रणरणत्या दुपारची, वेळ होती दोनाची
मैदान फुलून गेले होते, सभा होती मंत्र्याची......
सवयी प्रमाणे महोदयांना झाला येण्या उशीर फार
गाठी भेटी, हार सत्कार, होता होता वाजले चार......
मंत्री महोदय उभे राहिले, भाषण सुरू झाले रटाळ
हे करू अन ते करू, आमिष दावले पोकळ पोकळ......
बोलता बोलता साहेबांनी, जुन्याच विषयाला हात घातला
गोष्ट होती शांघायसारखं बनविण्याची मुंबईला......
"गेल्या पाच वर्षामध्ये शांघाय केलं मुंबईला
किंबहुना शांघायपेक्षाही पुढं नेलं आम्ही तिला
पूर्वी इकडे चायनीजची गाडी असे नावाला
आता मात्र मिळू लागले, गल्लो-गल्ली, कोपऱ्याला
घेऊनी थोडा मोबदला, परवाना साऱ्यांना दिला
कायदे टांगून खुंटीला, दिला शब्द खरा केला
केल्या कामाची पावती घेऊन विनंती करतो तुम्हाला
मत द्या आम्हाला; कारण, आम्ही जागतो वचनाला !! "
॥ जय हिंद , जय महाराष्ट्र ॥