मला फारसं वाईट वाटलं नाही
याचं फार वाईट वाटून घेऊ नकोस
आजकाल दिवसच खराब चाललेत निष्कारण हळव्या लोकांचे
तू रडू नकोस या भिरभिरणाऱ्या पाचोळ्याकडे पाहून
की एक दिवस गोष्टीतला साधू म्हणाला होता त्याप्रमाणे
हे ही संपून जाईल
दिवस बदलत जातात
आपल्या वयासोबत वाढत जातं आपलं न वाईट वाटलेपण
मला आनंद होतो निरागस हसणारी मुलं पाहून
एखादं हिरवंगार झाड पाहून
तुझ्यामाझ्या खिडकीत बसलेला पारवा पाहून
मला असं सतत वाटत राहतं की
एवढं नक्कीच पुरेसं आहे एक जन्म काढण्यासाठी.
अनंत ढवळे