":आजपासून या बाळावर
अधिकार त्याच्या आईचा"
न्यादेवतेच पारडं स्त्रीकडेच;
तर त्याला न्याय कसा म्हणायचा.
पहिल्यांदाच मला रे बाळा;
पुरुष होण्याची लाज वाटली;
केली होती खूपं पराकाष्ठा;
तुला मिळवण्यासाठी.
तुझ्या पावलांत मला ;
गवसतील वाटा वाटले होते;
बोबड्या बोलात तुझ्या;
'बाबा'ऐकावेसे वाटले होते.
या आंधळ्या कायद्याने;
तुझी माझी नाळ कापली;
अन् पुरुष कठोर असतो;
म्हणून सारीपाट जिंकली आई.
बाळा, सगळेच बाबा वाईट नसतात;
त्यांनाही असतो मायेचा पाझर;
आपल्या रक्ताच बाळ बघताना;
त्यांचाही भरून येतो उर.
मला फक्त रडता नाही आलं;
कारण समाजाने मला व्याख्येत बसवलं;
तूझ्या कुशीत झोपण्याच;
माझं स्वप्न हिरावलं.
दोष तुझ्या आईचा की माझा;
या गोष्टींना आता अर्थच नाही;
मला फक्त एवढंच कळलं;
बाप असून मला मुलगा नाही.
तरीही बाळा मोठा हो;
आकाशाला गवसणी घाल;
जगण्याच्या वाटेवर धडपडलास;
तर हक्काने 'बाबा'म्हणून साद घाल.
मी खरंतर वेडेपणाच करतोय;
कदाची मी तुला आठवणारही नाही;
पण ही वेड्या बापाची माया;
म्हणून तर मी आशा सोडणार नाही.