संपूर्ण विश्वाचा जीव वरखाली
लावण्यवती भूमी वयात आली
अन
चंद्र, सूर्य, समुद्राची घालमेल झाली
.........
लावून बिंदी ध्रुवाच्या ताऱ्याची
गवती केसांमध्ये वेणी फुलांची
संमोहकता तजेलदार चंद्राची
गालांना लावून लाली सूर्याची
ओंजळीत घेऊन फुले चांदण्यांची
सजली ती देखणी नवयुवती धरती
.......
वर क्र.१. चंद्र
भूमीच्या तो गाढ प्रेमात पडला
अमावस्या आहे हेही विसरला
तिच्या कलाने घेता घेता त्याला
भाग पडे कलेकलेने झुरण्याला
शीतल कोमल चंदास सदा घाई
डोळे भरून तीला निरखीत राही
काकडून, हुडहुडून झोपी जाई
घट्ट पांघरून शुभ्र ढगांची दुलई
भेट म्हणाला तीला पौर्णिमेला
लिंबोणीच्याच मागील बाजूला
तारकासुत्र गळ्यात बांधायला
चंद्रकोरीने भांग सजवायला
........
........
वर क्र.२ सूर्य
पहाटे-पहाटे
लाजे तो पराक्रमी वीर रात्रभर
झोप घेती प्रकाशकिरणे पळभर
देखणी पृथ्वी मनमोहक ओलसर
पहाटेलाच हा होई लालसर
दुपारी
अस्वस्थ जीवात तप्त घालमेल
लाहीलाहीत तीला कसे करमेल
वय कोवळे तीचे रागात त्या करपेल
काय करेल? जर काया होरपळेल
सांजवेळ
लोभसवाणे रुप त्याचे संध्याकाळी
विसरे चटके, भूमी प्रेमांधळी
सर्वत्र पसरली प्रेमाची सावली
किरणे अखेरीस विसावली
.........
.........
वर क्र.३ समुद्र
प्रेमभरतीने समुद्र उसळे मनी
अंतरंगी आक्रंदे 'ये ग भुमी'
खसे पायाखालची जमीन
स्पर्शे समुद्रास किनाऱ्यावर भूमी
रेतीत सावरे तोल न दोघांना
आकाश बघे सूर्य मावळताना
लाजून तोंड सप्तर्षी फिरवताना
डोळ्यातून उल्का टपकन सांडताना
सर्वांग सौंदर्य अथांग सागराचे
लाटावरी रंग इंद्र-धनुष्याचे
मिलनोत्सुक भाव भूमी-समुद्राचे
रोमरोम मोहरले सर्व विश्वाचे
........
........
पाहते भूमी रोजच वाट त्याची
ना चंद्राची, ना ताऱ्या सूर्याची
मादक स्पर्शणाऱ्या , त्या समुद्राची.
.......
.......