सकाळी आरामात उठून आईच्या हातचा गरमागरम चहा पीत होते. इतक्यात श्री आला..
"अग आई, हरिहरबुवा गेले. "
"अरे देवा.. " --आई
"मी निघालोय तिकडेच. तुम्हीही या सगळे आवरून. " श्री आला तसा घाईघाईत निघून गेला.
आई माझ्याजवळ येऊन बसली. "अंजू, येणारेस का गं तू पण? "
"हो जाऊन येऊ या. "
हरिहरबुवा आमच्या गावातलं एक बडं प्रस्थ. गायनक्षेत्रातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. गावात एक मोठी गायनशाळा होती त्यांची. अगदी गुरुकुलच म्हणा ना. तिथे प्रवेश मिळणं म्हणजे तर मोठी गोष्ट होतीच पण प्रवेश मिळून तिथे टिकून राहणं ही देखील एक अवघड गोष्ट होती. बुवांच्या कडक स्वभावाच्या कहाण्या साऱ्या गावात सांगितल्या जायच्या. पण त्याचबरोबर त्यांना मानही दिला जायचा. त्यांचे गाणे ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच होता. हरिहरबुवा आमच्या गावाचे भूषण होते.
म्हणूनच आईबरोबर जेव्हा मी बुवांच्या वाड्यात शिरले, तेव्हा तिथली प्रचंड गर्दी बघून मला आश्चर्य वाटले नाही. पार्थिवाचे दर्शन घेऊन आम्ही माईंना भेटायला आत गेलो. तिथेही एक विचित्र शांतता होती. माईंजवळ घोळका करून बसलेल्या बायकांत मला त्यांची मुलगी, आसावरी, दिसली नाही. जरा विचित्रच वाटले.
अशा वातावरणात येते ते दडपण असह्य होऊन मी परसात आले. पण आज आभाळही भरून आले होते. शेवटी घरी परतावे असा विचार करून मी वळले, तितक्यात मला कोणाच्या तरी अस्फुट रडण्याचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने गेले तर विहिरीच्या भिंतीमागे एक मुलगी रडत होती. 'काय करावे' या विचारात असतानाच तिने मान वर करून पाहिले.
"अग, आसावरी, तू इकडे काय करतेस? चल, घरात चल. " मी म्हणाले.
"नको. मला इथेच बसू दे. ही माझी आणि बाबांची जागा आहे. फक्त आमची... इथेच बसून आम्ही आपली मनं मोकळी केली आहेत एकमेकांकडे. मला इथेच थांबू देत. " आसावरीला पुन्हा रडू कोसळले.
"अग, असं काय करतेस? बुवा आपल्यातच आहेत, असणार आहेत... त्यांच्या गाण्याच्या रूपात, त्यांनी घडवलेल्या उत्तमोत्तम विद्यार्थ्यांच्या रूपात.. तू रडू नकोस गं. " आता माझाही गळा भरून आला.
"नाही.. नाही... माझ्यात आणि बाबांच्यात ते गाणे कधीच आले नाही आणि येणारही नाही. " आसावरी एकदम उसळून उठली.
मला माझं काय चुकलं तेच कळलं नाही. गाण्याबद्दल एवढी तिडीक आणि तीपण बुवांच्या मुलीला..! मला आश्चर्यच वाटलं.
तिलाही ते जाणवलं असावं.
जरा शांत होत ती म्हणाली, "या इथेच बसून आम्ही ठरवले होते. गाण्याचा प्रांत माझा नाही... आणि बाबा माझ्यावर कधीच जबरदस्ती करणार नाहीत गाण्यासाठी. केवळ दहा वर्षांची होते मी. मला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला बाबांनी... पण मला कधी ओढ वाटलीच नाही गाण्याविषयी. गाण्यात आत्माच नसेल तुमचा तर त्या गाण्याला काय अर्थ राहिला?
ज्या घरात बाबा-माईंसारखे पट्टीचे गायक होते, ज्या घराचा दिवस उगवायचा रियाजाने आणि मावळायचा रियाजाने, ज्या घराने जगाला उत्तमोत्तम गायक दिले, त्या घरात माझ्यासारख्या मुलीच जन्म म्हणजे दैवदुर्विलासच.. पण बाबांनी तेही स्वीकारले. मला म्हणाले-"<em>आसू, तुला जे आवडेल ते कर. पण त्यात पूर्णं जीव ओतून कर. त्यात प्रावीण्य मिळव. अग, लोक हरिहरबुवा म्हणून ओळखतात मला, पण आसूचे बाबा म्हणून ओळखले जायला आवडेल मला. ""
बुवांचे हे रूप मला अनोळखी होते. आपल्या शिष्यांनी गाताना केलेली एकही चूक सहन होत नसे त्यांना. त्यांचे कडक धोरण सहन न होऊन गुरुकुल सोडून गेलेल्यांची अशी अनेक उदाहरणे आम्हाला माहीत होती.
आसावरी काही वेळ गप्प बसून राहिली. मग हलकेच उठून प्राजक्ताच्या झाडाजवळ जात म्हणाली, "लहानपणी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना जायचे. पण प्रत्येक वेळी तेच... 'बुवांची लेक म्हणजे गाणं येतच असणार, गाऊन दाखव बघू बाळ... 'आणि मग मी गात नाही हे कळल्यावर 'काय विचित्र आहे मुलगी' अश्या नजरा. आधीआधी मला कळायचेही नाही, पण हळूहळू नजरा बोचू लागल्या. का? का गायचं मी? नाही येत मला गाणं... मी चित्रं छान काढते, दाखवू? बघणार तुम्ही? नाही, त्यात रस नाही तुम्हाला. फक्त गाणे.. गाणे आणि गाणेच. मी गात नाही म्हणजे मी नालायक ठरते का? हो, नालायकच आहे की मी.. बुवांची एकुलती एक मुलगी आणि गाणे गात नाही? मग त्यांच्या मागे त्यांचा वारसा कोण चालवणार? मैफिलींच्या वेळी माझ्या गाण्याचा विषय निघाला की बाबाही अस्वस्थ होत. कुठेतरी त्यांच्या मनात असेलच की मीही गाणं शिकावं. त्यांनी बोलून नाही दाखवले, पण त्यांच्या डोळ्यांत ती अपेक्षा दिसून यायची. मग हळूहळू मी मैफिलींना जाणे बंद केले. बाबांनीही आग्रह करणे सोडले.. अंजू, तुला आठवतं शाळेत एकदा चित्रांचे प्रदर्शन होते, त्यात माझ्या चित्राला खूप नावाजले होते सगळ्यांनी, नववीत असू आपण. पण तोवर खूप उशीर झाला होता गं.. रोजरोज गाण्याविषयी, छे छे.. न गाण्याविषयी ऐकून ऐकून मी सगळ्यांपासून दुरावले होते. माझी चित्रकला कोणी बघायचे नाही, त्याबद्दल कोणीही उत्सुकता दाखवत नव्हते... केवळ गाणे... यातूनच माझी गाण्याबद्दलची चीड वाढत गेली. सकाळी कानावर पडणारे सुर नको नको वाटू लागले.. वाद्यांचे आवाज असह्य होऊ लागले, या घरात वावरणे नकोसे झाले. शेवटी बारावीनंतर मी या घरातून, या गावातून बाहेर पडले. पण, एका जगविख्यात गायकाची लेक मी... बाहेरही वेगळा अनुभव नाही आला. मी घुमी झाले... लोकांपासून दूर जाऊ लागले. कोणाशी बोलणे, कुठेही बाहेर जाणे बंद केले मी. अगदी टाळताच येत नसेल तर जायचे पण मग आपली खरी ओळख देणे टाळायचे. खरं तर बाबांची मुलगी म्हणून ओळख देणे अभिमानाचे वाटायला हवे होते मला. पण ती ओळखच मिटवून टाकली मी. "
आसावरीला हे सगळे असह्य होत होते. तिची उद्विग्नता मला कळत होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. माझा हात हातात घेऊन ती म्हणाली, " अंजू, मला समजून घेशील का तू? घेशील ना? " मी मान डोलवली.
"याच दरम्यान एका ओळखीच्या मुलीच्या माध्यमातून मी 'संवाद' च्या वर्तुळात आले. मुकबधिर मुलांच्या मदतीसाठी कार्य करते ही संस्था. मग या संस्थेसाठी पैसे जमा करण्यासाठी मग माझी चित्रप्रदर्शनं भरवू लागले मी. अश्याच एका प्रदर्शनाच्या वेळी माझी अभीशी ओळख झाली. या मुकबधिर मुलांसाठी काम करणारा अभी स्वतः मुकबधिर आहे. त्यानं कधीच बुवांचे गाणे ऐकलेच नाहीये गं... त्यामुळे, मी गात नाही किंवा असं म्हणू या की बुवांची लेक असूनही मी गात नाही, याचा त्याला काहीही फरक पडत नाही. त्याच्या आयुष्यात गाणं नाहीयेच गं.. आणि माझ्याही. तो माझी चित्रांची भाषा ओळखतो आणि मी त्याची. आम्ही जवळ आलो, गेल्या वर्षी लग्नही केलं. बुवांच्या जावयाला गायला तर सोडाच पण बोलताही येत नाही म्हणून भुवया उंचावल्याच, पण आता मला काही फरक पडत नाही. माई-बाबांनी त्याला स्वीकारलंय. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या कार्याचा गौरव झाला तेव्हा बाबांच्या डोळ्यांत जी अभिमानाची झाक दिसली ती मी कधीच विसरणार नाही. खूप कौतुक होतं त्यांना अभीचं. "
वडलांच्या आठवणीनं तिला पुन्हा रडू कोसळलं. मी काही बोलणार इतक्यात अभीच तिथे आला. मोठ्या मायेनं त्याने तिचे डोळे पुसले आणि तिला घरात घेऊन गेला. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत राहिले.