मा. श्री. भिकू म्हात्रे विनाकारण बदनाम समाजसेवक ... पोलिस जबाबदार

सध्या महाराष्ट्रातील अत्यंत अनुभवी आणि प्रभावशील भाईच्या मागे पोलिसांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. त्यांच्यावर केलेले गंभीर आरोप म्हणजे १) खंडणी वसूली २) खून प्रकरणे ३) संघटित गुन्हेगारी

४) अखिल वैश्विक सेनेचे अध्यक्षपद ५) कचकडी चाळीतील प्रचंड पॉवर ६) 'आत' असताना बाहेरचे व्यवहार संभाळताना आलेल्या नाना अडचणी.

मुळात भाई कमी बोलतात. त्यात 'आत' असताना पण बाहेरचे उद्योग म्यानेज करताना चालू असलेली त्यांची ओढाताण पोलिसांच्या नजरेस येत नाही हे भाईंचे दुर्दैव म्हणायचे. भाइंच्या दहशतीबद्दल काही महाभाग उगाच च्यावच्याव करत असतात. त्यानी म्हणे कित्येक गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेतल्याचे खटले दाखल झाले, आणि दरवेळी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता देखील. मुद्दा हा आहे की भाई खरेच इतके गुंड आहेत का? माझ्या मते त्यांच्याइतका सच्चा समाजसेवक नसावा. खरे म्हणजे भिकू म्हात्रे हे व्यक्तिमत्व आपल्याला समजले नाही हा आपला मूर्खपणा म्हणावा लागेल. माझे म्हणणे एवढेच आहे की भिकू म्हात्रेसारख्या 'नामचीन' समाजसेवकावर गुन्हे दाखल करताना पोलिसानी काळजी घेणे गरजेचे आहे. गुन्हे दाखल केले तर ते पुराव्यानिशी सिद्ध करावे नाहीतर गप्प बसावे.