माझी हॉस्पिटलभरती

त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाइव्ह पाहिल्यामुळे असेल किंवा राहुल महाजन चं स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहिल्यामुळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हॉस्पिटलचा रस्ता धरला.

तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय? " अशी पृच्छा केली. त्यांचीही चूक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बराचसा इति सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला. ह्या अनपेक्षित हल्ल्याने घाबरून मी डोळे गच्च मिटून घेतले. त्यामुळे 'पेशंट सीरियस आहे' अशी समस्त भगिनींची (नर्सीणींची हो), मावश्यांची (मावश्या म्हणजे हास्पीटलातली एक मावशी त्याचे अनेकवचन मावश्या. उगाच तमाशाची वगैरे आठवण काढू नका) आणि वॉर्ड बॉयांची समजूत झाली असणार. ह्या हॉस्पिटलांचं एक बरं असत. तिथे आधीपासून आया, मावश्या, सिस्टर असे आपले नातेवाईक हजर असतात. वरच्या मजल्यावर आय सी यु (मराठी अनुवाद : मी तुला बघतो) नामक खोली मध्ये मला भरती करण्यात आलं. सौ ला रिसेप्शन ला जाऊन सगळ्या फॉर्म्यालीटीज पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. परत एकदा माझी गचांडी धरून मला कॉटवर आदळण्यात आलं. कॉटशेजारील रॉडवर एक प्लॅस्टिकची बाटली (ती सुद्धा उलटी) टांगण्यात आली आणि त्याच एक टोक माझ्या मनगटात खुपसण्यात आलं.

" कसली बाटली हो? "
" ग्लूकोज"
" आहे पण ती अशी उलटी का टांगलीये. सरळ टांगा ना. उगाच पडली बिडली तर खात्रड होईल ना"
" अशीच टांगायची असते" (सिस्टरच्या नजरेत " हे कुण्या गावच पाखरू" असा काहीसा भाव दिसला)"
" हे ग्लूकोज कश्या करता असत? "
" शक्ती येण्या करता"
" मग त्यापेक्षा मी सरळ ग्लूकोज बिस्किट खाऊ का हो? माझ्या कडे २ पुडे नेहमी असतात. ५ रुपये वाले"
" तुम्हाला झोपेच इंजेक्शन देऊ का हो? "
(हा प्रतिप्रश्न कदाचित माझ्या प्रश्न टाळण्यासाठी असावा. )
मी लगेच त वरून ताक भात ओळखून पांघरूण डोक्या वरून ओढून झोपेच सोंग घेतलं.

थोड्यावेळाने जवळपास कुणी नाही ह्याची खातरजमा करून हळूच पांघरूण बाजूला केलं. ती सलाईनची सुई खुपसून ठेवल्यामुळे एक तर झोप येत नव्हती आणि दुसरं म्हणजे पोटात भुकेचा गोळा उठला होता. काही वेळाने सौ बाजूला येऊन उभी राहिली.
" सगळे सोपस्कार पूर्ण केलेस का? "
" हो. फॉर्म भरून दिला आणि दहा हजार रुपये डिपॉझिट म्हणून दिले"
" किती??? "
" दहा हजार डीपॉसीट. दिवसाच भाडं ४ हजार रुपये"

पेशंटला हॉस्पिटल मध्ये 'भरती करणं' का म्हणतात ते मला आता कळलं. पेशंटला हास्पीटलात भरती केलं की त्याच्या खिशाला ओहोटी लागते. आणि हा भरती ओहोटीचा खेळ सदैव चालू असतो.

" बरं आता तुम्ही झोपा. मी बाहेर थांबलेय. काही लागलं तर सांगा "
" लागलं तर म्हणजे? लागतच आहे की. ही इतकी मोठी सुई मनगटात खुपसून ठेवलीये. ग्लूकोज म्हणे"
पण माझी फालतू कोटी ऐकायला सौ थांबली नाही. इथे भुकेने पोटात आग पडलेली.

"मला जेवायला मिळेल का हो? " मी मावशीला विचारलं
" इथे आय सी यु मध्ये जेवण नाय. पेशंटला फक्त लिक्विड डायट मिळेल"
"मग जरासा चहा मिळेल का हो? कधी पासून तल्लफ आलीये "
"बरं आणते थोड्यावेळाने"
मला गदगदून आलं. म्हणून मी पडल्या पडल्याच थोडंसं गदगदून घेतलं. मराठीत "माय मरो पण मावशी जगो" अशी म्हण का आली असावी त्याची मला प्रचिती आली. मावशीने मला 'थोड्यावेळाने" म्हणजे साधारण तासा-भराने 'लपून छपून' चहा आणून दिला. कुणी मावशीला मला लपून छपून चहा आणून देताना पाहील असत तर 'मावशी पेशंटला ताडी-माडी विक्री केंद्रातून काहीतरी जिन्नस किंवा नीरा विक्री केंरातली उरलेली आदल्या दिवशीची नीरा तर आणून देत नाही ना? ' अशी शंका त्याला/तिला आली असती. असो. चहा अगदी छान म्हणजेच 'पाणीदार' होता. पण त्या परिस्थितीत तो तसा 'पाणीदार' चहाही खूप छान लागला.

मला थोडीशी डुलकी लागली असेल नसेल तोच मला कुणीतरी उठवलं. बघतो तर माझ्या भोवती दोन डॉक्ट्रर (त्यांना आर एम ओ म्हणतात अस नंतर कुणीसं सांगितलं. ), दोन सिस्टर्स. मी जागा झालोय बघून एकीने माझ्या खाकेत थर्मामीटर खुपसलं, दुसरीने दंडाला कसलं तरी कापड चोपडलं आणि फुस्स फुस्स करून हवा भरली. एका आर एम ओ ने गळ्यातला स्टेथस्कोप माझ्या छातीवर लावल्या सारखा केला आणि मला जोराने श्वास घेण्याची आज्ञा केली. दुसऱ्याने माझी नाडी (हाताची) धरली. कदाचित 'मल्टी टास्कींग मल्टी टास्कींग' म्हणतात ते हेच असावे. ते सर्व आपापसात काहीतरी पुटपुटत होते. मला त्यात 'ब्लड रिपोर्ट' 'ई सी जी' अस काहीस ऐकू आलं. मी 'बी पी' असाही काहीतरी शब्द ऐकला आणि थोडासा कावरा बावरा झालो.
"मला नक्की काय झालंय डॉक्टर"
"आमची तपासणी चालू आहे. कळेलच लवकर काय ते"
"मला डिस्चार्ज कधी मिळणार मग? "
"लवकरच. डोंट वरी. आलं इज वेल"
(आयला हे डॉक्टर लोकही चित्रपट बघतात तर)
मला लगेच उडी मारून ' जहापना तुसी ग्रेट हो. तोहफा कुबुल करो' अस म्हणावंसं वाटलं. पण ते हाताला सलाईन लावून ठेवलेलं ना. त्यामुळे नाईलाज झाला.
एका सिस्टर ने मला फटकन टोचलं आणि चांगलं वाडगाभर रक्त काढलं. दुसरीने छाती पोटावर कसलासा गोंद डकवला आणि कसले तरी रबराचे बिल्ले त्यावर डकवले. बाजूच्या यंत्रावर काही तरी वेड्या वाकड्या रेषा उमटल्या (बहुदा मशीन बिघडलं असावं. नायतर सरळ रेषा नसत्या का आल्या )
" हे काय हो? "
"ई सी जी"
"ई सी जी म्हणजे"
"एको कार्डीयो ग्राम"
" अस्स अस्स" मी मला समजल्या सारखं दाखवलं
तोपर्यंत त्या पाहिल्या सिस्टरचं पुरेसं रक्त शोषून झालं होत.
"बरं आता पुढची टेस्ट फास्टींग नंतर"
"फास्टींग? " मी जोरात किंचाळलो
"अहो मला इथे भरती केल्या पासून काहीही खायला दिल नाहीये आणि त्यात आता वेगळं फास्टींग काय करायचंय? "
त्या दोन्ही सिस्टर्स पुढचं ऐकायला थांबल्या नाहीत. आपापसात काहेतरी पुटपुटत निघून गेल्या. कदाचित 'ह्या पेशंटला एनीमा द्यावा का रेचक पाजावं का दोन्ही एकदमच करावं. " हे त्या डीस्कस करत असाव्यात.

रात्री कधीतरी मग मला दमून झोप लागली. झोपेत छान छान स्वप्न पडत होती. मला इंजेक्शन देणारी सिस्टर एंजेक्शंची सुई मोडली म्हणून रडत होती. नाडी तपासू पाहणारा एम आर ओ हाताला नाडीच लागत नाही म्हणून कावरा बावरा झाला होता. मला एनीमा द्यायला वॉर्डबॉय आला तेव्हा मी लब्बाड पणे बाजूच्या खुर्चीवर बसून राहिलो. आणि 'पेशंट कुठाय' अस विचारल्यावर 'काय माहीत नाही बॉ' अशा अर्थाची ओठ मुडपून खूण केली. शेवटी शेवटी तर मी कॉट खाली लपून राहिलो आणि सर्व जण पेशंट कशे शोधताहेत त्याची गंमत बघत राहिलो. तेव्हा का कोण जाणे कुठुनसं एक मांजर आलं आणि मला कॉट खाली येऊन अंग घासायला लागलं. चाटायला लागलं गुदगुदली होऊन मी अंग झटकलं आणि टक्क जागा झालो. जागा होऊन बघतो तर काय एक वॉर्डबॉय मला गरम कपड्याने खरवडून काढत होता. काय करताय विचारलं तर म्हणाला स्पंजींग.
घड्याळात बघितलं तर पहाटेचे ५ वाजले होते. आता पेशंटला झक्कत इतक्या पहाटे उठवून घासून पुसून काढायचं काय अडलं असत का हो? पण नाही (हे अगदी मोहनदास सुखटणकर स्टाईलीत बरं)

शेवटी एकदाची ती शुभ घडी आली. डॉक्टर शहा का डॉक्टर मोदी असे कुणीसे एक डॉक्टर आले. ते आल्यावर एम आर ओ, सिस्टर, वॉर्ड बॉय आणि आमची सौ असा घोळका सभोवताली जमला. ते पाहून कुणीतरी पेशंट अत्यवस्थ आहे अशी तर पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची धारणा झाली असावी.
"तुमची तबेयत आता लय छान दिसते. तुम्हाला डिस्चार्ज द्यायला आता काय बी प्रॉब्लेम दिसत नाय. फकस्त काही टेस्ट वरचेवर करत जा"
माझा चेहरा आनंदाने खुलला. मी लगेच ती दुखणारी सलाईन काढायला लावली. माझ्या नेहमीच्याच (म्हणजे गबाळ्या) पेहेरावात आलो आणि लिफ्टने धावत पळत रिसेप्शनला पोहोचलो. तोपर्यंत सौ डिस्चार्ज पेपर्स घेऊन आली. बील बघतो तर काय चक्क पंधरा हजार रुपये. मला पुन्हा भोवळ आली पण परत मला भरती करतील म्हणून मी ती थोपवून धरली. चेहरा हसरा केला. शीळ घातली. ती नेहमी सारखी न येता इडली लावलेल्या कुकरच्या शिट्टी सारखी आली. बील 'चूक'ते करून तिकडून काढता पाय घेतला. आणिक तिथे थांबलो तर अधिक भाडं लावतील. उगाच कशाला.

आजकाल मला अचानकच भोवळ येते कधीतरी. मग मी लगेच जीवन नायतर रामकृष्ण हॉटेलात जाऊन म्हैसूर मसाला डोसा, नायतर इडली-वडा हादडतो आणि हास्पीटलच्या रस्त्यावर चुकून सुद्धा फिरकत नाही. 'पंधरा हजार रुपये खर्च करण्यापेक्षा ५० रुपये खर्च केलेले कधीही उत्तम' काय म्हणता?

***************************************************
समाप्त