हातावर दही ठेऊन म्हणालीस,
"बाळा, इमाने- इतबारे मोठा हो.... "
हाच आशीर्वाद घेत मी लहानाचा मोठा झालो होतो!!
आज नोकरीसाठी मुंबापुरीला निघताना,
आई, कसा सांगू तुला, आत किती घुसमटला होतो...?...
दहावीला होतो आई,
पेपर फुटल्याच कळालं होतं
बाबांच्या खिश्यातून १०० रुपये काढताना
'इमान' पहिल्यांदा खुंटलं होतं...
फुटलेल्या २ पेपरांनी मला
सर्वोत्तम मार्कांचा मानकरी बनविला होता...
"सायन्स" ला चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवल्यावर
तूच निश्वास टाकला होता!
त्या दिवसापासून सांगायचं होतं आई,
आज-काल इमान पोटाशी धरून, "पुढे" जाता येत नाही!!
कॉलेजाला आलो तेव्हा,
शिंग होते फुटले,
सिगारेटीच्या शौकासाठी तुझ्या पर्स मध्ये हात घालताना
माझे 'इमान' होते बाटले....
उच्च शिक्षण घेत होतो,
नवे व्यसनं जडवत होतो,
पैसे घरातून तर कधी मित्रांकडून उधार घेताना,
'इमान' माझं बुडवत होतो....
घरात कितींदा गोंधळ झाला,
पैसे गायब होण्यावरून,
निर्लाज्ज्यासारखं कामवालीवर आळ घेऊन,
'इमानाला' दिवसेंदिवस गिळत होतो!!
असल्या हौसेसाठी सांग ना कधी, पैसे असतेस का दिले?
"स्टेटस" नावाच्या कारणासाठी, मग मी इमान गुंडाळून ठेवले....
पण खरच सांगतो, आई
तुला सारं खरं, एकदा तरी सांगायचं होतं.....
हिय्या करून आलो कितीदा, माझं चुकतंय हे मला कळलं होतं,
मोठा झालो होतो, आई
निसर्ग आडवा येत होता...
तुझ्या माझ्यात त्याने आता
बराच दुरावा ओतला होता....
चाकाची सुटकेस ओढत आज मुंबापुरीला निघालो होतो
"तोच" तुझा आशीर्वाद घेऊन पुढचं पाउल टाकणार होतो
काय वाटलं असतं तुला,
माझ्या खिशातल्या "शिफारस- पत्राबद्दल" जर तुला कळलं असतं?
एकदाच सांगायचं होतं आई
'जिंकण्याच्या' ह्या धाव स्पर्धेत
"इमान- १०० टक्के" शाबूत राखून जगता येत नसतं,
आई, जगता येत नसतं!