गेले आडवे मांजर !

गेले आडवे मांजर,
चुके ठोका काळजाचा,
मांजर बी हळू बोले,
गेला उंदीर हातचा!

आज हाये अमावस्या,
वाटे धाक-धुक फार,
झाला पोरगा वकील,
आली दारावर तार !

कसंनुसं वाटे मले,
लेक दारात शिंकली,
परं माह्या येड्या मना,
तिले सर्दी भाय झाली !

पडे हातातुन खाली ,
कुंकवाचा ग करंडा,
पर धनी आने घरी,
भरलेला बैलगाडा!

जाता तिघे जन संगे,
म्हने कामे बिघडती,
पर लेकरु आजारी,
संगे माय-बाप जाती !

जीव वरती खालती,
विझे देवाचा ह्यो दिवा,
कर थोडा त ईचार,
आली जोरात ही हवा !

भारी लवे डावा डोळा,
काय वाईट आनखी?
पर आली दारावर,
बगा साईची पालखी !

-मानस६