कल्लोळ

(सकाळी दूधाला जातांना दारात प्राजक्ताचा बहर पडलेला दिसला आणि......

मे महिन्याचा भर उन्हाळा, पावसाळा लवकर येणार म्हणून किंवा वळवाची
चाहूल म्हणून आभाळ भरून आलेलं, वसंताच्या लाटांवर कोकीळा अजून बागडताहेत;
अशा वेळी ऋतुमानाप्रमाणे मोगरा-निशिगंध ठीक आहेत पण चक्क श्रावणातला
प्राजक्त आज कसा काय फुलला ????.....

एखाद्याच्या जीवनवणव्यात जर असा प्राजक्त बहरला तर हुरहूर आणि कल्लोळच येईल वाट्याला ......)

मेघाआडुन घुमे कोकिळा विधिवत संसारी
क्षितिजावरचे माप लवंडे वसंत दरबारी
कसाच फुलला असा अवेळी पारिजात दारी
घाट आठवे दाट वनातिल वैशाखविहारी

ऋतुमानाचे का उल्लंघन कशास भुलली स्वारी
प्रभात प्रहरी दंव कुसुमांचे पायाशेजारी
शुभरंगांकित गंध सुमंडित जरी अशी ही वारी
काळजात काटेरी हुरहुर कल्लोळ विखारी

..................अज्ञात