निवडुंगाच्या वनातील एकासम माझी स्थिती
सहन सहज काटे करतो, मग फुलांची का भीती?
न अनुभवले प्रेम कुणाचे
फक्त पाहिले खूर गुरांचे
सतत निंदा ऐकून घेणे हीच माझी गती
तरीही मग स्तुतीची का भीती?
माळरानी भूत दडले,
कुह्राडीभोवती भविष्य घुटमळले
सदैव देण्या तयार आहे प्राणाची आहुती
तरीही मज जीवनाची का भीती?
कुठे वाकुडा, कुठे तिकुडा
कधी बाकही असे लाकुडा
कुरूपताही करू न शकली काहीच मजला क्षती
तरीही मज सौंदर्याची का भीती?
आकाशाची हाव न धरली
बहराचीही इच्छा नुरली
मन:पटले आता माझी सदैव असती रीती
तरीही मज स्वप्नांची का भीती?
कड़क उन्हाळा असा सोसला
जलबिंदूसही जीव आसुसला
सहन तेजोभास्कर केला आकाशाच्या छती
तरीही मज छायेची का भीती?
या सर्वांची गोष्टच न्यारी
नाजुकतेचा गजरा शिरी
सुख हवे अन दु:ख नको ही होऊन जाईल नीती
म्हणून मज सुखाची हो भीती!
read more @ दुवा क्र. १