उसळू दे वडवानल, मी भिणार नाही
तुझ्या स्नेहाच्या ओलाव्यात त्याची दाहकता संपून जाईल.
दाटू दे चहूकडे भीषण अंधार, मी भिणार नाही
तुझ्या डोळ्यातील तेजातून सहस्र दीप निर्माण होतील.
बोचू दे पायी शेकडो काटे, मी भिणार नाही
तुझ्या नेत्रकटाक्षाने साऱ्या वेदना शमून जातील.
उन्मत्त होऊ दे संहारक प्रलय, मी भिणार नाही
तुझ्या अविचलतेपुढे त्याला नम्र व्हावेच लागेल.
गरजू दे डोंगरलाटा, मी भिणार नाही
तुझा हात धरून पैलतीर गाठता येईल.
लागू दे वाटेत रुक्ष मरुभुमी, मी भिणार नाही
तुझ्या पदस्पर्शाने वाळूचीही हिरवळ होईल.
येऊ दे खुशाल मृत्यूचा बुलावा, मी भिणार नाही
तुझी अमृतवाणी मला अमरत्व देईल.
असू दे संकटकाळी मी एकटी, मी भिणार नाही
तुझ्या आठवणीतर सोबत आहेत ना!