशक्य नव्हते पण तातांनी याचक म्हणून न जात मित्र या नात्याने त्याला आठवण करून दिली त्याच्या वचनाची आणि मग अपेक्षा केली.. त्याचा द्रुपदाला अपमान, वैषम्य वाटले आणि म्हणून त्याने तातांना जणू त्यांची पायरी दाखवून दिली... एक दरिद्री ब्राम्हण याचक म्हणून न येता मित्र म्हणून आला.. एका नृपाचा मित्र......
किती किती अपेक्षेने आलो होतो आम्ही या नगरीत.. आणि तात इतकी प्रशंसा करत होते.. त्याच्या मैत्रीची आख्यान सांगत होते.. त्यावरून असेच वाटत होते की नक्कीच द्रुपद राजा तातांना अर्धे राज्य देणार.... तातानी गोधन मागितले तरी... कितीही भ्रमनिरास झाला पण हे ही एक बरेच झाले नाही का.. निदान खरा सखा कोण हा तर निवाडा झाला ना. आता जाणवते तातांच्या त्या अपमानाची झळ प्रकर्षाने.. ताताना काय वाटले असेल त्या क्षणी.. किती दारुण अपेक्षाभंग... त्यावेळी बालबुद्धीमुळे त्यातील गांभीर्य मला फारसे जाणवले नव्हते.. त्या पाठची तातांची वेदना मोठा झाल्यावर जाणवतेय.... तेव्हा आपण असेच परत दारिद्र्यात राहणार हाच विचार माझ्या कोवळ्या मनी आला होता.... तेव्हाही तात असेच एकदम शांत झाले होते.. अपमानाने आतल्या आत धुमसत होते..
राजप्रासादातून बाहेर पडलो.. तात झपाझप पावले टाकीत पुढे निघाले होते.. माझ्या हाताला धरून माता ही खाल मानेने त्याच्या मागे मार्गक्रमण करत होती..... प्रत्येकाच्या मनात विचारांचे मोहोळ उठले होते... मला तर चालवतही नव्हते.. येतानाचा उत्साह पार मावळला होता.. तातांना आताअ अर्धे राज्य मिळणार या कल्पनेने माझ्या बालमनाने किती महाल रचले होते.. वेडे मन किती राजप्रासादात रमले होते.. राजपुत्र म्हणून मनोमन सुखावले होते.. आता पर्यंतचे दारिद्र आता क्षणात दूर होणार.. मग मी ही माझा सवंगड्यांना सांगणार की बघा आम्ही सुद्धा राजे झालो.. राजवंशात गेलो. तिघेही न बोलता मार्गक्रमण करीत होतो.. आमच्या तिघांमध्ये एक भयाण शांतता पसरली होती
" आता कुठे जातोय आपण? " मातेच्या त्या प्रश्नाने ती शांतता भंगली..
" हस्तिनापूर.. "
"कृपांकडे? "
" हं... कृपांकडेच"
अरेच्या कृपमामां कडे जायचे.. माझे बालमन तश्याही अवस्थेत आनंदले... आणि त्याच आनंदात हस्तिनापुराचा आमचा प्रवास सुरू झाला
हस्तिनापुराला कृपमामां कडे जायला मिळेल म्हणून खरंतर मी खूप आनंदीत झालो होतो.. मामा तिथे आचार्य आहेत... राजवाड्यातच राहतात मामा... आपणही तसेच आरामात राहू.. किती मौज येईल.. खरंच नुसत्या त्या विचारांनीच मन पंख लावून विहरायला लागले होते नभात... आता मन त्या द्रुपदाच्या प्रसंगाने खिन्न झाले होते तरी परत टवटवीत व्हायला लागले होते.. अजूनही तात आणि माता मूक पणे मार्ग आक्रमत होते मी मात्र पुढील भविष्याच्या स्वप्नात दंग होतो..
**************