एक घास चिऊचा एक घास काऊचा;
म्हणताना पोटोबा केलेला;
आपल्या पाठीमागे धावताना;
आईचा सराव झालेला.
ऍडमीट किडा किसका घर म्हणत;
लोखंडाला हात लावलेला;
अन् ठिकाण शिवण्यासाठी;
जीवाचा करार मोडलेला.
टिपीटिपीटॉपचा तर रंगच न्यारा;
प्रत्येकवेळी वेगळा भासणारा;
व्हॉट कलर यू आर? म्हणत;
रंगाच्या दुनियेत सोडणारा.
कोलू का? म्हणत खेळलो होतो;
विटीदांडूचा लाडका खेळ;
पाच पावलं; दहा विट्या अन् हजार तांदळाचे दाणे;
यांचा बसायचांच नाही कधी गदीशी मेळ.
आबाधोबी अन् लगोरीचीही तीच गंमत;
चेंडू मारून वचपा काढायचा;
वर तुम्हीच चिडतायं म्हणून;
खेळाचा बेरंग करायचा.
आता ही आपण खेळतोच हे खेळ;
रोजच आपल्या जगण्याशी;
ऍडमीट किडा असतो आपल्या स्वप्नांचा;
पण रंग नसतो त्याला आपल्या मनातला.
विटीदांडूतली विटी म्हणून ;
जग तुम्हाला कुठेही उडवतं;
अन् लगोरी, आबाधोबीच्या नावाखाली;
तुम्हाला हवतसं बडवतं.
भरता येईल का आपल्या स्वप्नांची गद?
घालता येईल का धप्पा संकटांना?
काऊचीऊचा घास भरवून घेताना;
मिळेल का लोखंड,जगाण्याचे टप्पे ओलांडायला.