कालबाह्य पद्धती

साऱ्या विवंचना
मला सोपवून
अर्ध्यातच नौका
त्यानेच सोडली

नकळत त्याने
संसारामधून
सुटका स्वतःची
करून घेतली

शोधत राहिले
मी आज स्वतःची
नित्य जिंकणारी
फसवी सावली

शरणच गेले
नियतीला जणू
पांघरून आता
ती पांढरी साडी

कुंकू निमित्ताने
आज्ञाचक्राला त्या
स्पर्श पुर्वी होई
उध्वस्त कपाळी

मुक्त मनगट
भकास सावट
खिन्न सुरावट
बांगडी मुक झाली

शकुनी पावले
ऊबऱ्यावरची
आडवी जाणारी
मांजराची झाली

काय चालणार
नियतीच्या पुढे
निघून जाणार
ज्याची आठवण
       त्याला आधी झाली.