नाळ जगाशी जोडु न शकलो, बरेच झाले
माझे मीपण खोडु न शकलो, बरेच झाले ||धृ||
ओलाव्याचा अभाव होता नदीकिनारी
ओंजळ ओंजळ जीवन देई तळे विषारी
घाटावरल्या देवळात मी उभा भिकारी
अशा शिवारी रुजू न शकलो, बरेच झाले ||१||
दूर दूरवर औदुंबर आढळला नाही
अश्वत्थाचा परिचय काही घडला नाही
झपाटलेला पिंपळही सापडला नाही
निवडुंगाला त्यजू न शकलो, बरेच झाले ||२||
ऊन-पावसातून आजवर चालत होतो
स्वतः स्वतःची पायवाट मी घडवत होतो
मजल दरमजल माळरान ओलांडत होतो
हात कुणाचा धरू न शकलो, बरेच झाले ||३||