जपलेली अनेक स्वप्ने
मी ओंजळीत माझ्या
दर्वळती सुगंध अजूनी
जरी सुकलेल्या पाकळ्या ।
भूवरी पसरली येथे
स्मरणांची मोहक नक्षी
पखरण त्यावरी आता
निखळल्या शुष्क पर्णांची ।
घनगर्द तरुंचा बहर
फांदीवरीच सुकलेला
उजाड घरट्यात श्वास
पाखराचाही अडलेला ।
अनावर फिरे वारा
उधळी धूळ आसमंती
जखडल्या पावलास पडे
वादळाचीच येथ भीती ।
हरवला गाव तो कोठे
दिशा काही आकळेना
गर्दीच केवळ येथे
पण माणूसही दिसेना ।
शुभ्र प्रकाशी तारा
असेल क्षितिजावरती
झाकोळल्या वाटा साऱ्या
या पाणावलेल्या नेत्री ।
शोधण्यास गाव तो माझा
अन माणसांचा ठाव ही
जाईन विचारीत मी त्या
माझ्या ईश्वरासही ।
मार्ग दावी तू मला
विनवीन परमेश्वराला
अणुरेणूत भरुनी जो
चराचरी सामावलेला ।